
डॉ. कैलास दौंड
Innovative Teaching Story: श्वेता लांडे यांच्यातील शिक्षक सतत कार्यरत असतो. आपल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम अध्ययन अनुभव देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. इयत्ता नववी व दहावीच्या वर्गाला हिंदी व मराठी विषय त्या शिकवतात. इचलकरंजी ही वस्त्रोद्योगनगरी असल्याने इथे बिहारी व राज्यस्थानी कामगारांची संख्या अधिक आहे. अर्थातच शाळेत मारवाडी, हिंदू, मुस्लीम अशा समाजातील मध्यमवर्गीय स्तरातील पालकांची मुले येतात. श्वेता लांडे शाळेत राबवीत असलेले विद्यार्थिप्रिय उपक्रम पाहिले की त्यांच्या कामाची साक्ष पटते.
हसत-खेळत व्याकरण शिकू : कार्यात्मक व्याकरण शिकवताना ते बोजड आणि निरस वाटू नये याकरिता त्या व्याकरणातील घटकावर आधारित खेळ घेतात. या खेळामुळे मुलांमधील व्याकरणाची भीती कमी होऊन गोडी निर्माण होते. त्याचबरोबर व्याकरण घटकाचा प्रत्यक्ष वापर करायलाही विद्यार्थी आनंदाने शिकतात. रूक्ष विषय खेळातून त्या रंजक बनवतात.
लेखक, कवी आपल्या भेटीला : शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकात साहित्य समाविष्ट असलेल्या कवी, लेखकांबद्दल कुतूहल असते. त्यामुळे श्वेता लांडे यांनी अभ्यासक्रमातील कवी-लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला आणण्याचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमातून आजपर्यंत कवी इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, इत्यादींसह डॉ. छाया पाटील यांची विद्यार्थ्यांशी भेट घडवून आणली आहे. यावेळी साहित्यिकांनी विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधल्याने विद्यार्थ्यांना भाषिक बळ मिळाले.
एक मूल एक झाड : पर्यावरण संवर्धन आणि जाणीव जागृती यासाठी हा उपक्रम त्या राबवतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या प्रवेशासोबतच त्यांनी एक झाड देणे बंधनकारक करून त्या झाडाला विद्यार्थ्याचे नाव देऊन शाळेच्या आवारात ते झाड लावले जाते. ‘’झाडे लावा झाडे जगवा’’ हे प्रत्यक्षात राबवण्यात येते. या अंतर्गत आजपर्यंत अनेक औषधी वनस्पती, फुले व फळझाडे यांची जोपासना करून पर्यावरण वाचवण्यास हातभार लावला आहे. विद्यार्थ्यांनाही या झाडांबद्दल आपले झाड म्हणून आत्मीयता निर्माण झाली आहे.
तारखेचा पाढा : हा गणिती क्रियांसाठी उपयुक्त उपक्रम त्यांनी राबवल्यामुळे विद्यार्थ्यांचे एकतीस पर्यंतचे पाढे पाठ व्हायला मदत होते.
हजेरी देऊ शब्दांची : हा भाषा विषयक नावीन्यपूर्ण उपक्रम असून हजेरीच्यावेळी विद्यार्थी ‘हजर’ या ऐवजी समानार्थी, विरुद्धार्थी शब्द सांगून उपस्थिती सांगतात. या उपक्रमातून शब्दसंपदा वाढते. तसेच आकलन आणि पाठांतरही वाढून विद्यार्थ्यांचा भाषिक विकास साधला जातो.
मनातले काही हा अभिव्यक्तीला संधी देणारा उपक्रम त्या राबवतात. आवडता शनिवार यांत विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके देऊन वाचन करायला सांगितले जाते व त्यावरती प्रश्न विचारले जातात. यातून वयानुरूप विविध हिंदी, मराठी पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाचन घडवून आणले जाते. पाठ्यपुस्तकातील नाट्यीकरण करता येऊ शकेल अशा कविता व गद्य पाठाचे त्या विद्यार्थांकडून नाट्यीकरण करून घेतात. त्यासाठी त्या मार्गदर्शन करतात.
विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पर्यावरणीय अनुभव येण्यासाठी वार्षिक सहल आयोजित केली जाते. त्यात एकदिवसीय पायी पर्यटन देखील असते. विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यात नैपुण्य प्राप्त व्हावे यासाठी शाळेत क्रीडामहोत्सव घेतला जातो. राष्ट्रीय सणांच्या दिवशी योग, नृत्य, नाटिका यांची प्रात्यक्षिके दाखवली जातात. विद्यार्थ्यांनी तयार केलेले सायन्स प्रोजेक्ट व खाद्यपदार्थांची जत्राही शाळेत भरवली जाते. स्वरक्षणार्थ विद्यार्थ्यांना लाठीकाठी व कराटे प्रशिक्षण दिले जाते. या सर्व उपक्रमात श्वेता लांडे मॅडम या हिरिरीने सहभागी असतात.
श्वेता लांडे या स्वतः चांगल्या कवयित्री व लेखिका देखील आहेत. सामाजिक कार्यात त्या सतत भाग घेत असतात. विशेषतः महिलांना सक्षम बनविण्यासाठी त्या पुढाकार घेतात. आरोग्य जनजागृतीसाठी व्याख्याने देणे, इचलकरंजी येथील प्रेरणा महिला मंचात त्यांचा सहभाग असतो. अन्नदान, रक्तदान यासारख्या समाजोपयोगी कार्यात त्या स्वतः सहभागी होऊन इतरांनाही प्रेरणा देतात. अनाथाश्रमातील मुलांना त्यांनी वाचनासाठी मोठ्या संख्येने पुस्तके भेट दिली आहेत. त्यांना शैक्षणिक कार्यासाठी मिळालेल्या सन्मानामध्ये दिल्ली विद्यापीठाचा शिक्षक पुरस्कार (२०१९), हिंदी नवीकरण पाठ्यक्रम प्रशिक्षण भाषा सन्मान (२०२४) चा समावेश आहे.
- श्वेता लांडे ८७९६५६५९९८ (लेखक नामांकित साहित्यिक व शिक्षक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.