Plastic Pollution: प्लॅस्टिक प्रदूषणाचा जनावरांवर होतोय परिणाम

World Environment Day: प्लॅस्टिकमुळे माती, पाणी आणि हवेमध्ये प्रदूषण होते. याचा प्राणी आणि मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी ‘प्लॅस्टिक प्रदूषण निर्मूलन : आपल्या पिढीसाठी शाश्‍वत पर्याय’ हे यंदाच्या वर्षीचे घोषवाक्य आहे.
Pollution
PollutionAgrowon
Published on
Updated on

डॉ. पी. एस. ठाकूर, डॉ. व्ही. एम. सरदार

Environmental Protection: जागतिक पर्यावरण दिन हा निसर्गाशी आपले नाते दृढ करणारा, पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणारा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. ‘प्लॅस्टिक प्रदूषण निर्मूलन ः आपल्या पिढीसाठी शाश्‍वत पर्याय’ हे यंदाच्या वर्षीचे घोषवाक्य आहे. प्लॅस्टिक प्रदूषण हा विषय आजच्या काळात अत्यंत ज्वलंत प्रश्‍न झाला आहे. टिकाऊपणा आणि स्वस्ततेमुळे जगभर प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

मात्र, हेच प्लॅस्टिक शेकडो वर्षे न विघटित होणारे, माती, पाणी आणि हवामानात प्रदूषण निर्माण करणारे, तसेच प्राणी आणि मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम करणारे आहे. समुद्रात फेकलेले प्लॅस्टिक मासे, कासव, पक्षी यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्याचप्रमाणे, सूक्ष्म प्लॅस्टिक मानवी शरीरातही प्रवेश करत आहे, जे आरोग्यासाठी चिंताजनक आहे.

जनावरांवर परिणाम

आजच्या यांत्रिक युगात प्लॅस्टिकचा वापर जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र याचे दुष्परिणाम केवळ माणसापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. पाळीव प्राणी, रानटी जनावरे, समुद्री जीव आणि पक्ष्यांवरही याचा गंभीर परिणाम होत आहे.

पचनसंस्थेवर गंभीर परिणाम

अनेकदा प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या किंवा प्लॅस्टिक पिशवीमध्ये गुंडाळलेले अन्न प्राणी खरे अन्न समजून खातात. हे प्लॅस्टिक त्यांच्या पोटात साचून पचनसंस्थेचे विकार, भुकेने मृत्यू किंवा आतड्याचे कार्य बंद पडण्यास कारणीभूत ठरते.

Pollution
River Pollution : नदी प्रदूषणाबाबत जागरूक व्हा...

जेव्हा जनावरे चुकून प्लॅस्टिक खातात, तेव्हा त्यांना त्रास होतो. अनेकदा त्यांचा मृत्यूही होतो. गिळलेले प्लॅस्टिक पोटात साठते आणि त्यामुळे भूक लागल्याची भावना कमी होते. परिणामी, प्राणी कमी अन्न खातात, त्यांना कमी ऊर्जा मिळते आणि ते अशक्त होतात.

मोठ्या आकाराचे प्लॅस्टिक जनावरांच्या पचनमार्गात अडकू शकते, ज्यामुळे ते बाहेर टाकता येत नाही. काही वेळा प्लॅस्टिक पोटात बारीक होते आणि नंतर सर्वत्र पसरते. उदा. नॉर्दर्न फुलमार नावाचा पक्षी दरवर्षी लाखो प्लॅस्टिकच्या तुकड्यांना बारीक करून पसरवतो. त्यातील काही तुकडे सोडून दिलेल्या घरट्यांच्या ठिकाणी आढळतात.

प्राणी जेव्हा प्लॅस्टिकयुक्त अन्न खातात, तेव्हा ते अन्नसाखळीच्या माध्यमातून पुन्हा माणसांपर्यंत पोहोचते.

पोटात प्लॅस्टिक कचरा

मासे, कासव नकळतपणे प्लॅस्टिक खातात. अगदी व्हेल माशाच्या पोटात टनभर प्लॅस्टिक सापडले आहे. दीर्घकालीन डच संशोधनानुसार, नॉर्दर्न फुलमार या पक्ष्याच्या पोटात सरासरी पंचवीस प्लॅस्टिकचे तुकडे सापडतात.

डिसेंबर २०१८ मध्ये इंडोनेशियातील वाकाटोबी नॅशनल पार्क येथे किनाऱ्यावर सापडलेल्या एका स्पर्म व्हेलच्या पोटात ११५ कप, २५ प्लॅस्टिक पिशव्या, ४ बाटल्या आणि २ चपला आढळल्या. व्हेलच्या पोटात ६ किलो वजन भरले एवढे प्लॅस्टिकचे तुकडे होते.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये, प्लॅस्टिक खाल्यामुळे उंटांचे मृत्यू दिसून आले आहेत. त्यांच्या पोटात १० ते ६० किलो वजनाचे प्लॅस्टिकचे मोठे गोळे आढळतात. कारण हे प्लॅस्टिक शरीरातून बाहेर टाकता येत नाही, म्हणून हे गोळे पोटात वाढतच जातात.

जुलै २०१० मध्ये, ब्राझीलमधील फ्लोरियानॉपोलिस जवळ किनाऱ्यावर एक तरुण हिरवे कासव अत्यंत अशक्त अवस्थेत सापडले आणि काही तासांत मरण पावले. या कासवाच्या आतड्यांमध्ये ३,२६७ प्लॅस्टिकचे तुकडे आणि पोटात ३०८ तुकडे सापडले. येथे केवळ ५ मिमीपेक्षा मोठे प्लॅस्टिकचे तुकडे होते.

Pollution
River Pollution : जीवनवाहिन्या की गटारगंगा?

श्‍वसनामध्ये अडथळा

प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये अडकण्यामुळे अनेक वेळा पक्ष्यांचा गळा घोटला जातो. इतर प्राण्यांना श्वास घेण्यात गंभीर अडथळा निर्माण होतो. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या पिशव्या, काप, बरण्यांचे झाकण किंवा बाटलीमध्ये अडकून पक्ष्यांचे श्वसनमार्ग बंद होतात. त्यामुळे त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. दम लागल्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

काही वेळा लहान प्राणी किंवा जलचर प्राणी प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा जाळ्यांमध्ये अडकतात, ज्यामुळे त्यांची हालचाल कमी होते, श्वास घेण्याची क्रिया बिघडते. अशा स्थितीत, हे प्राणी दीर्घकाळ अन्न व हवा न मिळाल्यामुळे तडफडून मरतात.

काही प्राणी चुकून प्लॅस्टिक गिळतात. हे प्लॅस्टिक त्यांच्या श्‍वसनमार्गात अडकते. अशा प्रसंगी तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली नाही, तर त्यांचा मृत्यू निश्चित असतो. समुद्रातील डॉल्फिन, कासव, व्हेल यांच्यामध्ये असे प्रकार वारंवार पाहायला मिळतात.

प्रजननावर परिणाम

सूक्ष्म प्लॅस्टिक कण हे शरीरात प्रवेश करून हार्मोनमध्ये बदल घडवून आणतात, ज्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते.

सूक्ष्म प्लॅस्टिक कण हे पर्यावरणात मोठ्या प्रमाणावर आढळणारे प्रदूषक आहेत. हे कण जनावरांच्या शरीरात पाणी, अन्न किंवा श्‍वसनातून प्रवेश करतात. एकदा शरीरात गेल्यानंतर, हे कण विविध जैविक प्रणालींमध्ये हस्तक्षेप करतात. विशेषतः अंतःस्रावी प्रणालीत गेल्यास प्रजनन प्रक्रियेस अडथळा येतो.

सूक्ष्म प्लॅस्टिक कणांमध्ये बिस्फेनॉल-अ आणि फ्थालेट्स सारखी रसायने असतात, जी हार्मोन्सचे काम बिघडवतात. हे एंडोक्राइन डिसरप्टर्स म्हणून काम करतात. परिणामी, प्रजननाशी संबंधित हार्मोन जसे की इस्ट्रोजेन, प्रोजेस्टरॉन, टेस्टोस्टेरॉन यांचे संतुलन बिघडते.

नर, मादीवर होणारे परिणाम

मादी जनावरांमध्ये माज चक्रात अनियमितता, अंडोत्सर्जनात अडथळा, गर्भधारणेचे प्रमाण कमी होणे, गर्भपात किंवा अपूर्ण गर्भवाढ दिसून येते.

नर जनावरांमध्ये शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि गुणवत्ता कमी होणे, तसेच वंध्यत्व निर्माण होण्याची शक्यता असते.

गर्भधारणेतील गुंतागुंती

सूक्ष्म प्लॅस्टिक कण गर्भाशयात पोहोचल्यास भ्रूणाच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. काही प्राण्यांमध्ये गर्भातील अपूर्ण वाढ, भ्रूण मृत्यू किंवा जन्मजात दोष दिसून आले आहेत.

प्रयोगात्मक पुरावे

प्रयोगशाळेत उंदीर आणि माशांवर केलेल्या अभ्यासांत सूक्ष्म प्लॅस्टिकच्या संपर्कामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेत घट झाल्याचे आढळले आहे. वराह, कोंबड्यांमध्येही असे परिणाम दिसून येत आहेत.

शिक्षण, जनजागृती

यावर्षीच्या घोषवाक्याच्या माध्यमातून समस्या मांडण्यावर भर न देता, समाधान शोधण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

पुनर्वापर आणि पुनर्चक्रणास प्रोत्साहन देणे.

एकवेळ वापराच्या प्लॅस्टिकचा स्वीकार न करणे.

जैवविघटनशील पर्यायांचा वापर.

औद्योगिक आणि वैयक्तिक पातळीवर पर्यावरणपूरक निर्णय.

शिक्षण आणि जनजागृतीद्वारे पर्यावरणप्रेमी संस्कृतीचे निर्माण.

नागरिकांची भूमिका

प्लॅस्टिक पिशव्या टाळून कापडी किंवा ज्यूट पिशव्या वापरणे.

प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टील/काचेच्या बाटल्यांचा वापर.

स्वतःपासून सुरुवात करून इतरांनाही प्रेरणा देणे.

रसायनांचा प्रभाव

पर्यावरणात विखुरलेले प्लॅस्टिक विविध प्रकारच्या प्राण्यांद्वारे अन्न समजून गिळले जाते. हे प्राणी अन्नसाखळीतील तळाच्या पातळीवर (उदा. जलचर, कीटक, लहान पशू) असतात. त्यांच्या शरीरात जमा झालेले प्लॅस्टिक कण आणि त्यात मिसळलेल्या विषारी रसायनांचा परिणाम साखळीतील पुढील प्रत्येक स्तरावर होतो, अखेरीस तो माणसांपर्यंत पोहोचतो.

- डॉ. व्ही. एम. सरदार, ९९२२५११३४४

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com