
Latur News: औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांचा ‘शेत तिथे रस्ता’ हा उपक्रम राज्यात व्यापक स्वरूपात राबवण्यात येत आहे. येत्या पाच वर्षात शंभर टक्के शेतरस्ते पक्के तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे पुढाकार घेत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सोमवारी (ता. ११) ते बोलत होते. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले अध्यक्षस्थानी होते. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार सर्वश्री विक्रम काळे, संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश कराड यांच्यासह लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
लातूरकरांच्या अनेक वर्षांपासूनच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासोबत २९१ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दोन्ही मागण्यांना मी आजच मान्यता देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. लातूर येथे उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वेकोच फॅक्टरीमध्ये सध्या एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. फॅक्टरी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर दहा हजार रोजगार उपलब्ध होणार असून त्यात स्थानिकांना रोजगार देण्याबाबत मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बजावून सांगितले आहे.
फॅक्टरीसाठी आवश्यक मानव संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे साह्य घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मराठवाड्यातील सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी नवे प्रकल्प पुढे नेताना जुन्या प्रकल्पांची क्षमता वाढवण्यात येणार आहे. मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी ५२ टीएमसी पाणी मिळवून देण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
लोकनेते मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, `लोकनेते मुंडे यांनी सामाजिक न्यायाची कास सामाजिक न्यायाची कास कधीच सोडली नाही. जातीपातीमध्ये विखुरलेल्या समाजाला एकत्र करून त्यांनी या समाजाची मोट बांधली. त्यातील सामान्य व्यक्ती आज आमदार झाले. सामान्यांना स्वप्न पाहायचा अधिकार दिला. ओबीसींची नेते म्हणून काम करताना त्यांनी कधी दुसऱ्या समाजाला कमी लेखले नाही.
पालकमंत्री भोसले व ग्रामविकासमंत्री गोरे यांचीही भाषणे झाली. आमदार कराड यांनी प्रास्ताविक केले. या वेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील यांनी आभार मानले.
मुंडे-देशमुखांच्या मैत्रीलाही उजाळा
कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंडे व लोकनेते विलासराव देशमुख यांच्या मैत्रीला उजाळा मिळाला. पंकजा मुंडे यांनीही दोघांची मैत्री होती, परंतु त्यांनी स्वतःच्या पक्षासोबत कधी प्रतारणा केली नसल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मुंडे व विलासरावांनी विविध पदांवर काम करताना लोकप्रियता मिळवली. त्यांची मैत्री सर्वश्रुत होती. आज दोघांचे पुतळे आजूबाजूला आले. हा विलक्षण योग आहे, असेही फडणवीस म्हणाले. तत्त्व व सामान्य माणसांच्या हिताशी प्रतारणा न करता स्वाभीमान गहाण न ठेवता काम करायचे, हीच त्यांची शिकवण होती, असे पंकजा मुंडे यांनी नमुद केले. वडिलांच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.