
Cold Weather Farming Tips :
शेतकरी नियोजन पीक : केळी
शेतकरी : सुधाकर चांगदेव झोपे
गाव : खिरोदा, ता. रावेर, जि. जळगाव
एकूण क्षेत्र : १२ एकर
सुधाकर झोपे यांची खिरोदा (ता. रावेर, जि. जळगाव) शिवारात १२ एकर काळी कसदार जमीन आहे. केळी प्रमुख पीक असून मोसंबीचे उत्पादनही ते घेतात. रब्बीत गहू, हरभरा यांसह हंगामी पिकांची लागवड केली जाते. श्री. झोपे यांचे निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याचा प्रयत्न असतो.
केळीमध्ये नवती किंवा मृग बहर (जून, जुलै लागवड) असते. लागवडीसाठी १०० टक्के उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला जातो. तसेच काही वेळेस कंदांचाही उपयोग करतात. अर्धा फूट उंच व पावणेचार फूट रुंद गादीवाफ्यावर सहा बाय साडेपाच फूट अंतरावर लागवड केली जाते. लागवडीसाठी ग्रॅण्ड नैन या जातीच्या केळी रोपांची निवड केली जाते. सिंचनासाठी सिंगल लॅटरलचा वापर केला जातो. बेवडसाठी हरभरा पीक घेतले जाते. पाल (ता. रावेर) कृषी विज्ञान केंद्रातील प्रमुख महेश महाजन, डॉ. धीरज नेहेते, शेतकरी डिगंबर नेहेते यांचे मार्गदर्शन त्यांना केळी उत्पादनामध्ये मिळते.
व्यवस्थापनातील बाबी
लागवड करण्यापूर्वी मागील पीक अवशेष जमिनीमध्ये गाडून घेतले. तसेच शेणखताचा वापर करण्यात आला. त्याचा केळी पिकास चांगला फायदा होत असल्याचे सुधाकर झोपे सांगतात.
लागवडीपूर्वी खोल नांगरणी करून जमीन भुसभुशीत केली. त्यानंतर रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. त्यात प्रति एक हजार झाडांना दोन गोण्या १०ः२६ः२६ दिले.
सिंचनासाठी ताशी चार लिटर पाण्याचा विसर्ग होणाऱ्या १२ मिलिमीटरच्या लॅटरल टाकून घेतल्या.
लागवडीसाठी अर्धा फूट उंच व पावणेचार फूट रुंदीचे गादीवाफे तयार केले. लागवडीपूर्वी गादीवाफे चांगले भिजवून घेतले.
रोपांची उपलब्धता करून सहा बाय साडेपाच फूट अंतरावर लागवड केली. लागवडीनंतर वाफसा स्थिती कायम राखण्यावर भर दिला.
लागवडीनंतर पाचव्या दिवशी शिफारशीत बुरशीनाशकांची आळवणी केली.
जूनमध्ये उष्णता अधिक होती. त्यानंतरही उष्णतेचे प्रमाण होते. या काळात रोपांची व्यवस्थित सेटिंग होण्यासाठी सिंचन व्यवस्थापनावर भर देण्यात आला.
पीक संरक्षण
केळी लागवडीमध्ये कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे नवीन रोपांचे मोठे नुकसान होते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत घटकांच्या फवारण्या घेण्यात आल्या. तसेच अन्य उपाययोजनांवर भर देण्यात आला.
साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये सिगाटोका या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्यास सुरुवात होते. या रोगाच्या प्रादुर्भाव पानांवर होतो. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होऊन पिकावर अनिष्ट परिणाम दिसून येतात. त्यासाठी शिफारशीत बुरशीनाशकांच्या फवारण्या घेण्यात आल्या आहेत.
मागील कामकाज
नवती केळी बाग सध्या सात महिन्यांची झाली आहे. बागेत सध्या निसवण सुरू आहे. मागील महिनाभरात थंडी अधिक होती. किमान तापमान चांगले घसरले होते. या काळात रात्रीच्या वेळेस अधिकाधिक पाणी देण्यावर भर दिला.
शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांच्या योग्य मात्रा दिल्या. प्रति एक हजार झाडांना पाच किलो पोटॅश, अडीच किलो युरिया व एक किलो मॅग्नेशिअम सल्फेट दिले.
फण्यांची विरळणी करून घेतली. फक्त सात फण्या झाडावर ठेवल्या आहेत.
थंडीपासून बचावासाठी घड केळीच्या कोरड्या पानांचा चुडा करून झाकून घेतले. घडांच्या वजनामुळे झाड वाकण्याची शक्यता असते. त्यासाठी घड दोरीच्या साह्याने झाडास बांधून घेतले.
फुटवे दर आठ ते १० दिवसांनी कापून घेतले.
कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेचे सातत्याने निरीक्षण केले. बागेत करपा रोग व अन्य समस्यांचे निरीक्षण सतत सुरू आहे. बाग स्वच्छ ठेवण्यावर अधिक भर देण्यात आला.
पुढील नियोजन
आगामी काळात बागेत निसवण सुरूच राहणार आहे. थंडीचे प्रमाण कमी-अधिक होत आहे.
मागील महिन्याच्या अखेरीस ३ ते ४ दिवस पाऊस झाला. ढगाळी हवामान स्थिती देखील होती. या काळात सिंचन बंद ठेवले. सध्या बागेत वाफसा स्थिती कायम ठेवण्यावर भर राहील.
वेळापत्रकानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये व सरळ खते दिली जातील.
निसवणीच्या बागेत घड सतत केळीच्या कोरड्या पानांच्या चुड्याने झाकून घेतले जातील.
या महिन्यात बाग ६० ते ६५ टक्के निसवणार आहे. यामुळे खतांची योग्य मात्रा पिकास दिली जाईल.
बागेची करपा रोगासाठी नियमितपणे पाहणी केली जाईल. रोगाची लक्षणे दिसून आल्यास त्वरित शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाईल.
दर १० दिवसांनी केळफूल काढण्याची कार्यवाही केली जाईल.
नियमितपणे फुटवे काढून घेतले जातील.
घडांचा दर्जा राखण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी घेतली जाईल.
आगामी काळात थंडीची तीव्रता अधिक राहिल्यास रात्रीच्या वेळी सिंचन करण्यावर भर दिला जाईल. थंडीची तीव्रता कमी राहिल्यास दर दोन दिवसाआड सिंचन केले जाईल.
खत व्यवस्थापन
लागवडीनंतर ३० दिवसांनी रासायनिक खतांचा दुसरा बेसल डोस दिला. त्यानंतर वेळापत्रकानुसार विद्राव्य खते देण्यास सुरुवात केली.
विद्राव्य खतांमध्ये १९ः१९ः१९ प्रति एक हजार झाडांना चार किलो प्रमाणे देत आहे. त्यासोबत सूक्ष्मअन्नद्रव्येही दिली. बाग दीड महिन्याची झाल्यानंतर हे खते देण्यात आली.
बाग तीन महिन्यांची झाल्यानंतर १३ः०ः४५ हे खत दर आठ दिवसांनी प्रति एक हजार झाडांना चार किलो या प्रमाणे दिले. याच कालावधीत पोटॅश ५ किलो व युरिया अडीच किलो या प्रमाणे एक वेळा देण्यात आले.
दर आठ दिवसांनी १३ः०ः४५ हे खत चार किलो प्रति एक हजार झाडे या प्रमाणे देत आहे.
दर आठ दिवसांनी केळी लागवडीमध्ये जिवामृताचा वापर केला जात आहे.
-सुधाकर झोपे, ९४२१५१५५८२
(शब्दांकन : चंद्रकांत जाधव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.