Freedom From Drought : पिंगोरीने साधली कायमची दुष्काळमुक्ती

Article by Ganesh Kore : पिंगोरी (ता. पुरंदर, जि. पुणे) ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दुष्काळापासून कायमची मुक्ती साधली आहे. लोकसहभाग, शासन, सामाजिक संस्थांचे सहकार्य आदींच्या माध्यमातून गावात जल-मृद्‍संधारणाची कामे झाली. आज शेतीसह दुग्ध व्यवसायाल मोठी चालना मिळून गावाने आर्थिक समृद्धीकडे यशस्वी वाटचाल केली आहे.
Drought Condition
Drought ConditionAgrowon

Success Story : पुणे जिल्ह्यात पिंगोरी (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्यांची जमीनधारणा अत्यल्प आहे. शेती पावसावरच अवलंबून असल्याने खरीप हाच मुख्य हंगाम होता. आर्थिक उत्पन्नाचे सक्षम स्रोत नसल्याने गावातील काही शेतकरी शेती विकण्याच्या विचारात होते. परिसर डोंगराळ आणि पर्यटनासाठी उपयुक्त त्यामुळे जमीन व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांचा वावर वाढू लागला होता.

अशावेळी आपल्या गावाचे रूप लयास जाऊ नये, त्याचे मूळ अस्तित्व टिकून राहावे या हेतूने गावातील काही तरुण एकत्र आले. गाव कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा त्यांनी निश्‍चय केला. सन २०१२ च्या दरम्यान काम सुरू झाले. गावातील महिलांनाही यात सामावून घेण्यात आले. हिवरे बाजार, राळेगणसिद्धी या गावांचा अभ्यास दौरा काढण्यात आला. त्यात जल- मृद्‍संधारण, पाण्याचा ताळेबंद यांची सविस्तर माहिती देण्यात आली.

Drought Condition
Drought Crisis : उन्हाच्या तीव्र झळांनी केळी बागा होरपळल्या

मदतीला आले हात पुढे

सन २०१३ मध्ये झालेल्या ग्रामसभेत रोजगार हमीच्या माध्यमातून सुमारे १०० महिला आणि पुरुषांच्या मदतीने ओढे- नाले खोली-रुंदी कामांचे नियोजन झाले. तलावातील गाळ काढण्यासाठीच्या खर्चासाठी रोजगार हमीवरील महिला आणि पुरुषांनी दररोजच्या वेतनातील ५० रुपये देण्याचे ठरले. लोकवर्गणीसाठी बाबासाहेब शिंदे, शिक्षक रमेश शिंदे आदींनी पुढाकार घेतला.

बाबासाहेबांनी ३१ हजार रुपये, तर मुंबईत स्थायिक झालेले काका मोहन शिंदे यांनी एक लाख रुपये वर्गणी दिली. पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची मदत घेण्यात आली. ट्रस्टचे दिवंगत अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी आदी पदाधिकाऱ्यांनी गावाची पाहणी केली. गाळ काढण्यासाठी तीन पोकलेन, २५ डंपर आणि १५ ट्रॅक्‍टर्स अशी मदत झाली. परिसरातील शेतकऱ्यांकडून सुमारे ५० एकरांत गाळाचा वापर झाला. त्यातून जमिनीची सुपीकतेकडे वाटचाल सुरू झाली.

आर्थिक समृद्धीचा गवसला मार्ग

सर्वांच्या प्रयत्नांमधून जलसंधारणाची कामे झाली. तलावाची जलसाठवण क्षमता ५१ कोटी लिटर झाली. शिल्लक गाळाची विक्री होऊन जमा झालेली रक्‍कम गावाच्या विकासासाठीच विनियोगात आली. गावातील भूजल पातळी वाढविण्यासाठी परिसरातील डोंगर उतारावर १०० नालाबांध करण्यात आले. गावाने आज जलशाश्‍वती मिळवली आहे.

सन २०२३ मध्ये पाऊस कमी झाला. तरीही २०२२ मधील तलावातील पाणी काटेकोरपणे वापरात येत आहे. या पाण्याची मार्च २०२२ आणि डिसेंबर २०२३ मध्ये दोन आवर्तने देण्यात आली. तलाव गाळ काढणीचा पुन्हा प्रस्ताव असून जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारनेही गावाची निवड जलयुक्त शिवार अभियानासाठी केली. आता गावाला आर्थिक प्रगतीचा मार्ग गवसला. चारा पिकांच्या लागवडी वाढल्या. दुग्धोत्पादनाला चालना मिळाली. घरोघरी गोठे दिसत आहेत.

Drought Condition
Drought Condition : दुष्काळस्थितीत पाणी, चाराटंचाईचे संकट

‘ॲग्रोवन’ ठरला दिशादर्शक

पिंगोरीच्या कामांची दखल यापूर्वी ॲग्रोवनने ‘पाणीदार गावे’ मालिकेतून घेतली आहे. ‘सकाळ प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध पाणीदार गावे या पुस्तकातही त्याचा उल्लेख आहे. ग्रामविकास आणि दुष्काळ निवारणासाठी ‘ॲग्रोवन’मुळे दिशा, प्रेरणा मिळाल्याचे गावातील बाबासाहेब शिंदे सांगतात. ॲग्रोवनच्या वर्धापन दिनानिमित्त यापूर्वी प्रकाशित विशेषांकांच्या अंकांचे वाटपही गावात झाले आहे.

‘पिंगोरी ऑरगॅनिक’ ब्रॅण्ड

सुमारे ४४ शेतकऱ्यांनी ५० एकरांवर रसायन अंशमुक्त भाजीपाला शेती पिकवित ५०० ग्राहक जोडण्यांपर्यंत पल्ला गाठला आहे. जय गणेश सेंद्रिय शेती गटाचे रूपांतर पिंगोरी फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन होण्यात झाले आहे. ‘पिंगोरी ऑरगॅनिक’ हा ब्रॅण्ड विकसित झाला आहे.

दहा वर्षापूर्वी पशुधनाची १०० ते २०० पर्यंत असलेली संख्या ८७० वर पोहोचली असल्याचे गावचे सरपंच संदीप यादव सांगतात. पूर्वी त्यांच्याकडे पाच गायी होत्या. आता त्या ३० पर्यंत आहेत.

देवराईचे स्वरूप देणार

गावाभोवतालच्या डोंगररागांमध्ये मोर, हरणे तसेच विविध वन्यजीवांचा वावर आहे. पावसाळ्यातील वातावरण रम्य असल्याने निसर्ग पर्यटनासाठी चांगल्या संधी आहेत. त्यादृष्टीने कृषी, वन विभाग व लोकसहभागातून मृद्‍- जलसंधारणाबरोबरच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या माध्यमातून जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यादृष्टीने विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या परिसरात देवराईचे स्वरूप देण्याचे प्रयत्न आहेत.

सामूहिक गोठा संकल्पना

गावातील महिला बचत गटांसाठी सामूहिक गोठ्याची संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यासाठी ॲटॉस उद्योगाने सामाजिक दायित्व निधीतून गायींचे वाटप केले. सध्या ३५ पर्यंत गायी आहेत. दररोज १५० लिटरपर्यंत दूधसंकलन होते. गोठ्याच्या व्यवस्थापनासाठी रोहन ताकवले या तरुणाला रोजगार उपलब्ध झाला आहे. सुमारे २४ गुंठ्यांत सौरऊर्जेवर आधारित गोठा व ‘मिल्क पार्लर’ आहे. भविष्यात ब्रॅण्ड तयार करून दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याचा प्रयत्न आहे.

संदीप यादव, ७७९८३२७७७५ (सरपंच - पिंगोरी)

बाबासाहेब शिंदे, ९८८११९१३५१

रमेश शिंदे, ७७६७९५६१९४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com