Rabi Crop Management : रब्बी पिकांत संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्त्वाचे

Crop Nutrient Management : रब्बी पिकांना योग्य खतांच्या संतुलित मात्रा न दिल्यास उत्पादनातही घट येते. तसेच जमिनीचा पोतही बिघडतो. त्यासाठी रब्बी पिकांनी संतुलित खत आणि पाणी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
Rabi Crop
Rabi CropAgrowon
Published on
Updated on

Rabi Season Crop Management : राज्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, कांदा, करडई, सूर्यफूल इत्यादी मुख्य पिकांची लागवड केली जाते. राज्यात रब्बी पिकांची उत्पादकता कमी आहे. उत्पादन वाढीसाठी खत व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी योग्य नियोजनाबरोबरच रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर होणे आवश्यक आहे. पिकांना योग्य खतांच्या संतुलित मात्रा न दिल्यास उत्पादनातही घट येते. तसेच जमिनीचा पोतही बिघडतो. त्यासाठी रब्बी पिकांनी संतुलित खत आणि पाणी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.

गहू

  • बागायती गहू पिकासाठी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे

  • बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. त्यापैकी निम्मे नत्र, तर स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेली नत्राची निम्मी मात्रा पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावी.

  • उशिरा पेरणीसाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळेस द्यावे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावे.

  • जमिनीमध्ये लोहाची किंवा झिंकची कमतरता असल्यास, २० किलो फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेटची मात्रा शेणखतातून द्यावी. (ही मात्रा १०० किलो शेणखतामध्ये १५ दिवस मुरवून त्यानंतर द्यावे)

  • गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन १९:१९:१९ किलो (नत्र: स्फुरद: पालाश) या विद्राव्य खतांची किंवा २ टक्के डीएपी खताची पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसांनंतर फवारणी करावी. विद्राव्य खत फवारणीसाठी १९:१९:१९ किंवा डीएपी खताचे २ टक्के द्रावण तयार करण्यासाठी २० ग्रॅम खत मात्रा प्रति लिटर पाण्यात मिसळून घ्यावी.

Rabi Crop
Rabi Crop Management : कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पिकांचे नियोजन

कांदा

  • लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर २५ ते ३० टन चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी प्रमाणे द्यावे. शेणखतासोबत गंधक ४५ किलो प्रति हेक्टरी प्रमाणे १५ दिवस अगोदर द्यावे.

  • लागवडीच्या वेळी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. उर्वरित ५० किलो नत्राची मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावी.

सूर्यफूल

  • कोरडवाहू पिकास चांगले कुजलेले शेणखत २.५ टन, तसेच ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश प्रति हेक्टरी प्रमाणे पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून घ्यावे.

  • बागायती पिकास हेक्टरी ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश द्यावे. उरलेल्या ३० किलो नत्राची मात्रा पेरणीनंतर एक महिन्याच्या आत द्यावी.

  • गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीत हेक्टरी २० किलो गंधक पेरणीच्या वेळी गांडूळ खतातून द्यावे.

Rabi Crop
Rabi Crop Management : नियोजन रब्बी हंगामातील पिकांचे...

करडई

  • करडई हे पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. पिकास ५० किलो नत्र (११०किलो युरिया) आणि २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी प्रमाणे देणे आवश्यक आहे. ही खते पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत. बागायती करडई पिकास ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.

हरभरा

  • खरीप हंगामात जमिनीत शेणखताची मात्रा दिली नसल्यास, रब्बी पिकांसाठी चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ५ टन प्रमाणे पेरणीपूर्वी द्यावे.

  • हरभरा पिकास पेरणी करताना २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ३० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. किंवा हेक्टरी १२५ किलो डीएपी आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाण्यालगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरून द्यावे. खतमात्रा विस्कटून देऊ नये.

  • पीक फुलोऱ्यात असताना आणि घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये असताना किंवा या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास २ टक्के युरिया किंवा २ टक्के डीएपीची फवारणी करावी.

  • पेरणीनंतर ३० व ४५ दिवसांनी १ टक्का पोटॅशिअम नायट्रेट व २ टक्के डीएपीची स्वतंत्ररीत्या फवारणी करावी.

- डॉ. आदिनाथ ताकटे, : ९४०४०३२३८९

(मृद्‍ शास्त्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा

फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com