
ZP Marathi Education: शीतल हर्षल संखे सुरुवातीला आदिवासी बहुल असलेल्या डहाणू तालुक्यात हिलीमपाडा येथे रुजू झाल्या. त्यानंतर तीन वर्षांनी पालघर तालुक्यातील शिगाव येथे दहा वर्षे उत्तम सेवा केल्यानंतर आता त्या पालघर तालुक्यातीलच जिल्हा परिषद सरकारी मत्स्यशाळा नवापूर येथे सहा वर्षांपासून कार्यरत आहेत. या संपूर्ण सेवाकाळात शाळा आणि विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन त्यांनी उत्साहाने उत्तम कार्य केले.
त्यांच्या शाळेतील पटसंख्या ६७ असून इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. त्या पहिली व दुसरीच्या वर्गांना अध्यापन करतात. या वर्गात एकतीस विद्यार्थी आहेत. शिक्षकांची शाळेतील प्रत्येक कृती विद्यार्थ्यांना आनंद देणारी असावी, असे त्यांचे धोरण आहे. विद्यार्थी लेखन, वाचन, गणिती क्रिया यात पारंगत व्हावेत यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेत काही उपक्रम नियोजनपूर्वक राबवले आहेत. त्यांचा चांगला उपयोग विद्यार्थ्यांना होताना पाहून त्या उत्साहाने उपक्रमात आणि अध्यापनात रममाण होतात.
मराठी भाषेसाठी...
विद्यार्थ्यांनी रोज नवीन पाच शब्दांचे वाचन व लेखन करून त्यांना दिलेल्या एका छोट्या डायरीत लिहून ठेवायचे. हा माझा शब्दकोश उपक्रम त्या दरवर्षी तीन महिने घेतात. त्यात सुमारे दीडशे नवीन शब्दांची ओळख विद्यार्थ्यांना होते. या उपक्रमात काही विद्यार्थ्यांनी रोज पाचपेक्षा जास्त शब्दांचीही तयारी केली. वाचन आणि लेखन सुधारण्यासाठी या उपक्रमाचा त्यांना चांगलाच फायदा मिळतो. एका शब्दाच्या संबंधातील अनेक शब्द हा शब्द संग्रह वाढवणारा महत्त्वाचा उपक्रम आहे.
त्यात एखादा विषय किंवा वस्तूंचे नाव घ्यायचे; त्यावरून आठवणारे त्या संबंधित शब्द आठवून आठवून वहीत लिहायचे, वाचायचे. उदा : फुल - तोरण, सजावट, रांगोळी, पुजा, वेल, रोपटे, मंदिर, देव, गुलाब, मोगरा, हार, सुवास, इत्यादी. याच उपक्रमातून त्यांचा पुढील उपक्रमाची पूर्वतयारी होते. तो उपक्रम म्हणजे माईंड मॅप! विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि विचारशक्तीला वाव देणारा हा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक शिक्षक राबतात. शीतल संखे या देखील हा उपक्रम राबवतात;
त्यात एखादा विषय, एखादा घटक, एखादी वस्तू, एखादे नाते, प्रसंग, गोष्ट ,धडा, कविता यांपैकी कोणतेही एकाचे नाव फळ्यावर मध्यभागी लिहून घेऊन त्याचे सारे मुद्दे विद्यार्थ्यांना विचारून घ्यायचे आणि फळ्यावर लिहायचे. नंतर ते सर्व वाचून घ्यायचे. लक्षात ठेवायचे. असा हा मनाचा विकास करणारा माईंड मॅप! याखेरीज ‘शब्द पेरा शब्द उगवा’ हा उपक्रम शब्दांचे उपयोजन करून गोष्टी तयार करायला शिकवतो. आपल्या विद्यार्थ्यांत मिळून मिसळून त्या सहजपणे विविध उपक्रम राबवतात.
गणित विषयासाठी...
दुकान मांडा बाजारात, पैसे कमवा भविष्यात हा जीवनाभिमुख उपक्रम आहे. यात विद्यार्थी विविध वस्तू, घरी बनवलेले खाऊचे पदार्थ यांची शालेय बाजारात मांडणी करून वस्तूंची विक्री करतात. खरेदी, विक्री, नफा, तोटा याबद्दल वस्तुनिष्ठ माहिती मिळते. व्यावहारिकता कळायला मदत होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांना खूप आनंद देऊन जातो. पालकांचा व समाजाचाही सहभाग ह्या उपक्रमात असल्यामुळे सामाजिक बांधीलकी जपली जाते. लंगडी खेळा टप्पा गाठा हा ही मुलांचा एक आवडता उपक्रम खेळच म्हणावे तर! वर्गात दोनच्या टप्प्याने, तीन चार टप्प्याने फरश्यांवर संख्या टाकून घेतली जाते.
लंगडी खेळत खेळत विद्यार्थ्यांनी टप्प्यावर पोहोचायचे, यातून सहजपणे दोन चा पाढा, तीन चा पाढा याचा परिचय होतो. यापुढील पाढ्यांसाठी कसे टप्पे करावे लागतील असा स्वाध्यायही विद्यार्थ्यांना देता येतो. अंक शिडी ही चढत्या क्रमाने बनवलेली असते. प्रत्येक वेळी पुढचा अंक कसा मोठा आहे, ते विद्यार्थ्यांनी ओळखायचे आणि चढायचे असते. सर्वांत उंचावर एक वस्तू ठेवलेली असते, विद्यार्थ्यांनी तिथपर्यंत पोहोचायचं असते. या उपक्रमातून संख्यांचे दृढीकरण होते.
शीतल संखे मॅडम इंग्रजी विषयासाठीही विविध उपक्रम राबवतात. हे सर्वच उपक्रम खेळ सदृश असल्यामुळे आनंददायी शिक्षण घडते. बोलण्यातला आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे हे सर्व उपक्रम विद्यार्थ्यांना देखील आवडतात. संखे मॅडम यांनी काही लोकसहभागही मिळवलेला आहे. त्यात सागरी पोलिसांकडून शाळेला २०२४-२५ मध्ये दोन पंखे व एक कुलर मिळाला आहे .
स्वयम फाउंडेशन व उन्नित ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, प्रशांत पाटील यांच्याकडून वह्या वाटप, हरेण टेक्स्टाईल कंपनी व मिलिंद वडे यांच्याकडून स्कूलबॅग वाटप, सर्वद फाउंडेशन च्या डॉ. सुचिता पाटील यांच्याकडून शैक्षणिक सामग्री संपूर्ण कीट वाटप, गिनी लि. कंपनीचे निरज पुरोहित यांनी चार लाकडी कपाट, विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व ग्रंथालयासाठी शब्दकोश इ. साहित्य दिले आहे. ही शाळा भौतिक सुविधांनी सुसज्ज आहे.
- शीतल संखे : ९५२७३२०२२०
(लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.