Poultry Business : पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत

Poultry Farming : यंदा कोंबड्याची आवक जास्त झाल्याने दर घसरले आहेत. हे दर कंपन्याच पाडत असल्‍याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिकांकडून होत आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून केलेला पोल्ट्री व्यवसाय संकटात असल्‍याचे चित्र रायगडमध्ये आहे.
Poultry Business
Poultry BusinessAgrowon
Published on
Updated on

Neral News : हिवाळ्यात चिकन, अंडी खाण्याला अनेक जण पसंती देत असल्‍याने दर वाढतात, मात्र यंदा कोंबड्याची आवक जास्त झाल्याने दर घसरले आहेत. हे दर कंपन्याच पाडत असल्‍याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिकांकडून होत आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून केलेला पोल्ट्री व्यवसाय संकटात असल्‍याचे चित्र रायगडमध्ये आहे.

कुक्कुटपालन हा पूर्वापार चालत आलेला शेतीपूरक व्यवसाय असून काळानुरूप त्‍यात बदल होत गेले आहेत. गावठी कोंबड्यांची जागा बॉयलर कोंबड्यांनी घेऊन पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय उदयास आला. यामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांबरोबर करार करत बॉयलर कोंबड्यांची पिल्ले सांभाळायला दिली. त्यांचे पालनपोषण, त्‍यासाठी होणारा खर्च कमी करून शेतकऱ्यांना चांगले उत्‍पन्न मिळू लागल्‍याने अनेकांनी या व्यवसायात रस घेतला.

Poultry Business
Poultry Farming : परसबागेतील कुक्कुटपालन अन् आर्थिक हातभार

शेतकऱ्यांनी लाखो रुपये उसनवारी घेत शेड उभारले, मात्र काही वर्षांनी ज्‍या शेतकऱ्यांबरोबरच कंपन्यांनी करार केला, त्‍यांनी जाचक अटी लागू केल्‍या. त्‍यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा नफा कमी झाला. दरम्‍यान कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, बर्ड फ्लू असा विविध संकटांनी पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला.

महाराष्ट्रात साधारण ८ ते ९ लाख तर रायगड जिल्‍ह्यात पोल्‍ट्री १,८०० व्यावसायिक शिल्लक आहेत. त्यातही कंपन्यांच्या मनमानीमुळे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. कोंबड्यांचे ४२ दिवस संगोपन करून हातात केवळ ३ ते ५ रुपये पडतात. कंपन्यांवर सरकारचे वर्चस्‍व नसल्याने पोल्‍टी व्यावसायिकांना फटका बसतो आहे.

Poultry Business
Poultry Farming : परसबागेत कुक्कुटपालन फायदेशीर : डॉ. रवींद्र निमसे

कवडीमोल भाव

प्रोटिनची मात्रा जास्‍त असल्‍याने खवय्यांकडून चिकनला पसंती दिली जाते. त्यात मासे आणि मटणाचे दर अधिक असल्याने ही चिकनसाठी जमेची बाजू आहे. मात्र २५० रुपये ते ३०० रुपयांपर्यंत किलोचा दर असलेल्या कोंबड्यांचे संगोपन करणाऱ्या पोल्‍टी व्यावसायिकाला कवडीमोल भाव मिळत असल्‍याने आर्थिक अडचणीत सापडला आहे.

पोल्ट्री व्यवसायातील कंपन्यांवर सरकारचा अंकुश हवा. जे खाद्य कंपन्या विकतात, त्‍याचा दर्जा तपासला जावा. कोंबडीच्या पिलांचे ४२ दिवस संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान नफा मिळावा. जेणेकरून तो कुटुंबाचा खर्च, शेडसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, वीजबिल आदी भरू शकेल.
अनिल खामकर, अध्यक्ष, महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटना
हिवाळा सुरू झाला कोंबडी, अंड्यांची मागणी वाढते, त्यामुळे आम्हालाही चार पैसे मिळतात. मात्र यंदा दर पडल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ९० रुपयांऐवजी ६० रुपयांनी पक्ष्यांची खरेदी करण्यात आल्‍याने किलोमागे ३० रुपये नुकसान झाले आहे. त्यामुळेच पोल्ट्री व्यवसाय डबघाईला आला आहे.
सतीश कालेकर, पोल्ट्री व्यावसायिक
थंडी सुरू झाली की मागणी वाढते. तुलनेत पुरवठा कमी होत असल्‍याने दर वाढतात. मात्र सध्या मार्गशीर्ष सुरू असल्‍याने मागणी कमी असल्‍याने दर काहीअंशी पडले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांबरोबरच विक्रेत्‍यांनाही बसतो. शिवाय व्यवसायात मोठी स्‍पर्धा आहे. पक्षी दुकानात आणून ठेवले की त्‍यांची मरतूक होतात, नाहीतर प्रतिदिन १५० ग्रॅम वजन कमी होत असल्‍याने नुकसान सहन करावे लागते.
शहझाद लोगडे, चिकन विक्रेते

एका बॅचमागे १० ते १५ हजारांचा नफा

पोल्ट्री व्यवसाय साधारण कंपनी व शेतकरी यांच्यातील करारावर चालतो. चिकन व अंडी यांची मागणी वर्षभर मोठ्या प्रमाणात असते, मात्र कंपन्या स्वतः कुक्कुटपालन करू शकत नसल्‍याने त्‍या थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधतात आणि कोंबड्यांच्या संगोपनाची जबाबदारी सोपवतात. यासाठी शेतकऱ्यांने त्याच्याकडील जागा, यावर शेड उभी करावे लागते.

कंपन्यांकडून देण्यात येणारे चिक्स म्हणजेच कोंबडीची पिले यांचे ४२ दिवस संगोपन करायचे असते. यादरम्यान पक्ष्यांना लागणारे खाद्य, त्यांचे आरोग्य, औषधपाणी आदी गोष्टी संबंधित कंपन्या करतात. ४२ दिवसांत जेव्हा पक्ष्यांची वाढ पूर्ण होते, तेव्हा कंपनी त्यांचे वजन करत त्यातून कंपनीचा खर्च वजा करत उरलेले पैसे शेतकऱ्याला नफा म्हणून देते. पक्ष्यांची एक चांगली बॅच मिळाली तर शेतकऱ्यांना साधारण १० ते १५ रुपयांपर्यंत नफा मिळतो. नाहीतर प्रति किलो जेमतेम ३ रुपये मिळतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com