
डॉ. दत्तात्रय गावडे, डॉ. प्रशांत शेटे
Crop Disease Management: पेरणीनंतर जमिनीद्वारे तसेच बियाण्यांद्वारे विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणक्षमता वाढविण्यासाठी हलके, कीड-रोगमुक्त, लहान आकाराचे बियाणे वेगळे करून घ्यावे. त्यानंतर बियाण्यांचे रोग व किडींपासून संरक्षण होऊन उगवण चांगली होऊन रोपांच्या जोमदार वाढविण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यांस जैविक व रासायनिक प्रक्रिया करणे आवश्यक असते.
बीजप्रक्रियेचे महत्त्व
बहुतांश रोगकारक सूक्ष्मजीवांचा प्रसार बियांमार्फत होतो. पिकांवरील रोगांना कारणीभूत असलेल्या बऱ्याच सूक्ष्मजीवांचा प्रसार बियांद्वारे होत असतो. जमिनीतून व बियाणाद्वारे पसरणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची सशक्त व जोमदार वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांनी न विसरता बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. निरनिराळ्या औषधांच्या फवारण्यामुळे उभ्या पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण होते, तर बियाणे प्रक्रियेमुळे बियांवरील सुप्तावस्थेत असलेल्या रोगाचे तसेच इतर जिवाणूंचे नियंत्रण सुरुवातीलाच होते. उभ्या पिकात दिसणाऱ्या बऱ्याच रोगांचे मूळ बियांमध्ये असते. एकदा असे रोगट बी उगवून आले की त्यामधील रोगांचे नियंत्रण करणे अवघड होते. बियाणे व जमिनीतून होणाऱ्या रोगांचे प्राथमिक अवस्थेत नियंत्रण करता येते.
बीजप्रक्रियेचे फायदे
बुरशीजन्य रोग, जमिनीतून किंवा बियाण्यांद्वारे उद्भवणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.
पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होऊन पेरणी सुलभ होते.
बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचे नियंत्रण करणे शक्य होते.
बियाण्यांभोवती जैविक व रासायनिक बुरशीनाशकांचे सुरक्षित कवच तयार होते.
पीक संरक्षणावरील खर्च कमी होतो.
बीजप्रक्रियेमुळे नत्र, स्फुरद व इतर घटक पिकास लवकर उपलब्ध होऊन खतावरील खर्च कमी होण्यास मदत होते.
साठवणगृहात साठवणुकीदरम्यान बियाण्याचे संरक्षण होते.
पीक एकसारखे वाढते व मशागतीचा खर्च कमी येतो.
बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकाचे सुरुवातीचे साधारण ६ ते ८ आठवड्यांपर्यंत संरक्षण होऊन फवारणी खर्चात बचत होते.
उगवण एकसमान होते. तसेच पिकांची मुळे सशक्त होऊन जोमदार वाढ होते.
ट्रायकोडर्मा वापर
सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, चवळी, मका, भुईमूग आदी पिकांमध्ये ट्रायकोडर्मा (१ टक्का डब्ल्यू. पी.) ५ ते १० ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रियेसाठी वापर करावा. ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया केल्यामुळे मर, मूळकुज व खोडकुज आदी रोगांपासून पिकाचे संरक्षण होण्यास मदत मिळते.
बीजप्रक्रियेच्या पद्धती
अ) गरम पाणी उपचार पद्धत
बियाणे कापडी पिशवीत ठेवून ही पिशवी गरम पाण्यात ठेवावी. काही वेळानंतर बियाण्याची पिशवी गरम पाण्यातून काढून काही वेळासाठी थंड पाण्यामध्ये ठेवावी. त्यानंतर बियाणे सुकण्यासाठी ठेवून लगेच बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.
उदा. : गहू पिकातील काणी रोगासाठी ४९ अंश सेल्सिअस तापमानामध्ये ९० ते १२० मिनिटे बियाणे गरम पाण्यात ठेवावे. वाटाणा पिकातील जिवाणूजन्य करपा रोगासाठी ५५ अंश सेल्सिअस तापमानात १५ मिनिटे बियाणे गरम पाण्यात ठेवावे.
ब) जैविक बीजप्रक्रिया :
या बीजप्रकियेमध्ये जैविक बुरशीनाशक, कीटकनाशक व जैविक संवर्धकांचा वापर केला जातो. ही बीजप्रकिया करण्यासाठी एक लिटर गरम पाण्यात १२५ ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे. द्रावण थंड झाल्यावर त्यात २०० ते २५० ग्रॅम जिवाणू संवर्धक मिसळावे. तयार द्रावण १० ते १२ किलो बियाण्यावर शिंपडून हलक्या हाताने लेप बसेल असे लावावे. बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर ३ ते ४ तासांनी जिवाणू संवर्धक लावावे. बियाण्यांद्वारे व जमिनीद्वारे येणाऱ्या रोगांसाठी ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास सारख्या यांचा बीजप्रक्रियेसाठी वापर करता येतो. जैविक बीजप्रकिया केलेले बियाणे २४ तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे.
रासायनिक बीजप्रक्रिया
रासायनिक बीजप्रकिया करताना प्रथम एका भांड्यात किंवा ड्रममध्ये १०० किलो बियाण्यामध्ये १ लिटर पाणी टाकून १ मिनिट घोळून ओलसर करावे. त्यानंतर शिफारशीत बुरशीनाशक मिसळून पुन्हा बियाणे पाच मिनिटांपर्यंत लाकडी दांड्याने हलवावे. हे मिश्रण कोरडे होईपर्यंत घोळत राहावे. ही प्रक्रिया करताना बियाण्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. ही प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणीसाठी किंवा पुढील जिवाणू संवर्धकाच्या प्रक्रियेसाठी वापरावे. बीजप्रक्रिया करताना हातामध्ये रबर किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. तोंडावर रुमाल बांधावा किंवा मास्क लावावा.
बीजप्रक्रियेचे टप्पे
बियाण्यांस प्रथम रासायनिक बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर रासायनिक कीटकनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर ३ ते ४ तासांनी जैविक बुरशीनाशक व जैविक कीटकनाशकांची बीजप्रकिया करावी. त्यानंतर रायझोबिअम किंवा ॲझोटोबॅक्टर यांची बीजप्रक्रिया करावी. सर्वांत शेवटी केएमबी किंवा पीएसबी यांची बीजप्रक्रिया करावी.
घ्यावयाची काळजी
बीजप्रक्रिया करताना शिफारशीत जैविक तसेच रासायनिक घटकांचा शिफारशीत प्रमाणात वापर होईल याची काळजी घ्यावी. कमी किंवा जास्त प्रमाणात वापर झाल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.
बीजप्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिक पिशवीत भरू नये. बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे थंड व कोरड्या जागी सावलीत सुकण्यास ठेवावे. त्यानंतरच पेरणी करावी.
बीजप्रक्रिया सुलभ होण्यासाठी ड्रम वापरावा. तो उपलब्ध नसेल तर मडक्यात योग्य प्रमाणात बियाणे व शिफारशीत घटक घालून मडक्याचे तोंड फडक्याने बांधावे. त्यानंतर मडके उभे, आडवे, तिरके असे काही वेळ हलवावे, जेणेकरून सर्व बियाण्यांस एकसारख्या प्रमाणात बीजप्रक्रियेसाठी वापरलेले शिफारशीत घटक लागतील.
बीजप्रक्रिया केलेले आणि पेरणीनंतर शिल्लक राहिलेले बियाणे मानवी किंवा जनावरांच्या खाण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.
बीजप्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे घालावेत.
डोळ्यांना चष्मा व नाकाला रुमाल बांधावा अथवा मास्क वापरावा. शरीरास इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- डॉ. दत्तात्रय गावडे, ९४२१२७०५१०
(पीक संरक्षण विषयतज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.