आपल्याकडे ‘मंगळयान’, ‘चांद्रयान’ या गोष्टी आपण करतो; परंतु रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे तयार करतो. साधे रस्ते बांधण्यातसुद्धा आपण ‘आत्मनिर्भर’ नाही आहोत आणि ‘जागतिक स्तरावर अमुक अमुक वर्षी इतक्या ट्रिलियन डॉलर्सची आर्थिक क्षमता निर्माण करू’ म्हणून आपण वल्गना करतो. हे सर्व शक्य आहे, जर या सर्व कामांमध्ये कायदेशीर बंधनं (पारदर्शक व्यवहार) जनतेनं दक्ष राहून पाळायला भाग पाडलं तर...!
गेलं शतक संपायच्या आसपास घडलेल्या; परंतु स्मरणात कायम राहिलेल्या काही गोष्टी...कार्यकारी संचालक म्हणून आमच्या ‘अजय मेटाकेम’चंही काम मी पाहत असे; विशेषतः विक्री-निर्यात वगैरेंवर माझं अधिक लक्ष असे. आम्हाला दोन-तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना तोंड द्यावं लागायचं, त्यामुळे आमच्या ग्राहकांना अधिकाधिक वेगळं काय देता येईल हा आमचा प्रयत्न असे. मग अशी कंपनी आम्हाला प्राधान्यही द्यायची. त्या वेळी आयातीवर बरीच बंधनं असत, त्यामुळे आम्ही परदेशी तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचं भारतीयीकरण करून आमच्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना यशस्वीपणे तोंड देत असू. दुसरा प्रकार होता तो असा, की काही उत्पादनं मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्याशिवाय परवडत नसत. यावर आम्ही अशा उत्पादनांचे विक्रीहक्क भारतासाठी मिळवून आवश्यक तेवढा आणि ग्राहकांच्या गरजेपुरता माल आयात करत असू. आमची निर्यातही होत असल्यानं आम्हाला ते त्यामानानं सोपं जात असे.
याचे दोन फायदे होत. एकतर, आमच्याच ग्राहकाला आणखी एक वेगळं, उपयुक्त उत्पादन देता येत असे. आमची इतर उत्पादनंही ते खरेदी करत असल्यानं आमचा विक्रीचा खर्च (Marketing Cost) कमी होत असे. शिवाय, या उत्पादनाच्या तांत्रिक-आर्थिक बाबी आम्हाला आपोआपच शिकायला मिळत असत.
लंडनमध्ये एका उद्योगधंद्याला लागणारं मेण (Wax) उत्पादन करणारी चांगली कंपनी होती. त्यांची काही उत्पादनं फाउंड्री-व्यवसायासाठी लागत असत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून भारतासाठी विक्रीहक्क मिळवले. मी इंग्लंडला गेलो की त्या कंपनीचे कार्यकारी संचालक विल्यम्स यांना प्रत्यक्ष भेटत असे. त्याचे काही फायदे असत. एकतर त्यांच्याशी व्यक्तिगत स्नेह निर्माण होई आणि ते आणखी नवीन काय करत आहेत याची माहिती मिळत असे.
व्यवसायात विश्वासाला फार मोठी किंमत असते. दोन संस्थांमध्ये असं नातं निर्माण होतं, तेव्हा आपल्या अडीअडचणींत साह्याची भूमिका समोरची संस्था घेते. आमच्या भेटीगाठी आणि व्यवसायवृद्धी या दोन्ही गोष्टी होत गेल्या आणि आमच्यातील व्यक्तिगत स्नेहही वाढला.
सुरुवातीच्या काही काळानंतर आम्ही दोघं एकेदिवशी जेवायला गेलो. मीच बोलावलं होतं.
मी त्यांना म्हटलं, ‘‘सुरुवातीला चहा वगैरे घेणार का?’’
ते म्हणाले,‘‘मी चहा पीत नाही.’’
मग म्हटलं, ‘‘लिंबू-सरबत वगैरे.’’
त्यावर ते म्हणाले, ‘‘ते चालेल; परंतु त्यात साखर नको.’’
‘जेवायच्या पदार्थांमध्ये मसाला वापरलेले पदार्थ मी खात नाही,’ असं त्यांनी बजावलं. मला आता राहवलं नाही.
मी मिश्किलपणे त्यांना म्हटलं, ‘‘एक गोष्ट विचारू का? राग तर येणार नाही ना?’’
ते म्हणाले, ‘‘अवश्य विचारा... आता आपण मित्र आहोत.’’
मी सुरुवात केली. ‘‘तुम्ही चहा पीत नाही...साखर खात नाही... मसाल्याचे पदार्थ टाळता...हे एवढं आहे तर मग आमच्या देशावर कशासाठी व्यापाराच्या निमित्तानं राज्य केलंत?’’
त्यांना एकदम हसू कोसळलं. ते म्हणाले, ‘‘खरंच की! मी कधी असा विचारच केला नव्हता!’’
अशा नात्यांतून अनेक सवलती, तांत्रिक माहिती मिळवणं सोपं जातं. शेवटी, व्यवसाय काय किंवा संस्था काय; माणसंच काम करत असतात.
असाच एक वेगळा अनुभव जर्मनीमधील. जर्मनीतील डुसलडॉर्फ या गावी मला वर्षातून दोन-तीन वेळा जावं लागत असे. तिथंही वरीलप्रमाणे नातं निर्माण झालेलं होतं.
जर्मनीमध्ये शिकलेल्या काही लोकांनी एक संस्था पुण्यात निर्माण करायचं ठरवलं. त्यांपैकी बहुतेक जण माझे वडीलबंधू माधवराव यांच्या बरोबरचे किंवा परिचयातील होते. या संस्थेअंतर्गत जर्मन कुटुंबीयांना दरवर्षी भारतात बोलवायचं... त्यांची कुणाच्या तरी घरी राहायची सोय करायची...यातून भारतीय संस्कृतीची त्यांना ओळख होईल...व्यक्तिगत स्नेह निर्माण होईल...अशी कल्पना होती. गणेशोत्सवाच्या सुमारास जर्मनीत सुट्ट्या असतात, त्यामुळे त्यांनाही ते सोईचं असे. शिवाय, या काळात आपलं सांस्कृतिक दर्शनही सहजरीत्या त्यांना होऊ शकणार असे.
जर्मनीत किंवा काही प्रगत देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम संपल्यावर निदान सहा महिने अप्रगत देशांत अनुभव घेणं आवश्यक असतं. आपल्या मुलीला भारतात पाठवावं असं एका जर्मन व्यक्तीला वाटलं. मुलीचीही तशी इच्छा होती.
‘कुठं पाठवणं सोईचं ठरेल आणि सुरक्षितही असेल,’ अशी चौकशी त्यांनी काळजीपोटी साहजिकच केली.
‘भारतात; विशेषतः पुण्यात, प्रयत्न करा, तिथं शक्य होईल,’ असं त्यांच्या एका परिचितांनी त्यांना सांगितलं. थोडक्यात म्हणजे, ती मुलगी माधवरावांच्या घरी पोहोचली. भविष्यकाळात ती त्यांची सून झाली ही गोष्ट वेगळी!
मी तिच्या वडिलांना मधूनमधून भेटत असे. ते एका मोठ्या प्रकल्पावर प्रमुख या नात्यानं काम करत होते. जिथं बांधकाम सुरू होतं तिथं त्यांनी मला बोलावलं. ऱ्हाईन नदीच्या तळाखालून एक बोगदेवजा मोठा रस्ता ते तयार करत होते. सुमारे पाच-सहा हजार कोटी रुपयांचा तो प्रकल्प होता. ते त्याचे प्रमुख होते. या बोगद्यामुळे काय काय फायदे होतील यासह, नवीन कोणती तंत्रज्ञानं ते वापरत आहेत, याची थोडीफार माहिती मला त्यांनी दिली. प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात होता.
मी सहज विचारलं, ‘‘प्रकल्पाची पूर्तता होऊन पहिली गाडी केव्हा बाहेर पडेल?’’
ते म्हणाले, ‘‘थोडं थांबा...मी जरा बघून सांगतो.’’
काही मिनिटांनी ते कागदपत्रं पाहून म्हणाले, ‘‘येत्या २६ डिसेंबरला, संध्याकाळी चार वाजता!’’
मी बेशुद्ध पडायचाच बाकी राहिलो होतो!
आपल्याकडे वर्षानुवर्षं प्रकल्प चालतात, गुणवत्तेची खात्री नाही. वेळ आणि खर्च यांचा ताळमेळ नाही आणि हे जर्मन गृहस्थ तासामध्ये बोलताहेत!
मी म्हटलं, ‘‘तुमची खात्री आहे?’’
ते म्हणाले, ‘‘हा जर्मन शब्द आहे.’’
मला हे काहीसं पटलं नव्हतं किंवा विश्वास ठेवायला कठीण जात होतं. मी डिसेंबरच्या २६ तारखेला तिकडची वेळ साधून संध्याकाळच्या साडेचार वाजता त्यांना मुद्दाम फोन केला.
ते उत्तरले, ‘‘होय, पहिली गाडी चार वाजता बाहेर पडली!’’
गप्प बसण्याशिवाय मला मार्ग नव्हता. त्यांचं अभिनंदन करत मी फोन ठेवला.
आपल्याकडे ‘मंगळयान’, ‘चांद्रयान’ या गोष्टी आपण करतो; परंतु रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे तयार करतो. जनतेचे शेकडो कोटी रुपये दरवर्षी सर्व नगरपालिका - अगदी मुंबईपासून - निर्लज्जपणे खड्डेदुरुस्तीवर खर्च करतात. हे राजकीय, सरकारी अधिकारी आणि बांधकाम-व्यावसायिक यांच्या संगनमताशिवाय शक्य नाही हे जनतेला कळतं; परंतु कुणी जाब विचारत नाही किंवा संबंधितांना कुणी कोर्टात खेचत नाही.
साधे रस्ते बांधण्यातसुद्धा आपण ‘आत्मनिर्भर’ नाही आहोत आणि ‘जागतिक स्तरावर अमुक अमुक वर्षी इतक्या ट्रिलियन डॉलर्सची आर्थिक क्षमता निर्माण करू’ म्हणून आपण वल्गना करतो. हे सर्व शक्य आहे, जर या सर्व कामांमध्ये कायदेशीर बंधनं (पारदर्शक व्यवहार) जनतेनं दक्ष राहून पाळायला भाग पाडलं तर...! आपल्याला समजतं आहे...आपण प्रयत्न करत राहू...देशाच्या, समाजाच्या चांगल्या भवितव्यासाठी. गप्प बसायला नको, जागरूक राहूया.
(प्रतिक्रिया नोंदवा : व्हॉट्सॲप क्रमांक
८४८४९ ७३६०२)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.