आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी पथ्यम रेस्टॉरंट

येथे ग्राहकांना १०० प्रकाच्या आयुर्वेदिक रेसिपींचा आस्वाद घेता येणार आहे. देशी गाईच्या दुधापासून आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेल्या तुपाचा वापर आम्ही करतो. मिष्टी दही करताना मधाचा वापर केला आहे.
पथ्यम आयुर्वेदिक रेस्टॉरंटचे उद्‍घाटन ॲड. एस. के. जैन यांच्या हस्ते झाले
पथ्यम आयुर्वेदिक रेस्टॉरंटचे उद्‍घाटन ॲड. एस. के. जैन यांच्या हस्ते झाले
Published on
Updated on

पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या अन्नपदार्थांच्या रेसिपींचा आपल्याला आता आस्वाद घेता येणार आहे, तो ‘पथ्यम’ या रेस्टॉरंटमध्ये. ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे चंद्रकांत भरेकर यांनी. भुकूम (जि. पुणे) येथे चंद्रकांत भरेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी थारपारकर या देशी गाईच्या संवर्धनासाठी ‘वृंदावन थारपारकर देशी काऊ क्लब’ सुरू केला. या क्लबच्या माध्यमातून त्यांनी पुण्यातील ग्राहकांना देशी गाईच्या दुधाचा पुरवठादेखील सुरू केला. याच्या पुढचे पाऊल म्हणजे पथ्यम रेस्टॉरंट...    ‘पथ्यम’ या नावामध्येच खासीयत दडलेली आहे. याबाबत माहिती देताना चंद्रकांत भरेकर म्हणाले, की आहारात आयुर्वेदाला महत्त्व आहे. त्याचबरोबरीने व्यायामही महत्त्वाचा. आपला आहार शुद्ध असेल, तर विचार शुद्ध राहतील. बदलत्या जीवनशैलीमध्ये आपला आहारही बदलला, त्याचे परिणाम  आरोग्यावर दिसायला लागले. हे लक्षात घेऊन आयुर्वेदाच्या दृष्टीने सात्त्विक आहार नेमका कसा असतो, हे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही ‘पथ्यम’ची सुरवात केली. या ठिकाणी आमच्याच शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला विविध खाद्यपदार्थांमध्ये वापरतो. त्याचबरोबरीने देशी गाईचे दूध, तूप, लोण्याचाही वापर करतो. रेस्टॉरंटच्या परिसरात भारतीय मसाल्यांची माहिती देणारे ‘स्पाईस पार्क’ आहे. तसेच नक्षत्र वनही उभारले आहे. या निसर्गरम्य ठिकाणी २०० थारपारकर गाईंचा गोठा आहे. त्याचबरोबरीने पंचकर्म उपचारांचीही सोय आम्ही केली आहे.   आयुर्वेदिक आहार पद्धतीबाबत माहिती देताना डॉ. आमोद साने म्हणाले, की रेस्टॉरंटमधील पदार्थ हे आयुर्वेदात सांगितलेल्या रेसिपीप्रमाणेच तयार केले जातात. येथे ग्राहकांना १०० प्रकाच्या आयुर्वेदिक रेसिपींचा आस्वाद घेता येणार आहे. देशी गाईच्या दुधापासून आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेल्या तुपाचा वापर आम्ही करतो. मिष्टी दही करताना मधाचा वापर केला आहे. ताकाचेही विविध प्रकार आहेत. विविध खाद्यपदार्थांमध्ये दूध, तूप, दही, मध आणि साखरेचा वापर करून बनविलेले पंचामृत आम्ही वापरतो. आहारात नाचणीचा वापर वाढविण्यासाठी भाकरी, डोसा, नाचणीचा मिल्कशेक येथे उपलब्ध आहे. पनीरनिर्मिती करताना शिल्लक रहाणाऱ्या ‘व्हे’चा वापर सूपनिर्मितीमध्ये  करतोय. त्यामुळे पौष्टिक घटक आपल्या शरीरात जातात. आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. चहाला पर्याय म्हणून कहावा हे पारंपरिक काश्मिरी पेय आम्ही देतो. यामध्ये केशर, दालचिनी आणि मधाचा स्वाद आहे. थोडक्यात आयुर्वेदाप्रमाणे सात्त्विक आहार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे.  वसुबारसेच्या (ता. १६) निमित्ताने पथ्यम या आयुर्वेदिक रेस्टॉरंटचे उद्‍घाटन ॲड. एस. के. जैन यांच्या हस्ते झाले. या वेळी सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर, पशुसंवर्धन आयुक्‍त कांतिलाल उमाप, दै. ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, वृंदावन थारपारकर देशी काऊ क्लबचे चंद्रकांत भरेकर, ग्रीन फार्मसीचे डॉ. अमोद साने, सूर्यदत्ता ग्रूप आॅफ इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संजय चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com