Drought Condition : दुष्काळस्थितीत पाणी, चाराटंचाईचे संकट

Drought Update : दुष्काळी परिस्थितीत पाणीबाणी असताना चाऱ्याचे संकट पाण्याअभावी दिवसेंदिवस गडद होत आहे.
Drought Update
Drought UpdateAgrowon

Nashik News : यंदा जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ३३ टक्क्यांनी कमी आहे. परिणामी खरीप हंगामातील साठवलेला चारा उपलब्धता तुलनेत कमी आहे. प्रामुख्याने नांदगाव, सिन्नर, चांदवड व येवला तालुक्यांत चाराटंचाई आहे. एकीकडे चाराटंचाई तर दुसरीकडे पाणीटंचाई अशी संकटे पशुपालकांसमोर आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणीबाणी असताना चाऱ्याचे संकट पाण्याअभावी दिवसेंदिवस गडद होत आहे.

जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९७४ मिमी आहे. मात्र प्रत्यक्षात ६५१.९ मिमी पाऊस पडला. परिणामी पाणीटंचाई गंभीर असताना चारा पिके कमी असल्याने जूनअखेर चारा पुरेल अशी परिस्थिती आहे. कोरड्या चाऱ्याची थोड्याफार प्रमाणात उपलब्धता आहे, तर हिरव्या चाऱ्याची सर्वाधिक टंचाई आहे.

त्यात दुष्काळी पट्ट्यातून पाण्याच्या भागात येणाऱ्या मेंढपाळांचा संघर्ष वाढला आहे. परिणामी गोदाकाठ परिसरातून चाऱ्याची उपलब्धता केली जात आहे. एकीकडे खरीप हंगामात पिकांची काढणी झाल्यानंतरचा चारा वापरला गेला. तर रब्बी हंगामातील लागवडीखालील पीक क्षेत्रात घट असल्याने चाऱ्याची अपेक्षित उपलब्धत होऊ शकली नाही.

Drought Update
Water Scarcity : बुलडाणा जिल्ह्यात २९ गावांत धावताहेत टँकर

त्यामुळे दर दुप्पट वाढल्याने पशुपालकांना चारा खरेदी करणे परवडत नसल्याचे चित्र आहे. दुष्काळाचे सावट असल्याने गेल्या फेब्रुवारी महिन्यापासूनच पशुपालकांची चाऱ्यासाठी शोधाशोध सुरू आहे. सिन्नर, येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेजारच्या नगर जिल्ह्यात चाऱ्यासाठी शोधाशोध सुरू आहे. एकंदरीत वाढता खर्च व चाऱ्याच्या टंचाईमुळे पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे झाले आहे.

जिल्ह्याबाहेर वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई

पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, नांदगाव, सिन्नर व चांदवड तालुक्यांमध्ये पशुधनासाठी केवळ दीड महिना पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. जनावरांसाठी जिल्ह्यात प्रतिदिन चाऱ्याची गरज ६,८९७ टन इतकी आहे.

१५ जूनपर्यंत पुरेल इतका चारा सध्या उपलब्ध आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहण्यासाठी चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली. त्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून आगामी दोन महिन्यांसाठी हे आदेश देण्यात आले आहेत.

चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी २ कोटींचे बियाणे वितरित

पाऊस लांबल्यास जूननंतर चाऱ्याची टंचाई गंभीर होऊ शकते, या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने उपाययोजना म्हणून २ कोटी ३० लाख रुपयांचे चारा बियाणे १५,२९९ पशुपालकांना मोफत वितरित केले आहे.

ज्यामध्ये ८०,३५० किलो मका बियाणे, १७३५२ किलो ज्वारी बियाणे, १४,००० किलो बाजरी व १६,६६५ किलो संकरित मका बियाण्यांचा समावेश आहे. त्यातून ३ लाख ४० हजार टन उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तो जुलैपर्यंत पुरेल असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.

Drought Update
Drought Condition : नव्वद लाख पशुधन जगवायचे कसे ?

जनावरांची संख्या

मोठी जनावरे ८,९२,६०४

लहान जनावरे २,२३,६८०

शेळ्या-मेंढ्या ८,७०,०२३

एकूण पशुधन १९,८६,३०७

चाऱ्याचे भाव कडाडले

उसाचा भाव २,००० रुपयांवरून ३,५०० ते ४,००० रुपये टन

हिरवा मका चारा २,००० रुपयांवर ३,००० वर

कसमादे कांदा काढणी पश्चात पातीचे भाव प्रतिट्रॉली ३,००० ते ४,००० रुपयांवर

ज्वारीचा कडबा १५०० रुपये शेकड्यावरून २,५०० ते २,८०० रुपयांवर

नांदगाव तालुक्यात भयानक दुष्काळ आहे. चाऱ्याची परिस्थिती अवघड आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. एक हजार रुपये देऊन १ हजार लिटरचे टँकर घ्यावा लागतो. एक महिन्यापासून पूर्ण चारा संपला आहे. एक महिन्यापासून चार हजार रुपये टनाने ऊस घ्यावा लागत आहे. त्यात उसाची कमतरता आहे. एक टन मक्याचा चारा आणण्यासाठी १५ हजार रुपये खर्च येत आहे.
सोमनाथ मगर, नांदगाव तालुका युवा अध्यक्ष- कांदा उत्पादक शेतकरी संघटना
चाऱ्याची परिस्थिती फारच वाईट आहे. चारा दुप्पट भाव देऊन देखील मिळत नाही
विजय देवरे, पशूपालक, वाजगाव, ता. देवळा
सध्या दुधाळ जनावरांचा सांभाळ अडचणीचा आहे. साठवलेला चारा काही दिवसांत संपुष्टात येईल. त्यामुळे दुधाळ जनावरांसाठी चारा डेपो तर इतर जनावरांसाठी चारा छावणी सुरू करावी. चाऱ्याचे भाव परवडणारे नाहीत.
कृष्णा घुमरे, पशुपालक, पांगरी, ता. सिन्नर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com