Natural Wax : फळे-भाज्यांना नैसर्गिक मेणाचं जैविक कवच

Post Harvesting Technology : फळे आणि भाजीपाल्याच्या वॅक्सिंग प्रक्रियेसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक मेणांचे प्रकार आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया, फायदे, तोटे यांची माहिती घेऊ.
Fruit Wax Coating
Fruit Wax Coating Agrowon
Published on
Updated on

Organic Wax For Fruits : फळे आणि भाजीपाल्यावरील वॅक्सिंग प्रक्रियेसाठी नैसर्गिक किंवा कृत्रिम असे मेणांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील नैसर्गिक मेण हा सामान्यतः मधमाश्यांपासून मिळणारा जैविक पदार्थ आहे. अन्य काही प्राणिज किंवा वनस्पतिजन्य स्रोतांपासून ते तयार केले जाते. या मेणाचा वापर खाद्य पदार्थांचे संरक्षण, आहारामध्ये, सौंदर्य व औषध उत्पादनांसह विविध उद्योगांमध्ये वापरले जाते. नैसर्गिक मेण हा पर्यावरण अनुकूल, जैवविघटनशील आणि मानवी स्वास्थ्यासाठी सुरक्षित आहे.

फळे आणि भाज्यांच्या संरक्षण आणि चकाकीसाठी केल्या जाणाऱ्या वॅक्सिंग प्रक्रियेमध्ये नैसर्गिक मेणाचा वापर केला जातो. त्यामुळे फळे आणि भाज्यांचा ताजेपणा, चव आणि रंग टिकून राहते. त्यांचे आयुष्यमान वाढते. फळांच्या पृष्ठभागावर आवरण तयार करत असल्यामुळे हवेतील ओलावा आणि नुकसानकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण मिळते. निर्यातीसाठी त्यांचा वापर करता येतो. ज्या स्रोतापासून मिळविण्यात आले आहे, त्यानुसार त्याचे नाव नैसर्गिक मेणाला दिले जाते. उदा. कॅरेन्यूबा मेण, मधमाशीच्या पोळ्यापासून मेण, कॅन्डेलिला मेण, सोया मेण इ.

Fruit Wax Coating
Post Harvest Technology : फळे-भाज्यांना वॅक्सिंग करण्याच्या विविध पद्धती

फायदे

 पर्यावरणास अनुकूल : हे शुद्ध आणि जैविक पदार्थ असल्याने पर्यावरणास अनुकूल आहे.

 सतत वापरता येणारा : निसर्गात सहजपणे पुनर्वापर किंवा विलीनीकरण होऊ शकते.

 उत्तम चकाकी ः अनेक कृषी उत्पादनांसह विविध उद्योगांमध्ये चकाकीसाठी वापर केला जातो.

 त्वचेसाठी सुरक्षित : रासायनिक घटकांचा समावेश नसल्यामुळे त्वचेसाठी सुरक्षित मानले जाते. त्वचेच्या अॅलर्जीची शक्यता कमी राहते.

तोटे

 नैसर्गिक मेण हे जैविक उत्पादन आहे. ते बनण्याची प्रक्रिया जास्त वेळखाऊ असते. त्यासाठी अधिक कच्च्या मालाची आवश्यकता असते. परिणामी, त्याची किंमत अधिक असू शकते.

 काही नैसर्गिक मेणाची उपलब्धता कमी असते. वनस्पतिजन्य किंवा प्राणीजन्य स्रोतांवर आधारित मेणांचा कंमती जास्त असू शकतात.

 काही नैसर्गिक मेण अधिक तापमानात वितळू शकतात. तर काही नैसर्गिक मेण उबदार किंवा दमट वातावरणात फारशी टिकत नाहीत.

कॅरेन्यूबा मेण

ब्राझीलमधील कॅरेन्यूबा पाम झाडाच्या पानांपासून मिळवल्या जाणाऱ्या नैसर्गिक मेणाला कॅरेन्यूबा मेण म्हणतात. ‘वॅक्स ऑफ दि ट्री’ असेही म्हणतात. कॅरेन्यूबा मेण हे एक अत्यंत टणक/कठीण, चकचकीत आणि उच्च तापमानात टिकणारे मेण आहे. त्यामुळे उत्कृष्ट चकचकीतपणा मिळण्यासोबतच मजबूत टिकवण क्षमता मिळते.

 बनविण्याची पद्धत : कॅरेन्यूबा पाम वृक्षाच्या पानांवर नैसर्गिक मेण जमा होते. हिरव्या पानांवर मेणाचा एक नैसर्गिक थर असतो. तो मिळविण्यासाठी पाने स्वच्छ धुऊन त्यावरील माती, धूळ काढली जाते. पानांवरून हलक्या हाताने मेण खरडून काढला जातो. त्यावर विविध शुद्धीकरण प्रक्रिया करताना त्यातील पाणी आणि इतर अशुद्ध अंश काढले जातात. यातून शुद्ध मेण मिळते. मात्र ते तितकेसे टिकाऊ नसते. त्यावर उच्च दाबाच्या प्रेसिंग प्रक्रिया केले जाते. तसेच उच्च तापमानावर उपचार करून सामान्यतः द्रवरूपात वापर केला जातो.

कॅन्डेलिला मेण

हे नैसर्गिक वनस्पतिजन्य मेण असून, मेक्सिको आणि अमेरिकेतील वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या कँडेलिला (शा. नाव ः Euphorbia cerifera) झुडपाच्या पानांपासून बनवले जाते. हे मेण गुळगुळीत, कठीण, पिवळसर-तपकिरी रंगाचे, सुगंधी आणि अपारदर्शक ते अर्धपारदर्शक असते.

बनविण्याची पद्धत :

लहान कँडेलिला झुडपे गोळा केली जातात. संपूर्ण वनस्पती गरम पाण्यात सोडली जाते. त्यात सर्फ्युरिक आम्ल मिसळले जाते. उष्णतेमुळे मेण वर तरंगू लागते. नंतर ते वेगळे केले जाते. वेगळे केलेले कॅन्डेलिला मेण गाळून, स्वच्छ करतात. थंड केल्यानंतर त्याचा वापर केला जातो.

बीवॅक्स

हे मेण मधमाशीच्या पोळ्यापासून मिळवले जाते. हे नैसर्गिक मेण मऊ, लवचिक, पिवळसर आणि सुगंधी असते. हे मेण पाण्यात विरघळत नाही आणि फळांना चकाकी प्रदान करते. त्याचा वापर अन्न, सौंदर्यप्रसाधने आणि औद्योगिक क्षेत्रात केला जातो.

 मेण बनविण्याची पद्धत : मधमाश्यांनी तयार केलेले पोळे मध काढल्यानंतर उरतात. पोळे गरम पाण्यात किंवा सौर ऊर्जेच्या साह्याने वितळविले जातात. गाळणी वापरून अशुद्धता काढून टाकली जाते. गाळलेले मेण चौकोनी किंवा पातळ पट्ट्यांच्या स्वरूपात साठवतात.

 वैशिष्ट्ये : हे मेण ६२ ते ६५ अंश सेल्सिअस तापमानावर वितळते. त्यात नैसर्गिकरीत्या अँटिबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. मृदू, लवचिक आणि नैसर्गिक सुगंध असतो. ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतो.

 उपयोग : सफरचंद, लिंबू, संत्रे, द्राक्षे, केळी, आंबा, नासपाती ही फळे आणि टोमॅटो, काकडी, गाजर, वांगी अशा भाज्यांवर नैसर्गिक कोटिंगसाठी वापरला जातो.

Fruit Wax Coating
Post Harvest Technology : शेतीमालाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी वॅक्सिंग तंत्रज्ञान

सोया मेण

हे वनस्पतिजन्य मेण सोयाबीन तेलापासून तयार केले जाते. हा मेण पर्यावरणपूरक, जैविकरीत्या विघटनशील आणि नॉन-टॉक्सिक आहे. प्रामुख्याने सौंदर्यप्रसाधने आणि खाद्यपदार्थांसाठी उपयोगी ठरते.

 मेण बनविण्याची पद्धत : उच्च-गुणवत्तेच्या सोयाबीनचे पीक काढले जाते. सोयाबीनपासून तेल वेगळे करण्यासाठी दाब किंवा सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन (Solvent Extraction) पद्धत वापरली जाते. सोयाबीन तेलावर हायड्रोजनेशन प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ते घन स्वरूपात रूपांतरित होते. त्याच्या वितळण्याचा तापमान वाढून ते मेणासारखे बनते. हायड्रोजनेटेड मेण गाळून स्वच्छ केले जाते.

 वैशिष्ट्ये : वितळण्याचे तापमान ४९ ते ८२ अंश सेल्सिअस असून, ते तेलाच्या गुणवत्तेनुसार बदलते. नैसर्गिक, जैवविघटनशील आणि नॉन-टॉक्सिक, तुलनेने इतर मेणापेक्षा मृदू आणि गुळगुळीत पोताचे असते. त्यात उत्तम सुगंधधारण क्षमता असल्यामुळे सुगंधी मेणबत्ती निर्मितीसाठी अधिक वापर होतो.

पाम मेण

आफ्रिकन तेलताडापासून (शा. नाव ः Elaeis guineensis) मिळविलेल्या तेलापासून तयार केलेल्या मेणाला पाम मेण म्हणतात. हे अन्य वनस्पतिजन्य मेणापेक्षा अधिक कठीण आणि स्फटिकयुक्त रचनेचे असते. याचा उपयोग नैसर्गिक कोटिंगसाठी केला जातो.

 मेण बनविण्याची पद्धत : पाम वृक्षाच्या फळांपासून पाम तेल काढले जाते. पाम तेलावर हायड्रोजनेशन करून ते घन स्वरूपात आणले जाते. मेण गाळून, सुकवून वेगवेगळ्या प्रकारांमध्ये रूपांतरित केले जाते. गरजेनुसार हे पावडर, फ्लेक्स किंवा ठोस स्वरूपात वितरित केले जाते.

 वैशिष्ट्ये : वितळण्याचे तापमान ६० ते ७० अंश सेल्सिअस, चमकदार आणि कठीण मेण, अन्न आणि सौंदर्य प्रसाधने उद्योगात वापरासाठी सुरक्षित, जलरोधक (वॉटरप्रूफ) आणि उष्णतेला प्रतिरोधक मेण आहे.

जोजोबा मेण

जोजोबा (शा. नाव ः Simmondsia chinensis) या झुडपाच्या बियांच्या तेलापासून मेण मिळवले जाते. त्याला क्विनाइन नट, कॉफीबेरी आणि ग्रे बॉक्स बुशदेखील म्हणतात. हे झुडूप मुख्यतः अमेरिका आणि मेक्सिकोच्या वाळवंट भागांमध्ये आढळते. जोजोबा मेण हे सामान्य तापमानाला घन स्वरूपात राहते.

 मेण बनविण्याची पद्धत : जोजोबा झुडपाच्या बिया गोळा केल्या जातात. त्यावर थंड दाब प्रक्रिया (Cold Pressing) करून तेल काढले जाते. ते त्यातील तेल व मेण गाळून वेगळे केले जाते. जोजोबा तेलावर हायड्रोजनेशन प्रक्रिया केली जाते. ते घन स्वरूपात (मेण) रूपांतरित होते.

 वैशिष्ट्ये : हे मेण वितळण्याचे तापमान ६५–७०° सेल्सिअस असून, ते गुळगुळीत आणि सौम्य पोताचे असते. हे मेण पाण्याच्या संपर्कात आल्यानंतरही बऱ्यापैकी स्थिर राहते.

शेलॅक मेण

शेलॅक हा एक नैसर्गिक राळयुक्त पदार्थ असून, भारत, थायलंड आणि म्यानमारमध्ये

आढळणाऱ्या लैसिफर लाक्का (शा. नाव ः Laccifer lacca) या कीटकाच्या स्रावांपासून मिळतो.

 मेण बनविण्याची पद्धत : लैसिफर लाक्का कीटक झाडांच्या फांद्यांवर एक चिकट पदार्थ तयार करतात. या राळयुक्त पदार्थापासून शेलॅक तयार केले जाते. झाडांच्या फांद्यांवरील राळ गोळा करून त्याचे सुकवले जाते. सुकल्यानंतर त्याला ‘कच्चा राळ ’(Raw Lac) म्हणतात. कच्चे राळ गरम पाण्यात टाकून गाळले जाते. यातून अशुद्धता काढून टाकली जाते. त्याच्या शुद्धतेनुसार शेलॅकच्या वेगवेगळ्या ग्रेड्समध्ये वर्गीकरण केले जाते. शुद्ध केलेला शेलॅक कोरड्या आणि ठिसूळ स्वरूपात असतो. याला वेगवेगळ्या द्रावणांमध्ये विरघळवून द्रव किंवा घन कोटिंग एजंट तयार करतात.

 वैशिष्ट्ये : नैसर्गिक वनस्पतिजन्य कीटक स्राव, हलका तपकिरी ते गडद तपकिरी, ओलावा यापासून संरक्षण, उत्कृष्ट चमकदार कोटिंग.

नैसर्गिक डिंक मेण

नैसर्गिक डिंक मेण (Arabic Gum Wax) हा एक जैविक व खाद्य-सुरक्षित पदार्थ आहे. तो सामान्यतः बाभूळ (शा. नाव ः Acacia Senegal आणि Acacia Seyal) या सारख्या झाडांच्या रसापासून तयार केला जातो. यालाअरेबिक गोंद (Gum Arabic) किंवा अरेबिक मेण असेही म्हणतात. मुख्यतः अन्न संरक्षण, औषधनिर्मिती आणि सौंदर्यप्रसाधनेांसाठी वापरतात.

 मेण बनविण्याची पद्धत : बाभूळ वृक्षाच्या सालीला जखम करून नैसर्गिक राळ गोळा केली जाते आणि वाळवली जाते. राळेच्या (डिंक) गुणवत्तेनुसार त्याचे ग्रेडिंग केले जाते. गोळा केलेली राळ प्रथम गरम पाण्यात विरघळवली जाते. नंतर गाळणीद्वारे अशुद्धता काढून टाकली जाते. वाळवून त्याचे पावडर किंवा मेण स्वरूपात प्रक्रिया केली जाते. काही वेळा त्या मिश्रणात आणखी पदार्थ (उदा. शेलॅक किंवा कॅरनौबा मेण) मिसळले जातात. त्याचा चमकदार व संरक्षक गुणधर्म वाढतो. त्याचे अंतिम स्वरूप नैसर्गिक डिंक मेण (Arabic Gum Wax) हा तरल द्रव (liquid), भुकटी (powder) किंवा पातळ लेपनासाठी (coating) मेण स्वरूपात उपलब्ध असतो.

 वैशिष्ट्ये : फळे आणि भाज्यांच्या पृष्ठभागावर नैसर्गिक डिंक मेणाचा पातळ थर लावल्यास त्या जास्त काळ ताजे राहतात. हे मेण मऊ, चकचकीत आणि पाण्याला प्रतिकार करणारे असल्यामुळे आर्द्रता टिकवून ठेवतात. हे संपूर्णतः जैविक व आरोग्यास सुरक्षित आहे.

नैसर्गिक मेणाचे उपयोग : संत्रा, केळी, आंबा यांच्या साल किंवा वरील पृष्ठभागावर मेणाचा थर दिल्यास त्यांचा रंग अधिक आकर्षक होतो. ते अधिक काळ ताजे राहते. काळे पडण्यापासून वाचते. सफरचंदाचा चकचकीतपणा वाढून ते जास्त काळ ताजे राहतात. द्राक्षांच्या पृष्ठभागावर मेणाचा थर दिल्यास त्यांच्या आयुष्यमानामध्ये वाढ होते.

- डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com