HTBT Cotton Seeds: ‘एचटीबीटी’चे गुजरात कनेक्शन

Gujarat-Maharashtra Racket: राज्यात कपाशी बियाण्यांच्या बेकायदा विक्रीचा ‘एचटीबीटी’ (Herbicide Tolerant BT) प्रकार पुन्हा चर्चेत आहे. हे बियाणे केंद्र शासनाच्या मंजुरीशिवाय गुजरात आणि मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात तस्करी होत आहे.
HTBT Seed
HTBT Seed Agrowon
Published on
Updated on

Pune News: कपाशीचे तणनाशक सहनशील बीटी बियाणे (एचटीबीटी) तस्करांनी यंदा राज्यात हालचाली वाढविल्या असून या गोरखधंद्याची पाळेमुळे गुजरातमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे. कृषी विभागाने तस्करांना रोखण्यासाठी आतापर्यंत ३७ ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल केले आहेत.

एचटीबीटी हे ग्लायफोसेट तणनाशकाला प्रतिकारक असे जनुकीयदृष्ट्या सुधारित कपाशी बियाणे आहे. यामध्ये बोंड अळी विरोधी बीटी (बॅसिलस थुरिंनजेनेसिस) जनुक व ग्लायफोसेट तणनाशक प्रतिकारक (सीपी४ - ईपीएसपीएस) जनुक असे मिश्रण आहे. केंद्र सरकारने या तंत्रज्ञानाच्या चाचण्या, वाहतूक अथवा विक्रीला मान्यता दिलेली नाही. मात्र बियाण्यांच्या काळ्या धंद्यात गुंतलेल्या गुजरातमधील काही टोळ्या एचटीबीटीची तस्करी करीत आहेत. त्यासाठी बहुतेक भागांमध्ये खासगी प्रवासी वाहनांचा (टुरिस्ट ट्रान्स्पोर्ट व्हेइकल्स) वापर होतो आहे.

HTBT Seed
HTBT Cotton Seeds: बाजारपेठेत एचटीबीटी कापूस बियाण्याचा धुमाकूळ

मध्य प्रदेशातूनही तस्करी

कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कपाशीत विविध बहुवार्षिक तणांचे प्रभावी नियंत्रण मजूर किंवा यंत्राद्वारे सहज शक्य होत नाही. मात्र, एचटीबीटीमुळे कपाशीतील तणनियंत्रण खर्चात मोठी बचत होत असल्याचे शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळे बंदी असूनही एचटीबीटी बियाण्यांची खरेदी करण्याकडे कल असतो. यंदा गुणनियंत्रण विभागाने एचटीबीटी विरोधात राज्यभर मोठ्या मोहिमा हाती घेतल्या आहेत.

त्यामुळे गेल्या चार वर्षांपेक्षा जास्त फौजदारी गुन्हे चालू खरिपात दाखल झाले आहेत. २०२२ मध्ये एचटीबीटी तस्करांविरोधात १५ ठिकाणी कारवाई झाली होती. २०२३ मध्ये १४ तर गेल्या हंगामात ३२ ठिकाणी कारवाई झाली. यंदा मात्र ३ जूनअखेर ३७ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. गुजरातबरोबरच मध्य प्रदेशातून देखील या बियाण्याची छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात आणले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

एचटीबीटी विरोधात कारवाई करण्यात नाशिक विभाग आघाडीवर आहे. राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, विभागीय सहसंचालक सुभाष काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागातील गुणनियंत्रण अधिकाऱ्यांचा एक चमू एचटीबीटी तस्करांचा सतत मागोवा घेत आहे. अधिकाऱ्यांच्या या चमूत उल्हास ठाकूर, कल्याण पाटील, अरुण तायडे, मनोजकुमार सिसोदे, जयकुमार बोराळे तसेच इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे ५६ लाखाचे बियाणे जप्त झाले असून १२ ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

HTBT Seed
Dhule Fake Cotton Seeds: धुळ्यात २१ लाखांचे अवैध कापूस बियाणे जप्त

निविष्ठा तस्करांचे राजकीय लागेबांधे

बियाण्यांबरोबरच खतांमध्ये देखील यंदा तस्करी वाढली आहे. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बोगस खतांचा पुरवठा करणारे काही टोळ्या परवानाधारक कंपन्यांच्या मालकांना हाताशी धरून शेतकऱ्यांना बोगस निविष्ठा विकत आहेत. या कंपन्या एकमेकांविरोधात कुरघोड्या करीत असून त्यासाठी गुणनियंत्रण अधिकाऱ्यांचाही वापर करीत आहेत.

एकमेकांच्या विरोधात गुणनियंत्रण अधिकाऱ्यांना माहिती पुरवून धाडी टाकण्याचे उद्योग काही टोळ्या करीत असून त्यांनी राजकीय संधान बांधले आहे. निविष्ठा उद्योगातील गैरप्रकांरामध्ये गुंतलेल्या एका व्यक्तीने नंदूरबार येथे एका राजकीय नेत्याची भेट घेतली व त्यानंतर राज्यात कारवाईचा धडाका सुरू झाला. तथापि, गुणनियंत्रण विभागातील वरिष्ठांकडून या घडामोडींचे खंडन केले जात आहे. कारवाया कमी करा किंवा वाढवा, या बाबत आम्हाला कोणत्याही राजकीय नेत्याकडून अद्याप दबाव आलेला नाही, असे गुणनियंत्रण विभागाचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांची दुहेरी फसवणूक

तस्करांनी एचटीबीटीमधील दुसऱ्या पिढीचीदेखील (एफ-टू जनरेशन एचटीबीटी) उत्पादने विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांचे गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु, बियाणे खरेदी विक्रीचा सर्व व्यवहार बिगर पावतीचा व गुपचूप होत असल्यामुळे तस्करांचे फावते. तसेच,याबाबत तक्रार करण्यास शेतकरीच नकार देत असल्यामुळे कारवाईला मर्यादा येत आहेत, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुणनियंत्रण विभागाने आता पोलिस तंत्राचा वापर सुरू केला आहे. कृषी अधिकारी वेशांतर करीत आता एचटीबीटीच्या चोरट्या विक्रीचा मागोवा घेत आहेत. अहमदाबादमधून राज्याच्या विविध भागांत येणाऱ्या टुरिस्ट वाहनांची अचानक तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे एचटीबीटीच्या नावाखाली देखील नकली बियाणे विकले जात असून शेतकऱ्यांची दुहेरी फसवणूक होते आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com