
डॉ. सुहास पुजारी
Indian Nature Writers: वनाधिकारी म्हणून शासकीय सेवेत असल्याने तीन तपांहून अधिकचा काळ मारूती चितमपल्ली यांच्या भाळी वनवास लिहिला गेला हे खरे, परंतु हा वनवास ही एक संधी समजून आपल्या व्यवसायाचा सांधा अभ्यासविषयाशी जोडून घेत एखाद्या ऋषीसारखे जीवन व्यतीत करण्याचा निश्चय त्यांनी केला. वानिकी विद्येच्या शिक्षणाने आणि आदिवासींच्या सान्निध्याने त्यांना सृष्टीची रहस्ये खुणावू लागली. संस्कृत भाषेच्या अध्ययनाने आणि निसर्गमग्न झालेल्या मनाने रानवाटा तुडवताना त्यांच्या संवेदनशील मनाला सर्जनाच्या वाटेची भूल पडली.
पक्षितज्ज्ञ सालिम अली, व्यंकटेश माडगूळकर आणि गो. नी. दांडेकर यांच्याकडून या सर्जनोत्सुक काळात त्यांना निसर्गनिरीक्षणाची व ललित लेखनाची प्रेरणा मिळाली. या सर्व संस्कारांतून मारुती चितमपल्ली यांच्यातला वनविद्येचा तत्त्वज्ञ ललित गद्यकार घडला. चितमपल्ली हे मुळात पक्षिशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक. अरण्यजीवनावरील आपले अनुभव व संशोधन लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांनी ललित लेखनाची वाट अनुसरली. अठरा भाषा जाणणाऱ्या या वनमहर्षीने आपला समृद्ध असा निसर्ग-जीवनानुभव एकवीस ग्रंथांतून शब्दबद्ध केला. ललित गद्य, कथा, व्यक्तिचित्रे, आत्मकथन, कोश वाङ्मय, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांतील लेखन त्यांनी केले.
मारुती चितमपल्ली यांचे जीवन म्हणजे वनविद्येच्या अभ्यासाचे एक ध्यासपर्व होते. वन्यजीव निरीक्षण ही एक साधना आहे आणि वनानुभवांना साहित्यात आणणे ही एक तपश्चर्या आहे, या भूमिकेतून त्यांनी अवघा लेखनप्रपंच केला. वारकरी नेत्रांनी सावळ्या विठ्ठलाचे रूप पाहावे त्याप्रमाणे त्यांनी हिरवा, निळासावळा असा निसर्ग डोळ्यात साठवला. निसर्ग हा त्यांच्या अखंड चिंतनाचा विषय राहिला. त्यातूनच निसर्ग हे आपले दैवत आहे आणि साहित्यनिर्मिती ही आपली शब्दपूजा आहे, अशा श्रद्धेने त्यांनी निसर्गाची नानाविध रूपे शब्दबद्ध केली. त्यांची ही वनचित्रणे मराठी शब्दसृष्टीतील वनचिंतनेच नव्हे तर जीवनचिंतने ठरली. त्यांच्या लेखनांतून वनवैविध्य आणि वनमांगल्य आविष्कृत झाल्याने कित्येक वाचकांच्या मनात जंगलस्नेहाचे, निसर्गप्रेमाचे बीज रुजले. पर्यावरणीय प्रबोधन आणि साहित्य या दोन्ही स्तरांवर चितमपल्लींचे हे योगदान बहुमूल्य आहे.
निसर्ग चैतन्यमय आहे, सारे अरण्य म्हणजे एक प्राणमय जीव आहे, त्याला त्याचे स्वतंत्र व्यक्तित्व आहे, ही निसर्गाकडे पाहण्याची शुद्ध, स्वतंत्र आणि व्यापक दृष्टी चितमपल्ली यांच्या निसर्गलेखनाला निराळेपण मिळवून देते. त्यांच्या ललित साहित्याचा एक लक्षणीय विशेष असा की, अरण्यविद्येतून प्राप्त झालेली शास्त्रीय माहिती अतिशय लालित्यपूर्ण आणि रोचक स्वरूपात त्यात येते. माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे ललित साहित्यात रूपांतर करण्याची किमया त्यांच्या निसर्गपर लेखनाने साधली. शास्त्रीय ज्ञान आणि लालित्य यांचा सुरेख मेळ त्यांच्या साहित्यात पाहायला मिळतो. ललितगद्य आणि कथा या साहित्यप्रकाराच्या सीमारेषा धूसर करणारे त्यांचे लेखन नाना रसभावनांनी अंतर्बाह्य फुललेले आहे. शास्त्रीय ज्ञानाच्या भाराने ते वाकले नाही. शास्त्रीय ज्ञान ललितरूप धारण करून अवतरण्याचे अप्रूप त्यांच्या ललित गद्यात पाहायला मिळते.
वनमहर्षी
चितमपल्ली हे वनमहर्षी होते, सृष्टीची रहस्ये उलगडून दाखवितानाच आपण कलाकृती निर्माण करीत आहोत, हा कलावंताचा भाव त्यांच्या मनात उत्कटतेने दाटलेला दिसतो. त्याचे हे एक उदाहरण पाहा- मंदिरातील सतत वाजणाऱ्या घंटेच्या नादात कधी पुनरावृत्ती नसते. देवळासमोरच्या पिंपळाचा घोषनाद एखाद्या चांदीच्या किणकिणणाऱ्या घंटीच्या नादासारखा वाटतो. पिंपळाची सळसळणारी पानं वातावरणात एक प्रकारची नादमाधुरी ओतीत असतात. नदीकाठच्या पिंपळाची सळसळ नदीच्या संथ प्रवाहाला साथ देते. किनाऱ्यावरच्या पिंपळाची सळसळ आणि तिला साथ देणारी सागराची गाज यांतला कुठला आवाज गूढ आहे हे सांगता येत नाही. घरासमोरच्या पिंपळाची सळसळ अंगाई गीताप्रमाणे वाटते.
पक्षिवेडा माणूस
पक्षिजगत हा चितमपल्ली यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. पक्ष्यांच्या आठवणींनी त्यांचे सबंध भावविश्व व्यापलेले होते. त्यातून ‘पक्षिवेडा माणूस’ ही त्यांची ओळख सर्वदूर झाली. चितमपल्ली यांच्या पक्षिवेडाचे फलित म्हणजे त्यांनी निर्माण केलेला ‘पक्षिकोश’ हा ग्रंथ. ४५० पक्ष्यांची माहिती त्यांनी या कोशात दिली आहे. चितमपल्ली यांच्या शब्दसंपत्तीचा गौरव करताना जी. ए. कुलकर्णी म्हणतात, “... शिवाय मराठीत केवढी शब्दसंपत्ती आहे याचेही दर्शन घडते. निरनिराळी झाडे, पाखरे, वेगवेगळे प्राणी यांची इतकी नवी जिवंतपणे रुजलेली नावे तुमच्या लेखनात दिसतात, की आपणाला मराठी येते का यावदद्दलच मला सांशकता वाटू लागते. याचे कारण म्हणजे केवळ व्यवसायापलीकडे जाणारी आतड्याची एक ओढ तुमच्यात आहे. तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेर ओढ आहे.’ (मारुती चितमपल्ली : व्यष्टी आणि सृष्टी, पृ. १७८)
वैविध्यपूर्ण प्राणिसृष्टीही चितमपल्ली यांच्या लेखनात येते. प्राण्यांची रूपवर्णने आणि जीवनशैली यांचे वेधक चित्रण करण्यात त्यांची प्रतिभा रमते. चितमपल्ली यांनी आपल्या प्रदीर्घ वनजीवनात वन्यजीवांचीही सूक्ष्म निरीक्षणे केली. जलीय जीवनाचा अभ्यास केला. आदिवासींची संस्कृती, त्यांचे निसर्गनिर्भर जीवन, त्यांना ज्ञात असलेली सृष्टीची रहस्ये त्यांच्या ललित लेखनातून आविष्कृत झाली. अशा अद्भुत अरण्यसंस्कृतीच्या दर्शनातून त्यांच्या लेखनात विलक्षण असे वनविज्ञान प्रकटते. चितमपल्ली यांनी केवळ वनदर्शन घडवले नाही तर त्यातून जीवनदर्शन घडवले. उन्नत, अनुभवसंपृक्त असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. चितमपल्ली हे ‘वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार’ आहेत, हे त्यांचे लेखन अभ्यासले, आस्वादले की सहज लक्षात येईल.अशा अरण्यऋषीला भावपूर्ण श्रद्धांजली!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.