
Agriculture Tips: महाराष्ट्रातील हवामान सर्व फळपिकांच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक आहे. त्यामुळे बहुतांश सर्व फळपिकांची यशस्वी लागवड करता येते. फळबाग लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड केल्यानंतर त्या जमिनीतील माती परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच उपलब्ध पाण्याच्या स्रोतांची तपासणी देखील आवश्यक आहे. फळझाड लागवडीसाठी जागेची निवड झाल्यावर लागवडीसाठी आखणी करणे गरजेचे आहे.
जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवडीची पद्धत ठरवावी. फळपिके लागवडीच्या चौरस, आयताकृती, त्रिकोणी, षटकोनी, उतार (कंटूर) अशा निरनिराळ्या पद्धती आहेत. चौरस पद्धत ही सर्वांत सोपी, आखणीस अडचण नसणारी आणि उभ्या-आडव्या मशागतीस योग्य आहे. या पद्धतीमध्ये झाडांच्या रांगा काटकोन असून दोन झाडांतील आणि दोन रोपांतील अंतर सारखेच येते.
त्यामुळे झाडे सर्व दिशांनी पाहिल्यास सारख्या अंतरावर दिसतात. या पद्धतीने लागवड करणे अत्यंत सुलभ असते. नियोजित जमिनीत फळझाडांची लागवड करताना योग्य अंतरावर खड्डे खोदावेत. खड्डे खोदण्याचे काम उन्हाळ्यातच पूर्ण करावे. जमिनीचा मगदूर आणि फळझाडांच्या प्रकारानुसार खड्ड्याचा आकार ठरवावा. सर्व पूर्वतयारी झाल्यानंतर फळबाग लागवडीचे नियोजन करावे.
लागवडीची योग्य वेळ
खात्रीशीर पाऊस झाल्यावर पावसाच्या सुरुवातीस जून महिना किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात फळझाडांच्या कलमांची लागवड करावी. अतिपावसात किंवा पावसाच्या शेवटी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फळझाड लागवड करू नये. पावसाळ्याच्या सुरुवातीस लागवड केलेली फळझाडे चांगली समाधानकारक वाढतात. ही फळझाडे काही कालावधीकरिता पाण्याचा ताणही सहन करू शकतात. जून-जुलैपर्यंत वेळेवर झाडांची लागवड झाल्यास वाढ जोमाने होते.
कलमांची निवड
एकदा कलमांची लागवड केल्यानंतर काही वर्षांनी त्यापासून फळांचे उत्पादन न मिळाल्यास ते तोडून दुसरी लागवड करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यासाठी फळझाडांची कलमे, रोपांच्या निवडीवर फळांची गुणवत्ता आणि फळबागेचे एकूण यश अवलंबून असते. म्हणून लागवडीकरिता खात्रीलायक परवानाधारक रोपवाटिकेमधूनच रोपांची किंवा कलमांची उपलब्धता करावी. कृषी विद्यापीठ किंवा शासकीय रोपवाटिकेमधून शक्यतो रोपे आणावीत.
कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत, यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत की नाही या बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. रोपे घेताना कलम बांधलेली व जोड पूर्णपणे जुळलेले आहेत याची खात्री करून करावी. तसेच ती वाढीला जोमदार, निरोगी आणि अपेक्षित त्याच जातीची आहेत का याची खात्री केल्यानंतरच खरेदी करावी. लागवडीसाठी भरपूर उत्पादन क्षमता असणाऱ्या जातींची निवड करावी. स्थानिक भागासाठी शिफारस असलेल्या, कीड व रोगास प्रतिकारक्षम वाणांची लागवडीसाठी निवड करावी.
लागवड
लागवड करण्यापूर्वी प्रथम कलमाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंवर उभा काप द्यावा. मुळांभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथिन बॅग हळूवार काढावी. मोकळा झालेला गोळा दोन्ही हातांनी खड्ड्याच्या मधोमध ठेवून हलकेच दाबावा. नंतर मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी. अगोदर हाताने व नंतर पायांनी दाबावी, हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी. लागवडीनंतर आवश्यकता वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे. कलमाच्या आधारासाठी पश्चिम बाजूस ६ इंच अंतरावर ४ ते ५ फूट उंच बांबूची काठी रोऊन त्यात कलम बांधावीत.
फळबागेचे संरक्षण
नवीन लागवड केलेल्या लहान रोपांना, कलमांना भटकी जनावरे खातात किंवा तुडवतात. त्यामुळे या लहान झाडांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करणे गरजेचे असते. त्यासाठी फळबाग लागवडीसाठी निवडलेल्या जागेभोवती काटेरी झुडपांचे कुंपण करावे.
बागेचे उष्ण वारे, थंडीपासून व वादळापासून संरक्षण करण्यासाठी निलगिरी, शेवरी सारख्या उंच वाढणाऱ्या झाडांची पश्चिम व दक्षिण बाजूने २ ते ३ फुटांवर लागवड करावी. काही वेळा वाऱ्याच्या अडथळ्यासाठी लावलेली झाडे बागेतील मुख्य फळझाडांबरोबर पाणी आणि अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा करतात. हे टाळण्यासाठी अडथळ्यांच्या झाडांपासून १० फूट अंतरावर ३ फूट खोल व २ फूट रुंद खणून त्यामध्ये येणारी या झाडांची सर्व मुळे छाटून टाकावीत. अशाप्रकारे मुळ्या छाटण्याचे काम प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी करावे.
- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९
(मृद् शास्त्रज्ञ, कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.