Dairy Success Story : दुग्धव्यवसायात शून्यातून साधली भरभराट

Dairy Business : भेंडा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर ) येथील गदई कुटुंबाकडे एकेकाळी शेतीचा तुकडा नव्हता. राहायला घर नव्हते. कुटुंबातील सदस्यांनी मोलमजुरी केलीय. करून गाठीस पै पै रक्कम जमविली. कुटुंबातील सर्वांनी एकत्रित कष्ट उपसले. उत्कृष्ट नियोजन केले.
Dairy Farming
Dairy Farming Agrowon
Published on
Updated on

Dairy Farming Success : संतश्रेष्ठ नागेबाबा यांची समाधीस्थान असलेली पावन भूमी आणि मारुतराव घुले सहकारी साखर कारखाना या दोन गोष्टींसाठी भेंडा (जि. अहिल्यानगर, ता. नेवासा) सर्वदूर परिचित आहे. या भागात पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने अनेक कुटुंबे पशुपालन, दूधव्यवसाय व व अन्य पूरक व्यवसाय करतात.

गदई हे त्यापैकीच एक कुटुंब. खंडुराव गदई यांना भाऊसाहेब, रावसाहेब व चांगदेव अशी तीन मुले. सतरा सदस्यांचे हे एकत्रित कुटुंब. आर्थिक परिस्थिती अत्यंत कमजोर होती. शेतीचा जराही तुकडा नसल्याने खंडुजी मोलमजुरी करून व भाकड जनावरे सांभाळून कुटुंब चालवत.

त्यांच्याबरोबरच सर्वात थोरले चिरंजीव भाऊसाहेबांवरही मुख्य जबाबदारी आल्याने त्यांनी वडिलांच्या हाताखाली हेच कष्ट सुरू केले. परिश्रमांत कोणतीही कमतरता न ठेवणाऱ्या गदई पितापुत्रांना येथील रवींद्र नवले यांच्यासह गावातील भेंड्यातील अनेकांचे पाठबळ मिळू लागले.

दूध संकलन पोचले पाचशे लिटरवर

भाकड जनावरे सांभाळताना त्यातील दोन म्हशींपासून पंचवीस वर्षांपूर्वी गदई यांनी दुग्धव्यवसायाला सुरवात केली. येणाऱ्या उत्पनातून पुन्हा भांडवल गुंतवणूक करून म्हशींच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ सुरू केली. त्यानुसार गोठ्याचे बांधकाम होत गेले. आजमितीला ६० बाय २१ फुटांचे दोन व ८० बाय १५ फुटाचा एक असे तीन गोठे आहेत.

एवढ्या वर्षांच्या सातत्यपूर्ण कामांमधून आज गोठ्यातील जनावरांची संख्या ८० पर्यंत पोचली आहे. पैकी दोन गीर गायी वगळता बहुतांशी जाफराबादी व काही मुऱ्हा म्हशी आहेत. बहुतांश म्हशी प्रति दिन १० ते १८ लिटरपर्यंत तर काही २० ते २४ लिटरपर्यंत दूध देतात. सुरवातीच्या काळात वीस लिटरपर्यंतच दूधसंकलन होते.

स्थानिक पातळीवर ग्राहकांना विक्री व्हायची. आज दिवसाला पाचशे लिटरच्या आसपास दूध संकलनापर्यंतचा यशस्वी पल्ला कुटुंबाने गाठला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील व्यावसायिकांना साठ रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. संबंधित डेअरी व्यावसायिक सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळा जागेवरून दूध घेऊन जातात.

Dairy Farming
Dairy Farming : दुष्काळात संघर्षातून टिकविलेला दुग्ध व्यवसाय

म्हशीची खरेदी-विक्री

पूर्वी खंडुराव मोलमजुरी करतानाच शक्य त्या भाकड म्हशी घेऊन त्यांचा सहा ते सात महिने सांभाळ करीत. वेत्या होऊ लागल्यावर विक्री करण्याचा व्यवसाय करत. भाऊसाहेब व भावंडांनी हा व्यवसाय पुढे सुरू ठेवला. अलीकडील पंधरा वर्षांपासून त्यात वाढ केली. शेतकऱ्यांकडूनही जातिवंत म्हशीची मागणी होत होती.

आज म्हशींच्या खरेदी-विक्री व्यवसायात भाऊसाहेबांनी हातखंडा मिळवला आहे. दुधाच्या उत्पन्नाव्यतिरिक्त त्यातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत तयार केला आहे. व्यायला आलेल्या म्हशी घेऊन काही काळानंतर त्यांची होते. त्यासाठी राज्यासह राज्याबाहेरील व्यापाऱ्यांसोबतही संपर्क वाढवला आहे.

चाऱ्याची व्यवस्था

पशुधन मोठ्या प्रमाणात असल्याने दररोज किमान साडेतीन टनांच्या आसपास चारा लागतो. त्यासाठी पाच एकरांत चारापिके घेतली जातात. त्यात ऊस, मका, गिन्नी गवत आदींचा समावेश असतो. घरच्या शेतीतून मिळणारा चारा साधारण दोन ते तीन महिने पुरतो. उर्वरित गरज बाहेरील चारा खरेदीतून भागवली जाते. याशिवाय दररोज अडीच टन पशुखाद्य लागते. त्यात सरकी पेंड, मका, तूर भरड्याचा समावेश असतो. पशुखाद्य भिजवून दिल्याने म्हशींसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे दुधाचा दर्जा चांगला येत असल्याचा गदई यांचा अनुभव आहे. पाण्यासाठी दोन विंधन विहीरी आहेत. या भागात पाणी बऱ्यापैकी उपलब्ध असल्याने त्याची टंचाई भासत नसल्याचे भाऊसाहेब सांगतात.

Dairy Farming
Dairy Farming : मेहनत, चिकाटीतून दुग्धव्यवसायात भरभराट

शेणखताची उपलब्धता

म्हशीपालनातून दर दोन दिवसांला तीन टन तर वर्षभरात तीनशे टनांच्या आसपास शेणखत उपलब्ध होते. घरच्या शेतासाठी वापरून उर्वरित शेणखताची प्रति ट्रेलर चार हजार रुपये दराने विक्री होते. परिसरात ऊस शेती अधिक असून फळबागा, भाजीपाला, कांदा उत्पादन घेणाऱ्यांचीही संख्याही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे शेणखताला मागणी सातत्याने असते. एकूण दुग्धव्यवसायातून सुमारे १५ ते २० टक्क्यांपर्यंत नफा शिल्लक राहतो.

आर्थिक समृद्धी मिळवली

भाऊसाहेब सांगतात की पूर्वी आमच्याकडे शेती तर नव्हतीच. पण राहायला घर देखील नव्हते. सरकारी जागेत गावठाणात आम्ही दिवस काढले. परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतीची, कुटुंबाची भरभराट साधली आहे. टप्प्याटप्प्याने नऊ एकर शेती घेतली. गोठ्याशेजारीच टुमदार बंगला बांधला आहे. बहिण- भावांची लग्ने करता आली. ट्रॅक्टर, फोर व्हीलर, दुधासाठी पिक-अप व्हॅन आहे. मुले महाविद्यालय व शाळेत उत्तम शिक्षण घेत आहेत. कुटुंब शेती व दुग्धव्यवसायातून समाधानी व प्रगत झाले आहे.

कुटुंबाची साथ ठरली महत्त्वाची

कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्रित कामांमधून व्यवसायाला पुढे नेले आहे. भाऊसाहेबांना पत्नी नंदा, मुले कुणाल, राहुल व सागर, वडील खंडुराव, आई मंदाबाई, बंधू रावसाहेब, त्यांची पत्नी जयश्री, मुलगा दादासाहेब, मुली ममता व भाग्यश्री, चांगदेव यांची पत्नी शीतल, मुलगा साई, पुनम, कावेरी यांच्यासह भाचा डॉ. अजिंक्य साबळे अशा सर्वांची मदत होते.

यंत्रांद्वारे म्हशीचे दूध काढणे अडचणीचे होत असल्याने मजुरांची मदत घ्यावी लागते. हे अत्यंत कष्टाचे काम असतो. त्यामुळे अकरा वर्षांपासून पाच ते सहा मजूर वार्षिक करारावर तैनात केले आहेत. त्यांच्या राहण्यासह अन्य बाबीचीं जबाबदारी गदई कुटुंबाने घेतली आहे.

भाऊसाहेब गदई ९७६३६४७८८४

रावसाहेब गदई ९६५७१२२०१४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com