Seed Management: दर्जेदार बीजोत्पादनाचे नियोजन

Seed Certification: बियाणे कायद्यातील कलम ९ नुसार शेतकऱ्याला बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी करता येते. यासाठी विहित नमुन्यात जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडे नोंदणी शुल्कासह अर्ज सादर करावा लागतो. शेतकऱ्यांना बीज प्रमाणीकरण यंत्रणेने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे बीजोत्पादन घ्यावे लागते.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

डॉ. भागवत चव्हाण

Village Seed Scheme: पीक जातीची उत्पादन क्षमता ही त्या बियाणाचे आनुवंशिक गुण आणि गुणवत्तेवर अवलंबून असते. अनेक शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे, हव्या त्या जातीचे, शुद्ध आणि दर्जेदार बियाणे मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी योग्य माहिती घेऊन, काळजीपूर्वक निवड करून बीजोत्पादन करावे. बियाणे खरेदी करताना योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.

मूलभूत बियाणे

बियाणे पीक पैदासकाराने स्वतःच्या देखरेखीखाली तयार करतात. यामुळे मूळ बियाण्यात कोणत्याही प्रकारची आनुवंशिक अथवा भौतिक प्रकारची भेसळ होत नाही. बियाणांची १०० टक्के शुद्धता राखली जाते.

मूलभूत बीजोत्पादन कृषी विद्यापीठ, शासकीय संस्थांच्या ठिकाणी घेतले जाते. बियाण्याच्या पिशव्यांना पिवळ्या रंगाचा टॅग लावलेला असतो.

पायाभूत बियाणे

हे बियाणे मूलभूत बियाण्यापासून तयार केले जाते. बीजोत्पादन करताना बियाण्याची जास्तीत जास्त शुद्धता कशी राखली जाईल, याकडे लक्ष दिले जाते.

बीजोत्पादन हे प्रामुख्याने कृषी विद्यापीठ, सरकारी प्रक्षेत्र किंवा बियाणे महामंडळातर्फे प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या देखरेखीखाली घेतले जाते. बियाण्याच्या पिशव्यांना पांढऱ्या रंगाचा टॅग असतो.

प्रमाणित बियाणे

हे बियाणे पायाभूत बियाण्यापासून तयार करतात. प्रमाणित बियाण्यामध्ये प्रमाणीकरण यंत्रणेच्या निर्धारीत प्रमाणकानुसार आनुवंशिक आणि भौतिक शुद्धता राखली जाते.

हे बीजोत्पादन शेतकरी स्वतःच्या शेतावर घेऊ शकतात. बीजप्रमाणीकरण यंत्रणेकडून शेतकऱ्यांना हे बियाणे प्रमाणित करून घ्यावे लागते. प्रक्रिया करून तयार झालेल्या पिशव्यांना निळ्या रंगाचा टॅग लावतात.

सत्यप्रत बियाणे

सत्यप्रत बियाण्याची आनुवंशिक शुद्धता, उगवण क्षमता आणि भौतिक शुद्धता प्रमाणित बियाण्याइतकीच असते. याचे उत्पादनसुद्धा प्रमाणित बियाण्यासाठी जे मापदंड आहे त्याप्रमाणे केले जाते परंतु याची पाहणी बीजप्रमाणीकरण यंत्रणेकडून केली जात नाही.

या बियाण्याच्या गुणवत्तेची खात्री ही उत्पादकानेच घ्यावयाची असते. प्रक्रिया करून तयार झालेल्या बियाण्याच्या पिशव्यांना हिरव्या रंगाचा टॅग लावतात. यावरसुद्धा इतर बियाण्याप्रमाणे माहिती दिलेली असते.

बीजोत्पादन घेण्याची पद्धत

बियाणे कायद्यातील कलम ९ नुसार कोणत्याही शेतकऱ्याला बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी करता येते. यासाठी विहित नमुन्यात जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडे नोंदणी शुल्कासह अर्ज सादर करावा लागतो. शेतकऱ्यांना बीज प्रमाणीकरण यंत्रणेने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे बीजोत्पादन घ्यावे लागते. यामध्ये जे बीजोत्पादन होईल त्याची प्रक्रिया, विक्री व्यवस्था साठवण या सर्व गोष्टीत बीजोत्पादनालाच लक्ष द्यावे लागते.

Indian Agriculture
HTBT Cotton Seeds: ‘एचटीबीटी’चे गुजरात कनेक्शन

प्रक्रिया, विक्री यासारख्या मूलभूत सोई उपलब्ध नसतील तर अशा शेतकऱ्यांनी राज्य बियाणे महामंडळाकडे बीजोत्पादनासाठी नोंदणी केल्यास बियाणे महामंडळाकडून अशा शेतकऱ्यांना बीजोत्पादनासाठी लागणारे बियाणे मिळते.

प्रमाणीकरण यंत्रणेकडून सदर बीजोत्पादनाचे प्रमाणीकरण केले जाते. तयार झालेल्या बियाण्याची प्रक्रिया आणि विक्रीव्यवस्था ही राज्य बियाणे महामंडळाकडून केली जाते. अशा प्रकारचे बीजोत्पादन घेण्यासाठी एका गावातून कमीत कमी २५ एकर क्षेत्राची नोंदणी होणे आवश्यक असते. त्यामुळे बीजोत्पादन क्षेत्राचे परीक्षण, पिकाची काढणी, तपासणी यासारखी कामे करणे बियाणे महामंडळाला तसेच प्रमाणीकरण यंत्रणेला सोईस्कर होते.

राज्य बियाणे महामंडळाप्रमाणेच राष्ट्रीय बियाणे मंडळ (एन.एस.सी) सुद्धा अशाप्रकारे शेतकऱ्याच्या शेतावर बीजोत्पादन घेते.

बीजोत्पादनाची काळजी

हवामान

आपल्या भागातील वातावरणात चांगल्या प्रकारे येणाऱ्या पिकांची बीजोत्पादनासाठी निवड करावी. बहुतांश पिकांना मध्यम स्वरूपाचा पाऊस, तापमान आणि आद्रता पोषक असते.

फुलोऱ्यात असताना स्वच्छ भरपूर सूर्यप्रकाश आणि मध्यम तापमान मिळाल्यास परागीकरण चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. फुलोऱ्याच्या काळात जास्त पाऊस किंवा तापमान परागीकरणास अयोग्य असते. त्यामुळे अशाप्रकारचे हवामान असणाऱ्या भागात शक्यतो बीजोत्पादन घेऊ नये.

जमीन

बीजोत्पादनासाठी शक्यतो सपाट, मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन तण, कीड किंवा रोगग्रस्त नसावी.

ज्या पिकाचे बीजोत्पादन घ्यायचे आहे, त्या जमिनीमध्ये आधीच्या हंगामात त्या पिकाच्या त्याच किंवा दुसऱ्या जातीचे पीक घेतलेले नसावे.

विलगीकरण

बीजोत्पादन घेण्यात आलेल्या जातीमध्ये त्याच पिकांच्या इतर जातीपासून परागीभवन होऊन भेसळ होऊ नये म्हणून विलगीकरण अंतराद्वारे पीक वेगळे ठेवावे लागते.

विलगीकरणाचे अंतर हे पिकाच्या परागीभवनाच्या स्वरूपावर अवलंबून असते. स्वपरागीभवन असलेल्या पिकामध्ये विलगीकरणाचे अंतर कमी असते. परपरागीभवन असलेल्या पिकामध्ये विलगीकरणाचे अंतर जास्त असते.

बीजोत्पादन क्षेत्र प्रमाणित होण्यासाठी विविध पिकांसाठी विलगीकरणाचे अंतर ठरवून दिलेले आहे.

मशागत

पेरणीपूर्वी खोल नांगरट करावी म्हणजे मातीतील तण कमी होण्यास मदत होते. पाळी घालून जमीन चांगली भुसभुशीत करून पेरणीसाठी तयार करावी.

बियाणे निवड

बीजोत्पादन करावयाच्या जातीचे बियाणे कृषी विद्यापीठ, बियाणे महामंडळ, कृषी विभाग, बीज प्रमाणीकरण यंत्रणेने मान्यता दिलेल्या व प्रमाणित संस्थेकडून घ्यावेत.

पायाभूत बीजोत्पादनासाठी मूलभूत बियाणे आणि प्रमाणित बीजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे वापरावे. बियाण्याच्या पिशवीवरील टॅग काळजीपूर्वक पहावा.

प्रक्रिया

बियाणे पेरणीपूर्वी त्यास प्रक्रिया केलेली नसल्यास प्रक्रिया करणे गरजेचे असते. यामध्ये बुरशीनाशके, कीटकनाशके, जिवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करावी.

Indian Agriculture
Seed Treatment: रोग व्यवस्थापनात बीजप्रक्रियेचे महत्त्व

पेरणी

बीजोत्पादन क्षेत्रासाठी लागणारे बियाणे हे अधिकृत प्रमाणित केलेले असावे. पेरणी शक्यतो पेरणी यंत्राने करावी. त्यामुळे बी एका रेषेत पडते. लहान बी खोलीवर पेरु नये. मोठ्या आकाराचे बी खोलीवर पडले तरी उगवू शकते.

कोरड्या जमिनीत बी खोलीवर पेरावे म्हणजे ते ओलीशी संपर्कात येऊन उगवते. रेताड जमिनीत बी खोल पडले तरी उगवू शकते, परंतु भारी जमिनीत बी जास्त खोलीवर पडू नये म्हणून पेरणी यंत्राने पेरणी करावी.

बी एका रेषेत पेरल्यामुळे भेसळ रोपे काढणे सोपे जाते. तसेच पिकावर फवारणी, खते देणे, पिकाची पाहणी यासारखी कामे करणे सोईस्कर होते.

संकरित बीजोत्पादनाच्या वेळी नर आणि मादी वाणाच्या ओळी ठरावीक प्रमाणातच पेराव्या लागतात. उदा. संकरित ज्वारी बीजोत्पादनात ४:२ आणि बाजरीसाठी १६:२ या प्रमाणात मादी आणि नर वाणांच्या ओळी एकाआड पेराव्यात. अशा ओळी पेरताना नर-मादी वणाचे बी एकत्र किंवा भेसळ होणार नाही, यासाठी पूर्ण काळजी घ्यावी. नर वाणांच्या ओळी ओळखण्यासाठी टोकाला ताग पेरावे अथवा खुंटी रोवावी.

खत व्यवस्थापन

पिकासाठी ठरवून दिलेली नत्र, स्फुरद आणि पालाश यासारख्या खतांची मात्र देणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या बियाण्याचे उत्पादन वाढते. पिकांची चांगली वाढ झाल्यामुळे भेसळ झाडे स्पष्ट ओळखता येतात.

पिकांच्या चांगल्या वाढीसाठी नत्राची गरज असते. तर स्फुरदामुळे मुळाची चांगली वाढ होते, पक्वता वेळेवर होण्यास मदत होते. स्फुरदाची मात्रा कमी पडल्यास

वाढ खुंटते. त्यामुळे स्फुरदाची ठरावीक मात्रा देणे फायदेशीर ठरते. स्फुरदाप्रमाणेच पालाशची मात्रा देणे महत्त्वाचे असते. बियाणे वाढीमध्ये त्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. पालाशच्या अभावामुळे उत्पन्नात घट येते. खताची मात्रा वेळेवर आणि प्रमाणात देणे गरजेचे असते.

पाणी व्यवस्थापन

रोग आणि कीडमुक्त बीजोत्पादनासाठी कोरडे हवामान चांगले असते, परंतु अशा हवामानात बीजोत्पादन क्षेत्रास पाणी देणे आवश्यक असते.

फुलोऱ्यानंतर एक-दोन पाणी देणे हे बीजोत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. पेरणीनंतर जास्त दिवस ओल राहिल्यास किंवा पुरेसा ओलावा नसल्यास उगवण कमी होते. पिकांच्या वाढीनुसार आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

ग्राम बीजोत्‍पादन योजना

या योजनेमध्‍ये एका किंवा आसपासच्‍या गावामध्‍ये पिकाच्‍या एकाच जातीचे बीजोत्‍पादन घेतात. यामुळे बीजोत्‍पादनासाठी विलगीकरण, पेरणी, भेसळ झाडे काढणे, प्रमाणीकरण, प्रक्रिया यांसारखी कामे खूपच सोपी होतात.

परागीभवनासाठी विपुल प्रमाणात परागकण उपलब्‍ध होतात आणि पर्यायाने बीजोत्‍पादन चांगल्‍या प्रतीचे होते. यासाठी गावातील शेतकऱ्यांना एकत्रितरीत्‍या कृषी खाते, बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांच्‍या साहाय्याने या प्रकारची योजना राबवून बीजोत्‍पादन घेता येते.

बियाणे खरेदी करताना...

अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. पॅकेटवरील लॉट नंबर, उत्पादन तारीख, जातीचे नाव, वजन, कालबाह्यता इत्यादी माहितीची खात्री करणे आवश्यक आहे. विषाणुरोधक प्रक्रिया, शुद्धता प्रमाणपत्र आणि पावती घेणे महत्त्वाचे आहे.

बियाणे खरेदी केल्यानंतर, पॅकेटचा नमुना आणि पावती एक वर्ष सांभाळून ठेवावी.

उत्पादनामध्ये अडचणी आल्यास बियाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करता येते. नुकसान टाळता येते.

स्थानिक कृषी अधिकारी, सेवा केंद्र किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने जातींची निवड करावी.

- डॉ. भागवत चव्हाण, ८७६७४५६४५५

(कृषिविज्ञान विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com