
Agriculture Success Story : गोराणे (ता.सटाणा,जि.नाशिक) येथील देसले कुटुंबीयांतील चार पिढ्यांच्या कष्टमय वाटचालीतून शेतीत प्रगती साधली आहे. १९६० पूर्वी या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. पहिल्या पिढीतील कै.अनाजी देसले आणि त्यांची मुले सुकदेव आणि नारायण उदरनिर्वाहासाठी काही काळ मध्यप्रदेशात स्थलांतरित झाली होती. कुटुंबावर वारकरी संप्रदायाचा पगडा असल्याने ते मूळ गावी परतले.
स्थानिक ठिकाणी लाकूड खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय केला. १९८२ सालापर्यंत कुटुंबाची अवघी सहा एकर जमीन होती. त्यावेळी बाजरी, मूग, कुळीथ ही जिरायती पिके घेतली जायची. त्यातून मिळणारे उत्पन्न जेमतेम होते. पैशांची जमवाजमव करून १९८२ साली पाइपलाइन केली. शिवारात पाणी आल्यानंतर कोबी, वांगी, टोमॅटो, ऊस अशी नगदी पिके ते घेऊ लागले.
भाजीपाला पिकात दरातील अस्थिरता व मजुरांची समस्या असल्याने अडीच दशके अखंडित भाजीपाला उत्पादन थांबविले. आता केळी, डाळिंब, कांदा उत्पादनात या कुटुंबाने विशेष ओळख मिळविली आहे. कसमादे भागात केळी उत्पादन घेणारे ते पहिले कुटुंब ओळखले जाते. सहा एकारावरून आता ५५ एकरांपर्यंत शेतीचा विस्तार झालेला आहे.
संकटांनी घेरले, पुन्हा जिद्दीने सावरले
१९८२ सालापासून पाण्याची सोय झाल्यानंतर १९९० पर्यंत भाजीपाला पिकांतून प्रगती साधली. तर पुढे डाळिंब व ऊस शेतीचा विस्तार होत गेला. मात्र वेळेवर ऊस तोड होत नसल्याने २००२ नंतर ऊस लागवड थांबली. २०१४ साली गारपिटीने मोठे संकट कुटुंबावर कोसळले.त्यातच तेलकट डाग, मर रोगामुळे डाळिंब लागवड अडचणीत सापडली. त्यामुळे ३० एकर डाळिंब बाग लागवड काढून टाकण्याची वेळ आली.
१५ एकर उन्हाळ कांदा, हरभरा, टोमॅटो पिके उध्वस्त झाली होती. पुढे दोन वर्ष चांगले उत्पादन आणि उत्पन्नही नव्हते, जमीन साथ देत नव्हती. पीक बदल म्हणून आले लागवड केली, मात्र त्यातही अपेक्षित यश आले नाही. आगाप द्राक्ष उत्पादनाच्या अनुषंगाने लागवडी केल्या, मात्र २०१९ साली अतिवृष्टीच्या तडाख्यात काढणीयोग्य द्राक्ष घड मातीमोल झाले. मात्र हा परिवार खचला नाही, संकटांना धैर्याने सामोरा गेला.
केळी लागवडीला चालना
कुटुंबातील सर्व भावंडे आणि त्यांची मुले सुशिक्षित आहेत. मात्र नोकरीमागे न धावता त्यांनी शेतीला सर्वस्व मानले आहे. डाळिंबातून खऱ्या अर्थाने उत्पन्नवाढ साधली आहे. कसमादे भागात पहिल्यांदाच २००६ साली नवीन पीकप्रयोग म्हणून एक एकर केळी लागवड केली. सुरुवातीच्या काळात उत्पादन घेताना अडचणी आल्या. मात्र त्यांनी बारकावे व उत्पादन तंत्र अभ्यासून कामकाज केल्याने केळी हक्काचे पीक झाले होते.
२०१२ पर्यंत हे क्षेत्र १४ एकरपर्यंत विस्तारले होते. मात्र पाणीटंचाईमुळे पुन्हा केळी पीक अडचणीत सापडले. पुढे आठ वर्षे केळी पीक नव्हते. द्राक्षशेतीच्या नुकसानीला कंटाळून २०२० सालापासून टप्प्याटप्प्याने केळी लागवडीचा विस्तार केला. हे क्षेत्र आता १६ एकरांपर्यंत विस्तारलेले आहे. द्राक्ष, डाळिंबाच्या पट्ट्यात त्यांनी केळी बागा फुलविलेल्या आहेत. या प्रवासात त्यांना केळीतज्ञ के.बी.पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. देसले कुटुंबीयांचे कामकाज पाहून अनेकजण केळी लागवडीकडे वळले आहेत.
केळी पीक ठरले फायद्याचे
केळी पिकात हंगामी कामकाज १० महिन्यांचे, द्राक्ष, डाळिंबापेक्षा तुलनेत कामकाज सोपे असते. फेब्रुवारीमध्ये एकाचवेळी १० ते १५ एकरावर लागवड जी नाईन जातीची लागवड केली जाते. कंदाच्या दोन्ही बाजूला इनलाईन लॅटरल असते. पिकाच्या गरजेनुसार विद्राव्य खताचा वापर केला जातो. एकरी एकूण उत्पादन खर्च १.२५ लाखांपर्यंत होतो असे नितीन देसले सांगतात.
पीक नियोजन
- लागवडीचे अंतर...६ फूट बाय ५ फूट
- एकरी झाडांची संख्या...१३००
- एकरी सरासरी उत्पादन ...३५ ते ४० टन
केळी निर्यातीला सुरुवात
देशात जम्मू काश्मीर, हरियाणा, राजस्थान व दिल्ली बाजारात मागणीनुसार व्यापाऱ्यामार्फत केळी पाठवली जातात. केळीची निर्यातक्षम प्रतवारी असल्याने दुबई, इराण, सौदी अरेबिया येथे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून केळीची निर्यात होऊ लागली आहे. थेट शेतावर काढणीपश्चात प्रतवारी होऊन निर्यात होते. त्यामुळे चांगले दर मिळतात. बाजारात ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान मागणी असल्याने चांगले दर असतात. थंडीत मागणी घटते, मात्र १५ जानेवारीनंतर पुन्हा दर वाढतात, असा देसले यांचा अनुभव आहे.
गेल्या तीन वर्षांतील प्रति किलो दर
वर्ष...किमान...कमाल...सरासरी
२०२१...७...१४...१०
२०२२...१०...२०...१५
२०२३...१२..२४...१६
केळी बागेचे नियोजन
-लागवड करण्यापूर्वी एकरी तीन ट्रॉली शेणखत; वाढीच्या अवस्थेत विद्राव्य खतांची मात्रा.
- बागेची काटेकोर स्वच्छता. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव नाही.
- वाफसा तपासून सिंचन. झाडांच्या अतिरिक्त डेरांची, खराब पानांची काढणी.
- गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी घडांवर ८ ते ९ फण्यांची मर्यादित संख्या.
- झाडाला योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश मिळण्याचे नियोजन.
- निर्यात होण्यासाठी रासायनिक अवशेषमुक्त केळी उत्पादनावर भर.
वारकरी आदर्श जपणारे एकत्रित कुटुंब
चौथ्या पिढीत २१ जणांचे एकत्रित देसले कुटुंब गुण्यागोविंदाने नांदते आहे. हभप.कृष्णा माऊली, हभप. तुकाराम महाराज गोराणेकर यांचा विचारांचा प्रभाव कुटुंबावर आहे. ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन आणि तरुण पिढीचे शेतीत नियोजन असे या कुटुंबातील शेतीचे सूत्र आहे. पहिल्या पिढीतील अनाजी यांच्यानंतर दुसऱ्या पिढीत मुले सुकदेव आणि नारायण हे दोघेही वारले.
आता सुकदेव यांची मुले अण्णा, बाळासाहेब आणि नारायण यांची मुले बापू, हरी व विष्णू असे सर्वजण आजही एकत्र आहेत. चौथ्या पिढीतील नितीन हे कृषी पदवीधर, प्रवीण (एमबीए), प्रशांत हे स्थापत्य अभियंता, प्रमोद(एबीएम), मनोहर(बीएससी), प्रतीक (संगणक अभियंता), सुयश(स्थापत्य अभियंता), सुदर्शन(स्थापत्य पदविकाधारक) आहे.
सर्वांना शेतीची गोडी आहे. शेतीसोबत घरच्या दावणीला ४० जनावरे आहेत. यामध्ये गीर व खिलार १५ गायी, १० म्हशी आणि दोन बैल आहेत. कुटुंब केंद्रीत शेतीचा विस्तार करताना प्रत्येकजण आपले काम वेळेवर आणि अचूक करतो. एकत्रित कुटुंब पद्धती मोजकीच उरली आहेत, त्यापैकी व्यावसायिक पद्धतीने शेतीत प्रगती साधताना साधेपणा जपणारी अशी माणसे दुर्मीळच म्हणावी लागतील.
शेतीचा विस्तार
केळी...१६ एकर
डाळिंब...१३ एकर
कांदा...१५ एकर
चारा पिके...४
मका... १० एकर
शेतीचा विकास
-पाण्यासाठी मोसम नदीवरून दोन पाईप लाईन, ४ विहिरी.
-संरक्षित पाणी साठ्याकरिता १.५० कोटी लिटर शेततळ्याची निर्मिती.
- काटेकोर सिंचन व्यवस्थापनासाठी चाळीस एकर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन प्रणाली.
- कांदा लागवड पूर्णतः ठिबक सिंचनावर.
संपर्क: नितीन देसले, ९९६०५८०९६८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.