Deforestation : रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली जुन्या वृक्षांची कत्तल

Road widening : वयाचे शतक ओलांडलेले डेरेदार आणि महाकाय वटवृक्ष हे नीरा-बारामती रस्त्याचे वैभव आहे. मात्र रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली या जुन्या वृक्षांची अक्षरशः कत्तल सुरू आहे.
Deforestation
DeforestationAgrowon

Pune News : सोमेश्वरनगर, ता. २६ : वयाचे शतक ओलांडलेले डेरेदार आणि महाकाय वटवृक्ष हे नीरा-बारामती रस्त्याचे वैभव आहे. मात्र रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली या जुन्या वृक्षांची अक्षरशः कत्तल सुरू आहे. आतापर्यंत शेकडो वृक्ष तोडले असून, लवकरच हा चाळीस किलोमीटर रस्ता पूर्णपणे वृक्षविरहित होण्याची शक्यता आहे. पर्यावरणप्रेमी या प्रकाराने अस्वस्थ आहेत.

नीरा ते बारामती हा चाळीस किलोमीटरचा राज्यमार्ग केवळ वृक्षांमुळे महाराष्ट्रातील समृध्द रस्ता मानला जातो. दोन्ही बाजूंना वड, चिंच, लिंब, जांभूळ, बाभूळ अशी काही इंग्रजकाळापासूनची झाडे आहेत. प्रवाशांसाठी ऐन उन्हाळ्यातही या रस्त्यावरचा प्रवास अल्हाददायक असतो. वारकरीही बारामतीपर्यंत सावलीखालून पोचतात. मागच्या चार-पाच पिढ्यांचे हे साक्षीदार आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सुरुवातीला माळेगाव व शारदानगर येथे रुंदीकरण सुरू केले. त्यानंतर करंजेपूल, सोरटेवाडी, वडगाव पट्ट्यातही वृक्षतोड करून रस्ता रुंद केला. काम शांत झाले असे वाटत असतानाच सध्या माळेगाव-बारामती पट्ट्यात आणि वडगाव निंबाळकर-कोऱ्हाळे पट्ट्यात पुन्हा वृक्षांची अमानुषपणे कत्तल सुरू आहे. भव्य वृक्ष यंत्राच्या साहाय्याने जमीनदोस्त होत आहेत आणि पक्ष्यांची घरटी आणि किटकांचा अधिवास कायमस्वरूपी नष्ट होत आहे.

Deforestation
Deforestation : खानदेश, मराठवाडा सीमेवर जंगल दुर्लक्षित

पर्यावरणप्रेमी या विरुद्ध आवाज उठवतील यामुळेच बहुधा टप्प्याटप्प्याने वृक्षतोड सुरू आहे. साडेतीन हजार वृक्षांपैकी जवळपास एक हजार वृक्ष तुटले आहेत. शेताच्या बांधावरची झाडे तोडायला अडवणारा वनविभाग या बेसुमार वृक्षतोडीला हवी तेव्हा परवानगी देत असल्याने वृक्षप्रेमी नाराज झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विशाल म्हणाले, ‘‘वडगाव निंबाळकर ते कोऱ्हाळे मार्गावरील बहात्तर वृक्षांच्या तोडीची परवानगी घेतली आहे.
पुढील टप्प्यात ऐंशी वृक्षांच्या तोडीची परवानगी प्रलंबित आहे. वृक्ष तोडावे लागत आहेत, मात्र या मार्गावर सोमेश्वर, माळेगाव कारखान्यांची वाहतूक आहे. सातचा दहा मीटर रस्ता करणे ही काळाची गरज
बनली आहे.’’

शेजारून स्वतंत्र मार्ग आखावा        
पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. महेश गायकवाड म्हणाले की, नीरा-बारामती रस्त्यावर शंभर वर्षांपेक्षा जास्त वयाची झाडे आहेत. आताचा रस्ता आहे असा ठेवून त्याच्याच शेजारून स्वतंत्र रस्ता आखावा म्हणजे सर्व झाडे वाचतील. पालखी महामार्गाप्रमाणे संबंधित जागामालकांना जास्तीत जास्त मोबदला द्यावा, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागास दिले होते. परंतु टप्प्याटप्प्याने विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपदा नष्ट करणं चालू आहे. यामुळे अनेक सजीवांची जीवनचक्रे नष्ट होणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com