Sugarcane Belt Beat BJP : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जबर धक्का देत ३० जागांवर आपलं स्थान निश्चित केलं. कांदा, ऊस, कापूस, हरभरा, द्राक्ष, हळद उत्पादक शेतकऱ्यांची या निवडणुकीत भाजपवर मोठी नाराजी दिसून आली. दरम्यान भाजपने मागच्या १० वर्षात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार एन्ट्री केली होती. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठी अस्वस्थता होती परंतु या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात पुन्हा एकदा शरद पवार गट आणि काँग्रेसने वर्चस्व निर्माण केलं आहे.
लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जादू चालल्याने पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्ट्यावर पुन्हा एकदा काँग्रेस-राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) वर्चस्व निर्माण झाले आहे. साखरपट्ट्यातील आठ जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीला मविआ) घवघवीत यश मिळाले तर दोन ठिकाणी महायुती काठावर पास झाली.
सांगलीची जागाही काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांना आमदार विश्वजीत कदम यांची मोठी साथ मिळाल्याने काँग्रेससाठी हा साखरपट्ट्यातील 'कम बँक' मानला जात आहे काँग्रेससाठी हा विजय गोडवा वाढविणारा ठरला आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीने असाच पॅटर्न राबवला तर भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघात तर डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघात प्रचंड मताधिक्याने विजयाची तुतारी फुंकली 'तुतारी'च्याच धैर्यशील मोहिते पाटील यांनीही माढा मतदारसंघ भाजपकडून एकतर्फी काबीज केला.
याशिवाय काँग्रेसकडून कोल्हापूरवर शाहू महाराज छत्रपती यांनी तर सोलापूर मतदारसंघावर प्रणिती शिंदे यांनी मोठे विजय प्राप्त करत साखरपट्टयात हाताच्या 'पंजा'चे पुनरुज्जीवन केले.
कांदा उत्पादक शेतकरीही नाराज
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना भोवली आहे. कोरी पाटी असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भास्कर भगरे यांनी भारती पवार यांचा पराभव केला. भारती पवार यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभेचाही उपयोग झाला नाही.
धुळे मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. मुस्लिम मतांची मिळालेली एकतर्फी साथ ही डॉ. बच्छाव यांच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. शेतकऱ्यांमधील असंतोष आणि मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा फटका भामरे यांना बसला.
धुळ्यात दोन टर्म खासदार असलेल्या भाजपच्या हिना गावित यांचा काँग्रेसचे युवा आणि नवखे उमेदवार गोवाल पाडवी यांचा मोठा पराभव केला आहे. गोवाल यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. गावित कुटुंबावरील नाराजीचा फटका हिना गावित यांना बसला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.