
Government Education Policy: आपल्या समाजात शिक्षणाला खूप महत्त्व दिलेलं आहे. शिक्षण आहे तर समाजात किंमत आहे. शिक्षण कधीच वाया जात नाही किंवा शिक्षणामुळे माणूस समृद्ध होतो. हे आपण बऱ्याच वेळा ऐकतो. हे खरं पण आहे. पण जर शिक्षणाचा बाजार मांडला जात असेल तर?
सध्या वातावरण खूप बदलत चाललेलं आहे. आपण केव्हाच आधुनिक जगात प्रवेश केलेला आहे. पण लोकांनी आधुनिकतेचा चुकीचा अर्थ काढलाय. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे नवनवीन गोष्टी शिकणे, अवघड वाटणाऱ्या गोष्टी सहज सोप्या करता येणे, बऱ्याच वेळेला माणसांची ताकद जिथपर्यंत पोहोचत नाही तिथे जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाने बाजी मारलेली आहे.
खरं तर हे सगळं माणसाच्या कौशल्यामुळे, बुद्धीमुळे शक्य झालेय. पण या सगळ्यात माणसाची मानसिकता मात्र बदलत चालली आहे. सतत स्पर्धेच्या जगात माणसाला बाजी मारायची आहे, सतत धावायचं आहे. पण या सगळ्यात कधी मुलांचा विचार केलाय का? त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल कधी जाणवलं का? बदलणारी शिक्षण पद्धती, वाढणाऱ्या पालकांच्या अपेक्षा, या ओझ्याने बिचारा विद्यार्थी मात्र वाकून गेलाय.
जीवघेणी स्पर्धा वाढली
पूर्वीच्या काळात शिक्षणाची पद्धती ही गुरुकुल आणि आश्रम यावर आधारित होती. त्यानंतर पाटी, पेन्सिल, वही, पेन आणि आता मोबाइलशिवाय पान ही हालत नाही. मूल जन्माला आल्यानंतर काही वर्षांनी त्याला शिक्षणासाठी शाळेत टाकले जाते. शाळेत गेल्यानंतर मुलांचा विकास होतो, अभ्यासाची गोडी निर्माण होते.
शिक्षण हे असं माध्यम आहे की आपण आपल्या जीवनात असाध्य गोष्टी सुद्धा साध्य करू शकतो आणि आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. आपल्या देशाची तरुण पिढी ही उद्याचं भविष्य आहे. त्यासाठी त्यांना लहानपणापासूनच जिंकण्याची जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. यासाठी शिक्षण क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आलेले आहेत. पण या सगळ्यात माणसांची मानसिकता मात्र बदलत चालली आहे.
सर्व काही तत्काळ पाहिजे. झटपट पाहिजे. शिक्षण पैसा, प्रसिद्धी त्यामुळेच खरंतर शिक्षणाचं बाजारीकरण झालं. शिक्षण महत्त्वाचं आहे पण त्याचा मात्र बाजार मांडला गेला. या व्यवस्थेत ज्ञान संपादन करण्याऐवजी सौदा चालू झाला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना प्राधान्य, शाळांचे खासगीकरण, शिकवणीचे वाढलेले प्रस्थ, पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा, मुलांमधील जीवघेणी स्पर्धा अजून बरच काही या सर्वांमध्ये कोणी मुलांच्या वयाचा, मानसिकतेचा विचार केलाय का?
या ज्या वयात मुलांकडे फक्त पाटी असायची त्यावर आता मुलांच्या खांद्यांवर जड दप्तरांचा ओझं असतं. शारीरिक विकास होण्याच्या काळात अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. यामुळे त्या मुलांची बुद्धी तर वाढते पण मन मात्र कमकुवत होत चाललंय. ज्यात त्याला कमी वयात डिप्रेशनला सामोरे जावे लागते. अशी मुले अनेक व्यसनाच्या आहारी जाताहेत.
शिक्षण पद्धती बदलते, याला नेमकं जबाबदार कोण? विद्यार्थी, पालक की शासन? जेव्हा मराठी शाळा चालू झाल्या तेव्हा अनेक प्रश्न सुटले. चांगले शिक्षक भरती झाले. मुलांना योग्य शारीरिक, मानसिक, वैज्ञानिक शिक्षण मिळू लागले. सर्व काही योग्य चालू असताना गरज पडली इंग्रजी विषयाची! त्या वेळेस मात्र मराठी शाळा या स्पर्धेत कमी पडू लागल्या व उगम झाला इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा!
अगदी ज्युनिअर केजीपासून इंग्रजी चालू झालं. खरं तर इथे सुरू झाला शिक्षणाचा बाजार! इंग्रजी विषयाचं महत्त्व पाहता खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना परवानगी देण्यात आली. इंग्रजी विषयाचे शिक्षण मराठी शाळेतच का नाही चालू केलं? ते जर चालू झालं असतं तर खासगी शाळांची गरजच पडली नसती. आज अनेक खासगी शाळा समाजसेवेच्या नावाखाली पैसे लुटत आहे. त्यांना मुलांच्या मानसिकतेचे काहीच घेणं-देणं नाही. त्यांच्यासाठी फक्त पैसा हाच महत्त्वाचं आहे. मला कुठल्याही खाजगी शाळांना दुखावण्याचा हेतू नाही.
खरं तर याला शासन पण तितकंच जबाबदार आहे. खासगी शाळेत अनेक सोयी सुविधा चमकधमक असते. पालक तसेच विद्यार्थी त्यांच्या बाह्य रंगाला बळी पडतात आणि जास्त पैसे भरून पाल्यांचा प्रवेश त्या शाळेत घेतात. अनेक ठिकाणी शासन खर्च करते. मला वाटतं खाजगी शाळांना परवानगी न देता सरकारी शाळांना योग्य सोयी सुविधा देऊन बदल का नाही केला? नक्कीच खूप चांगले शिक्षण मुलांना मिळाले असते पण कुणालाच काम नाही करायचं. चाललंय ना तसं फक्त चालू द्यायचं.
आणि यांस शासनाबरोबर पालकही तेवढेच जबाबदार आहेत. पालकांना हेच कसं कळत नाही आपण स्वतः शाळा रेग्युलर केली, मराठी शाळेत शिकलो आणि आज आपल्या चांगल्या पदावर आहोत. मुलांना पण आपण ज्यात माणुसकी जपली जाईल, समाधान असेल असे शिक्षण दिले पाहिजे. खरे तर पालकांनी जागरूक व्हायला पाहिजे. सावधान काळ सोकावतोय! भविष्य चांगल पाहिजे असेल तर आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवा.
- प्रणिता प्रमोद भावसार, बाबूजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी, जि. अहिल्यानगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.