Nagar News : नगर राज्याचे लक्ष लागून असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव व विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा २८ हजार ९२९ मतांनी नीलेश लंके यांनी पराभव केला असल्याचे रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. लंके यांच्या दाव्यानुसार अपेक्षित मताधिक्य मिळाले नसले तरी होम ग्राउंड पारनेर आणि श्रीगोंदा मतदार संघामुळेच लंके ‘जायंट किलर’ ठरले आहेत.
राहुरी, शेवगाव-पाथर्डी मतदार संघांत लंके यांनी मताधिक्य गृहीत धरले होते. मात्र झाले उलटे. या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांना अति आत्मविश्वास आणि स्वीय सहायक (पीए) यांनी लोकांशी तोडलेला संपर्क, लोकांनी केलेल्या संपर्कानंतरही अपेक्षित प्रतिसाद न देणेही पराभवाला कारण ठरले आहे.
नगर दक्षिण मतदार संघात आधी दहा वर्षे दिलीप गांधी तर मागील पाच वर्षे सुजय विखे असे गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपचा खासदार होता. या वेळी पुन्हा डॉ. विखे पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली. महाविकास आघाडीने पारनेरचे आमदार नीलेश लंके यांना रिंगणात उतरवले. या निवडणुकीत शेती, दूधदर, कांदा व मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रभावी ठरला असला, तरी सुरुवातीला विखे यांनी लंके यांना किरकोळ समजून विखे यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि तोच आत्मविश्वास विखे यांना नडला.
नगर दक्षिणेत शेवगाव-पाथर्डी, श्रीगोंदा येथे भाजपचे तर नगरमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार आहेत. शहरात सुजय विखे यांना ३,५०० मतांची, शेवगाव-पाथर्डीत ७,८४१ आणि राहुरीत ११,९३१ मतांची आघाडी मिळाली. मात्र नीलेश लंके यांना त्याचे होम ग्राउंड असलेल्या पारनेर मतदार संघात ३८,१०० आणि श्रीगोद्यात ३२,७११ मतांचे मताधिक्य मिळाल्याने लंके यांना विजयी केले.
मतदार संघनिहाय झालेली मते...
नीलेश लंके डॉ. सुजय विखे
नगर शहर ७४,२६३ १,०५,८५९
शेवगाव-पाथर्डी ९८५५१ १,०६,३९२
राहुरी ९४,९६७ १,०६,९०३
पारनेर १,३०,४४० ९२,३४०
श्रीगोंदा १,१८,९६० ८६,२४९
कर्जत-जामखेड १,०४,९६३ ९५,८३५
नीलेश लंके ग्रामपंचायत सदस्य ते खासदार पारनेर तालुक्यातील हंगा गावाचे राहिवासी असलेले नीलेश लंके हे शेतकरी, सामान्य कुटुंबातील आहेत. वडील ज्ञानदेव लंके हे प्राथमिक शिक्षक होते. एमआयडीसीत अल्प पगारावर नोकरी करणारे नीलेश लंके बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावित होऊन सामाजिक कामात आले. शिवसेनेचे शाखाप्रमुख, पारनेरचे उप-तालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख म्हणून काम करताना प्रचंड जनसंपर्क उभा उभा केला. २०१० मध्ये हंगा गावचे ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, उपसभापती २०१९ ला आमदार आणि २०१४ ला खासदार होणारे नीलेश लंके एकमेव आहेत. पत्नी राणी लंके जिल्हा परिषद सदस्य झाल्या होत्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.