Hard Work : तरुणांनो, तुम्ही राजकीय गोष्टींच्या फंदात न पडता जगात कुठंही जाऊन मार्ग काढून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा. कुणाशीही तुलना करू नका. आपला इतिहास हा लढवय्यांचा आहे. तो आता आर्थिक साम्राज्य निर्माण करण्यासाठी वापरायचा आहे.
जपान, जर्मनीमध्ये आपल्या लाखो शिक्षित तरुणांना सातत्यानं बोलावलं जातं आहे. इथं नोकऱ्या नाहीत. दिवस-रात्र अभ्यास करून, पदव्या मिळवूनही हजारो तरुण बेकार आहेत. सहा महिने जर्मन किंवा जपानी भाषा शिकून ते तिकडे का जात नाहीत? मी ऐकलेल्या एका घटनेत, जपानमध्ये महिना दहा लाख रुपयांची नोकरी मिळाल्यावर त्या तरुणाच्या वडिलांनी ‘माझा मुलगा इतक्या लांब जाणार नाही,’ असं सांगून त्या संधीवर लाथ मारली.
सध्या अनेक जातींची आंदोलनं सुरू आहेत. प्राणांची बाजी लावायला लोक तयार आहेत. जातीजातींमध्ये, धर्माधर्मांमध्ये समाज सातत्यानं विभागला जातो आहे. निवडणुका जवळ आल्या की अशा आंदोलकांचं प्रमाण वाढतं. योग्य की अयोग्य, यात मी पडू इच्छित नाही; परंतु यातून काही साध्य झालं तरी त्या समाजाच्या किती टक्के लोकांचा फायदा होऊ शकतो? माझ्या मते एक-दोन टक्क्यांपेक्षा जास्त नाही. मग उरलेल्या ९८ टक्के लोकांनी काय करायचं? उपाशी राहायचं की त्यावर अवलंबून न राहता मार्ग काढायचा?
आपल्या मराठी लोकांच्या स्वभावात, संस्कारात मला काही कमतरता जाणवतात. म्हणजे, आपण जेव्हा परप्रांतीय, परधर्मीय लोकांकडे पाहतो, तौलनिक अभ्यास करतो तेव्हा ‘आपण मागं का आहोत’ याचं काही प्रमाणात तरी आकलन होतं. आपल्या संतवाङ्मयातून, आध्यात्मिक गोष्टींमधून ‘पैशाचा मोह ठेवू नका...काहीसं निरीच्छ किंवा अलिप्तपणे स्वतःच्या आयुष्याकडे पाहा’ असे खूप संदर्भ सापडतात. परमेश्र्वराची जेवढी रूपं आहेत - मग ती गणपतीच्या, महादेवाच्या, विष्णूच्या वगैरेंच्या रूपात असोत - त्यांच्याकडे आपण ‘माझे प्रश्न तू सोडव’ अशी भक्तिपूर्ण मागणी करतो.
‘मी लढेन त्यासाठी प्रेरणा दे...मदत कर’ असं कुणी म्हटल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. घरदार सोडून, दूर जाऊन मिळेल तिथं संधी घेऊ किंवा निर्माण करू ही आपली वृत्ती नाही. ‘एक तीळ सात जणांत वाटून खावा,’ असं नेहमी म्हटलं जातं; परंतु ‘सात लाख तीळ निर्माण करू, आपलं भागवून इतरांनाही मदत करू,’ असं कुणी म्हटल्याचं ऐकिवात नाही.
बारा मावळ्यांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली; तीही बलाढ्य आदिलशाहीविरुद्ध, औरंगजेबाविरुद्ध. शिवा काशिदपासून, मदारीपर्यंत समोर मरण दिसत असताना ध्येयासाठी प्राणार्पण करण्याची, त्या टोकापर्यंत लढण्याची ती तेव्हाची वृत्ती आता गेली कुठं? का आम्ही आत्महत्या करतो?
व्यापारीमंडळींतील म्हणजे मारवाडी, गुजराती, सिंधी यांच्यातील कुणी आत्महत्या केलेली आपल्याला दिसते का? उलट, संपूर्ण विदर्भात, मराठवाड्यात, उद्योगक्षेत्रात महाराष्ट्रात त्यांचीच आर्थिक सत्ता आहे आणि त्यांनी ती कष्टानं मिळविलेली आहे. आम्ही फक्त त्यांची चाकरी करण्यात धन्यता का मानतो? पुण्यातील महापौर शीख समाजातील असू शकतो. किती मराठी लोक पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश वगैरे प्रांतांत अशा पदांवर आहेत अथवा उद्योजक आहेत?
मुघल, ब्रिटिश हे जगभर व्यापारासाठी, जिंकण्यासाठी तर बाहेर पडेलच; परंतु अनेक देशांत, खंडांत त्यांनी साम्राज्ये उभी केली.
आम्ही मराठी लोक यापासून काय शिकतो?
प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. म्हणजे हयात असेपर्यंत शाश्वती...शिवाय, कामाची कुठलीही जबाबदारी नाही. काम करायचं की नाही हा प्रत्येकाच्या मर्जीचा प्रश्न असतो. जिथं आर्थिक व्यवहार आहेत, तिथं काम केल्याबद्दल ९० टक्के कामांत आर्थिक लाभ आहेत. मग कशाला व्यवसाय किंवा परराज्यगमन असल्या बाबींमध्ये शिरायचं? भाजीपाला, फळं, धान्य यांमध्ये शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नाही.
तरुण पोरं चकाट्या पिटत असतात किंवा अनेकांना राजकारणात रस असतो, अशा वेळी ते शहरात जाऊन स्वतः किंवा एकत्रपणे आपल्या शेतीमालाची विक्री का करत नाहीत? सुदैवानं आम्हाला ‘ॲग्रोवन’मध्ये रोज दोन यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा गेली दहा-बारा वर्षं लिहिता आलेल्या आहेत. बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषकसारख्या प्रदर्शनासाठी काही लाख शेतकरी येतात. यावरून शेतकरीपण शिकू इच्छितो, मार्गदर्शन मिळवू इच्छितो हे ध्यानात येतं.
आता या ट्रस्टमार्फत ‘स्मार्ट ॲग्रिकल्चर’ म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उत्पादन, अधिक गुणवत्ता व उत्पादनखर्चात कपात कशी करता येईल यावर ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर प्रयोग सुरू होत आहे. त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल. सक्षम शेतकरी निर्माण होईल यादृष्टीनं आमची कृषी विद्यापीठे काय प्रयत्न करतात? हजारो एकर जमिनी असून, त्यातून ही विद्यापीठे किती उत्पन्न काढतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना किती सक्षम करतात? माझ्या माहितीनुसार, शेती-पदवीधरांमध्ये शेतीव्यवसाय करणारे दहा टक्केसुद्धा नाहीत. मग या विद्यापीठांवर हजारो कोटी खर्च करून आपण काय साध्य करतो?
काही महिन्यांपूर्वी मी लंडनमध्ये कामासाठी गेलो होतो. तिथं वेगवेगळे भारतीय लोक आणि काही उद्योजक भेटले. त्यातील पंजाबी, गुजराती लोकांनी पूर्व युरोपमधील काही देशांतील सुमारे ३५-४० लाख एकर जमिनी विकत घेतल्या आहेत. तिथं शेती करून धान्य, भाजीपाला पिकवून पश्चिम युरोपमध्ये म्हणजे जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड वगैरे देशांत पुरवठा करण्याचा व्यवसाय हे लोक करणार आहेत. यात मराठी माणूस नावालाही नाही.
मला आठवतंय, पंधरा-वीस वर्षांपूर्वी आफ्रिकेतील काही देशांत उसाच्या लागवडीसाठी जवळपास फुकटात जमिनी उपलब्ध होत्या. आपल्याकडील एक जणही तिकडे फिरकलासुद्धा नाही.
आपण सहकारचळवळींतून एकत्र येऊन साखर कारखाने, दूध व्यवसाय यशस्वीपणे निर्माण केले; परंतु त्यात राजकारण, सरकारचं नियंत्रण वगैरे गोष्टी आल्या आहेत. व्यवसाय निर्माण झाला की त्यात राजकारण घुसतंच. त्यातून पैसाही मिळतो आणि सत्ता मिळवायलाही मदत होते. मग सातत्यानं सुधारणा, प्रयोगशीलता, व्यवसायवृद्धी कोण करणार? ‘अमूल डेअरी’ देशभर दुधाची उत्पादने विकते. महाराष्ट्रात आपण त्याच्या आसपासही नाही. तिथं व्यवसायाभिमुख, तर आपल्याकडे राजकारणाभिमुख मनोवृत्ती आहे. त्यामुळे शिक्षणसंस्थांपासून सहकारचळवळीपर्यंत राजकीय लाभ कसा घेता येईल याचाच विचार होतो. अर्थात, हे जवळपास सर्व पक्षांमध्ये दिसून येतं. क्रियाशील संस्था निर्माण करणारे लोक जरूर आहेत; परंतु ते फार कमी आहेत.
पॅरिसमधील एक अनुभव सांगून हा लेख संपवतो. पॅरिसमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या जागतिक वर्तमानपत्र संघटनेवर (World Association of Newspaper म्हणजे ‘वॅन’) माझी निवड झाली होती. नंतर दोन-तीन वर्षांत उपाध्यक्षपदावर निवड झाली. तेव्हा पॅरिसमधील मराठी मंडळानं माझा सत्कार करायचं ठरवलं. त्यानिमित्तानं अनेकांच्या भेटी झाल्या. त्यातील एका तरुण उद्योजकाबद्दल मला कुतूहल वाटलं म्हणून मी त्यांच्याशी संवाद साधला. हे ३५-४० वर्षांचे गृहस्थ धाराशिव जिल्ह्यातील एका खेडेगावातले व शेतकरी कुटुंबातले. पदवीधर झाल्यावर नोकरी मिळेना. खूप प्रयत्न केले...मग घरात, गावात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चेष्टा व्हायला सुरुवात झाली. त्याचा प्रचंड मानसिक त्रास व्हायला लागल्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचं ठरवलं.
मनात असा विचार केला, की अशा ठिकाणी जीव द्यायचा की कुणी ओळखणारही नाही. हा विचार का आला ते त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांनी पॅरिसला जायचं ठरवलं. कारण फ्रेंच भाषा येत नव्हती. बारा भानगडी करून हे गृहस्थ पॅरिसला पोहोचले. खिशात थोडेफार डॉलर्स होते, ते एक-दोन दिवसांत संपले. त्यामुळे दिवसभर पॅरिसमध्ये भटकू लागले. एके संध्याकाळी चांगलीच भूक लागली होती. एका छोट्याशा रेस्टॉरंटच्या शेजारी पायरीवर तीन-चार तास बसून राहिले. त्या रेस्टॉरंटच्या मालकाच्या ध्यानात आलं आणि त्यानं फ्रेंच भाषेत विचारलं, ‘काय अडचण आहे?’ यांना ते अर्थातच समजलं नाही.
रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ आली होती. त्या मालकानं खुणेनं विचारलं, ‘काही खायला पाहिजे का?’ यांनी लगेच होकारार्थी खूण केली. जे मिळालं ते खाल्लं. मग पुन्हा मालकानं हावभाव करून विचारलं, ‘इथं झोपायचं आहे का?’ या प्रश्नालाही यांनी ‘होय’ असा प्रतिसाद दिला. मालकानं एक-दोन भांडी घासून-विसळून दाखवली आणि विचारलं,‘हे काम करशील का?’ ‘होय’ असा प्रतिसाद दिला गेला.
सकाळी मालक आला तेव्हा त्याला सर्व भांडी स्वच्छ केली गेलेली, नीटनेटकी ठेवली गेलेली, जागेची जमेल तेवढी स्वच्छता केली गेलेली आढळली. यावर खुश होऊन मालकानं यांना ‘आता इथंच राहा’ असं खुणेनं सुचवलं. आपल्या या मराठी माणसानं फ्रेंच भाषा, पॅरिसची माहिती, रेस्टॉरंटला लागणारी सामानखरेदी वगैरे गोष्टी लवकरच आत्मसात केल्या. भांडी घासणं वगैरे सुरू होतंच.
सहा-सात महिन्यांनी मालकानं खुश होऊन यांना विचारलं, ‘हे रेस्टॉरंट तू हप्त्याहप्त्यानं विकत घेशील का?’ कारण त्या मालकाला मूल-बाळ नव्हतं. यातून या तरुणाचा आयुष्याला कलाटणी मिळाली. पुढील पाच-सहा वर्षांत त्यांनी हे रेस्टॉरंट तर घेतलंच; परंतु आणखीही दोन विकत घेतली. स्वतःचं लग्न करून दोन भावांना, मेहुण्याला पॅरिसमध्ये आणून नवीन घेतलेल्या दोन्ही रेस्टॉरंटची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पुढं त्यांच्या आणखी काही योजना तयार होत्याच. घराबाहेर पडल्यानं प्राणांची बाजी लावल्यानं हा इतिहास घडला.
कोणत्याही यशस्वी माणसामागं कोणती तरी तपश्चर्या असते. तरुणांनो, तुम्ही राजकीय गोष्टींच्या फंदात न पडता जगात कुठंही जाऊन मार्ग काढून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा. कुणाशीही तुलना करू नका. आपला इतिहास हा लढवय्यांचा आहे. तो आता आर्थिक साम्राज्य निर्माण करण्यासाठी वापरायचा आहे. परप्रांतीयांकडून शिका; व्यवहारच नव्हे तर, गोड बोलणंसुद्धा! खात्री आहे, तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमची पुढची पिढी तुमच्या शिदोरीवर आणखी शंभर पावलं पुढं जाईल. दोर कापले गेलेले आहेत...पर्याय नाहीये...त्यामुळे आता लढायचं! आपल्या कमतरतांवर मात करायची. नक्की जमेल...!
(प्रतिक्रिया नोंदवा : व्हॉट्सॲप क्रमांक
८४८४९ ७३६०२)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.