
डॉ.शिवाजी थोरात
Agriculture Innovation : आज पिकांना आवश्यक सतरा अन्नद्रव्यांच्या सोबत सिलिकॉन अन्नद्रव्याची सुद्धा गरज आहे. या विषयीचे मूलभूत संशोधन प्रसिद्ध जर्मन शास्त्रज्ञ जस्टीस व्हॉन लेबेग यांनी १८४० मध्ये विविध पिकांवर याचे प्रयोग करून प्रसिद्ध केले आहे. आज जगभरातील विविध देशांमध्ये याचा वापर वाढताना दिसत आहे. जमिनीमध्ये सिलिकॉनचे प्रमाण २०० ते ३५० ग्रॅम प्रति किलो माती एवढे आहे परंतु ते पिकांना उपलब्ध स्वरूपात नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. रासायनिक खतांबरोबरच सिलिकॉनचा वापर सर्वच पिकांना फारच फायदेशीर ठरत असल्याचे अनेक देशांमध्ये विविध प्रयोगांनुसार सिद्ध झाले आहे.
केळीपिकामध्ये वापर
सिलिकॉनचा वापर केल्यास केळीची उत्पादकता वाढण्यासाठी खूप वाव आहे. तसेच यावर उपयुक्त संशोधन झाले आहे.
कर्नाटकातील मुडिगेरी येथील डॉ. हनुमंतय्या यांनी केलेल्या प्रयोगानुसार सिलिकॉनचा ४ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणीद्वारे लागवडीनंतर ७५ दिवसांनी दर १५ दिवसांनी ६ वेळा वापर केला असता टिकवणक्षमता (६.३३ दिवस) एकूण विद्राव्य साखर (२६ ६७ ब्रिक्स ) घटणारी साखर (१९.९३ टक्के) तर न घटणारी साखर (२.२४ टक्के) असा फरक गुणवत्तेवर दिसून आला.
कर्नाटकातील केआरसी कृषी महाविद्यालय, अरभावी येथील प्रयोगानुसार हेक्टर ७५० किलो सिलिकॉन (डायमाइट अर्थ) वापरले असता उत्पादन वाढीबरोबरच पांढरी माशीचा प्रादुर्भाव १५.४१ टक्यांनी कमी झाला. सिगाटोका रोगाचे प्रमाण २६.६७ टक्यांनी कमी झाले. पानांमधील अन्नद्रव्य शोषणाचे प्रमाण तपासले असता नत्राचे प्रमाण ३.४८ टक्यांनी वाढले, स्फुरदाचे प्रमाण ०.३७ टक्यांनी वाढले, पोटॅशचे प्रमाण ४.२३ टक्क्यांनी वाढले. याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाणही वाढले.
कर्नाटकातील बागलकोट येथील फळबाग संशोधन केंद्रातील प्रयोगानुसार हेक्टरी ७५० किलो सिलिकॉन (डायमाइट अर्थ) आणि पोटॅशिअम सिलिकेटचा एकत्रित वापर केला असता एका केळीचे वजन ३५ ग्रॅम ने वाढले , लांबी २.९३ सेंमी ने वाढली.
केळीची जाडी (आकारमान) ३. ९५ सेंमीने वाढले, घडामधील केळींची संख्या सरासरी २ केळी प्रति घोसाने वाढली, घडाची लांबी १०.२९ सेंमीने वाढले घडाचे वजन सरासरी ६ किलोने वाढल्याचे दिसून आले. हेक्टरी २०.४८ टनांची वाढ सिलिकॉन व पोटॅशिअम सिलिकेटच्या एकत्रित वापराने दिसून आले. सिलिकॉनचा वापर करून खर्च व उत्पन्नाचे गुणोत्तर १:२. २९ असे दिसून आले.
तमिळनाडूतील अन्नामलाई कृषी विद्यापीठमध्ये केळीच्या उत्पादनात हेक्टरी १४.४२ टक्यांनी वाढ दिसून आली. सिलिकॉनच्या वापरामुळे नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचे शोषण वाढणे, प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये वाढ झाली. केळीची टिकवणक्षमता, गुणवत्ता व फळातील साखर यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वाढ झाल्याचे दिसून आले.
घड सटकण्यावर नियंत्रण
गारपीट, वादळ किंवा उष्ण तापमान यामुळे केळीचा घड मोडून पडतो. तसेच यामुळे केळीची पाने फाटतात पण सिलिकॉनचा वापर केल्यास खोड तसेच घडाचा दांडा आणि पाने मजबूत व कणखर बनतात. त्यामुळे घड सहजा सहजी वाकत किंवा मोडत नाही, पानेही फाटण्याचे प्रमाण खूप कमी होते.
केळीच्या फळावर अपाय होऊन बऱ्याच वेळा काळे डाग पडतात किंवा कीटकांद्वारे रसशोषण केल्यामुळे असे डाग पडतात, परंतु सिलिकॉनचा फळांवर फवारणीद्वारे वापर केल्यास हे डाग नाहीसे होतात. फळाची प्रत सुधारते असे निदर्शनास आले आहे.
पिकातील ताणतणाव नियंत्रण
पिकाच्या उत्तम वाढीसाठी १५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. उन्हाळ्यात तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. थंडीत ते ५ ते ६ अंश अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते. अशा वेळी पिकांची मुळे अकार्यक्षम बनतात. त्यामुळे जमिनीतून होणार अन्नपुरवठा व ऑक्सिजनचा पुरवठा कमी कमी होत जातो.
अति उष्ण तापमानात पाण्याची गरज वाढते. जमिनीतून व पर्णरंध्रातून पाण्याचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होऊ लागते. परिणामी, पिकांना पाणी आणि अन्नपुरवठाही कमी पडतो.
अति थंडी, ढगाळ वातावरण, थंड प्रवाह, सकाळी पडणारे दाट धुके किंवा दव यामुळे पिकांना सूर्यप्रकाश कमी मिळतो. दिवस लहान असल्याने सूर्य प्रकाशाचा कालावधी कमी असतो. त्यामुळे प्रकाश संश्लेषणक्रिया मंदावत जाते. परिणामी, अन्न तयार करणे तसेच ग्रहण करण्याची क्रिया मंद होते. जमीन थंड झाल्याने उपयुक्त जिवाणूंची वाढ व कार्य यावर विपरीत परिणाम होतो. या सर्वांचा एकत्रित ताण येऊन पिकाची वाढ खुंटते, रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
अतिथंड प्रवाह पेशीद्रवापर्यंत पोचल्यास पेशीद्रव गोठते, फळे तडकतात. या उलट उष्णतेमुळे पेशीद्रव प्रसारण पावूनही फळे तडकतात. फळांवर काळे डाग पडतात, कमी उत्पादनाबरोबरच कमी दर्जाचे उत्पादन येते. पानगळ, फळगळ मोठ्या प्रमाणात होते. पानांमध्ये शर्करा तयार होण्याचे प्रमाण घटते.
वापराचा फायदा
सिलिकॉनचे पातळ व चिवट आवरण पेशीभिंत्तिकांभोवती तयार होत असल्याने अतिथंड तसेच अतिउष्ण हवेचे प्रवाह पेशी द्रवापर्यंत जाण्यास अडथळा निर्माण होतो.
अतिउष्ण प्रवाह पानावरून किंवा फळावरून वातावरणात परावर्तित केले जातात. त्यामुळे फळावर पडणारे डाग नियंत्रित केले जातात. पर्णरंध्राची उघडझाप मर्यादित केली जाते. त्यामुळे होणारे बाष्पीभवन कमी केले जाते. यामुळे पाण्याचे वाया जाण्याचे प्रमाण कमी होऊन पिकांना त्याची उपलब्धता वाढते.
अतिउष्ण प्रवाह पेशीद्रवापर्यंत पोहोचण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे बाह्य वातावरणाच्या तापमानापेक्षा पेशी द्रवाचे तापमान ३ ते ४ अंश सेल्सिअसने कमी राहण्यास मदत होते.
जमिनीस भेगा पाडण्याचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याचा ऱ्हास कमी होण्यास मदत होऊन जमीन थंड राहिल्याने जिवाणूंचेही कार्य व्यवस्थित चालू राहते. प्रोटीन कायनेज, प्रोटीन फॉस्फेट व कॅल्शिअमची उपलब्धता वाढते.
सिलिकॉनयुक्त खतांच्या वापराने मातीच्या कणांवर स्थिर झालेले सोडिअम क्षार विलग केले जातात. असे विलग झालेले क्षार निचऱ्यावाटे निघून जातात किंवा पृष्ठभागावर आणले जातात. अशा प्रकारे क्षारांचे नियंत्रण झाल्याने त्याचे जमीन व पिकावर येणारे ताण देखील नियंत्रणात येतात.
ताणतणावापासून संरक्षण
वातावरणातील बदल, विषय किंवा अतिउष्ण हवामान, ढगाळ वातावरणात फेब्रुवारीनंतर सुटणारा वेगवान वारा यामुळे पिकांच्या अंगी जैविक ताण तणाव जाणवतात. त्यामुळे घड सटकणे, पाने फाटणे, पानांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होणे, सिगाटोका रोगाचे विषाणू दूर पसरणे इत्यादी दुष्परिणाम दिसतात.
रासायनिक खतांचा असंतुलित वापर जमिनीतील वाढणारे क्षार व इतर विषारी घटकांचे प्रमाण, अति विषारी कीटक व बुरशीनाशकांचा वापर इत्यादी बाबींमुळे पिकांच्या अंगी अजैविक ताण तणाव निर्माण होतात.
एपस्टीन आणि ब्लूम या शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगानुसार सिलिकॉनचा वापर केला असता पिकाचे जैविक तसेच अजैविक ताण तणावांपासून संरक्षण होऊन संभाव्य नुकसान कमी करता येते.
रोग, किडींना प्रतिबंध
सेरडांग कृषी विद्यापीठातील (मलेशिया) प्रयोगानुसार सिलिकॉनचा जमिनीतून वापर केला असता पनामा रोगाचे प्रमाण ३८.३९ टक्यांनी कमी झाले. अशाच प्रकारचे परिणाम इसफाटन कृषी विद्यापीठ (इराण) येथील संशोधकांनाही दिसून आले आहेत.
नैरोबी येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल ॲग्रीकल्चर या संस्थेचे संशोधक जी.के मबारू यांच्या संशोधनानुसार २०० मिलि ग्रॅम सिलिकॉनचा प्रति झाड वापर प्रत्येक आठवड्यास २ महिन्यांच्या कालावधीपर्यंत केल्यास पानावरील मर रोगाचे प्रमाण (झान्थोमोनोस विल्ट) ५५ टक्क्यांनी कमी झाले. तसेच झाडाची वाढ आणि प्रकाश संश्लेषणावर खूपच अनुकूल परिणाम दिसून आले.
सिलिकॉनचे पेशीभित्तिका सभोवती एक संरक्षक आवरण तयार होत असल्याने पिकांवरील रसशोषक किडींना रस शोषण करण्यास प्रतिबंध होत असल्याने अशा किडींपासून पिकांचे संरक्षण होते.
डॉ. शिवाजी थोरात, ८५००८५८११ (लेखक पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.