
सूर्यकांत नेटके
अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी आणि परिसरातील दहा- बारा दुष्काळी गावांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत संत्रा, डाळिंब, मोसंबी फळबागांच्या माध्यमातून प्रगती साधली. येथील फळांना देशभरात मागणी असून विविध ठिकाणचे व्यापारी या भागात येऊन फळांची खरेदी करतात. या फळपिकांच्या माध्यमातून काही हजार मजुरांसाठी वर्षभर रोजगार निर्मितीही झाली आहे.
अहिल्यानगरच्या पूर्वेस पाथर्डी तालुका असून, एखाद्या भागाचा अपवाद वगळला सर्वच ठिकाणी शेतीसाठी पाण्याची भीषण टंचाई असते. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात बाजरी, ज्वारी, हुलगे, मटकी, हरभरा यांसारख्या पारंपरिक पिकांवर अवलंबून राहावे लागे. साधारण पन्नास वर्षांपूर्वी या भागात मोजक्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीस प्रारंभ केला. काटेकोर नियोजनातून त्यांना यश मिळू लागले. मग अन्य शेतकरीही फळबागांकडे वळले. त्या वेळी पाण्याच्या कमतरतेमुळे क्षेत्र कमी होते. मात्र कृषी विभागाने शेततळ्यांची योजना आणली. अनेक शेतकऱ्यांनी त्यांची सुविधा उभारली. त्यानंतर ठिबक सिंचनाचा वापर वाढला. शेततळ्यांच्या आधारे वर फळबागा चांगल्या प्रकारे जगू शकतात याची जाणीव झाल्यानंतर क्षेत्र वाढले.
फळबागांचा पट्टा
पाथर्डी तालुक्यातील करंजी, रेणुकाईवाडी, भोसे, शिराळ, तरडवाडी, शिरापूरसह दहा ते बारा गावे आज फळबागांचा ‘पट्टा’ म्हणून ओळखली जात आहेत. या भागात संत्रा, मोसंबी, डाळिंब व अन्य पिकांचे मिळून जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्र करंजी परिसरातील पंधरा गावांत आहे. या भागातील गावांमध्ये प्रामुख्याने डाळिंब, संत्रा अधिक आहे. काही प्रमाणात सीताफळाच्या बागा आहेत. बहुतांश शेतकऱ्यांकडे संत्राबाग आहे. शेतकरी साधारणपणे मृग व आंबे बहर धरतात. वर्षभरातील साधारण सहा महिने फळ तोडणीचे काम जोमाने सुरू असते.
रोजगार निर्मिती
डाळिंब, मोसंबी तोडणी, छाटणी व शेतीच्या कामांसाठीही मजुरांची रेलचेल कायम असते. करंजी आणि परिसरातील गावांत फळतोडणीच्या काळात दररोज दीडशे ते पावणेदोनशे वाहने भरली जातात. अमरावती, यवतमाळ, अचलपूर, चिखली खामगाव आदी भागांमधून व्यापारी संत्रा खरेदीसाठी या भागात येतात. त्यांच्यासोबत मजूर येतात. एका वाहन भरण्यासाठी सात ते दहा मजुरांची मदत लागते. त्यासाठी प्रति वाहन साडेतीन हजार रुपये मजुरी द्यावी लागते. फळपीक घेणाऱ्या गावांच्या शिवारात साधारण सहा महिने स्थानिक ८० टक्के व बाहेरील २० टक्के मिळून दररोज ते दोन हजार मजुरांना रोजगार मिळाला आहे. केवळ मजुरीतून दहा कोटीपेक्षा अधिक उलाढाल होत असावी. करंजी आणि परिसरातील अनेक तरुण शेतकऱ्यांनी फळे वाहतुकीसाठी वाहने खरेदी केली आहेत. काही तरुण खरेदी-विक्री व्यवसायातही उतरले आहेत.
देशभरात मागणी
संत्रा, मोसंबी, डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या गावांत तोडणीच्या काळात खरेदीसाठी राज्यातील विविध भागांतून खरेदीदार परिसरात आपापल्या सोयीने तळ मांडतात. तोडणी केलेली फळे एका जागी संकलित व प्रतवारी करून विक्रीसाठी नेली जातात. केरळ, दिल्ली, तमिळनाडू, मुंबई, पुण्यासह देशातील वेगवेगळ्या भागात करंजी परिसरातील संत्र्याला मागणी असते. या पिकातून परिसरात पाचशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे.
शेततळ्यांनी तारले
पाथर्डीतील करंजी पट्ट्यातील काही गावांना वांबोरी चारीच्या माध्यमातून मुळा धरणाचे पाणी मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. कधीतरी पाणी येते, मात्र हा भाग शेवटचा असल्याने पाणी मिळेलच याची शाश्वती नाही. पाऊसही कमी पडतो. साठवणीसाठी तलाव नाहीत. दुष्काळाच्या कायम झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अनुदानावर शेततळी घेतली आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार पाथर्डी तालुक्यात दोन हजारांपेक्षा अधिक शेततळी आहेत. पैकी ८० टक्के शेततळी करंजी आणि परिसरातील दहा-बारा गावांत आहेत.
मागील वीस वर्षांत दुष्काळात याच शेततळ्यांनी तारले. कित्येक वेळा उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी बहार न धरता फळबागा जगवल्या. काही शेतकऱ्यांना दुष्काळात नाइलाजाने बागांवर कुऱ्हाड चालवावी लागली. तरीही त्यांनी नव्या जोमाने पुन्हा फळबागा घेतल्या आहेत.
शेतीतून शिक्षणाच्या वाटा
करंजी आणि परिसरातील पंधरा दुष्काळी गावांनी फळबागांमध्ये आपली वेगळी ओळख तयार केलीच.पण शेतकऱ्यांनी याच पिकांच्या अर्थकारणातून प्रगती साधताना मुलांच्या शिक्षणावर अधिक भर दिला. परिसरातील पंधरा गावांत शंभराहून अधिक शिक्षक आहेत.
डॉक्टर, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, सैनिक यांच्यासह अभियांत्रिकी, कृषी शिक्षण तसेच व्यवसायात येथील तरूणांनी आपला ठसा उमटवला आहे.
दुष्काळी करंजी आणि परिसराची फळपीक उत्पादक भाग म्हणून सर्वदूर ओळख निर्माण झाली आहे. त्यातून शेतकऱ्यांसोबत मजुरांनाही चांगला रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
जालिंदर वामन, संत्रा उत्पादक, करंजी ७३५०७३४८८४
संत्र्याने मिळविली ओळख
तालुक्यातील सातवड येथील शेतकरी बंडू पाठक म्हणाले की सुमारे दहा ते पंधरा वर्षांपासून आमच्या गावात संत्र्याची शेती मोट्या प्रमाणात बहरली आहे. पाच वर्षांच्या पुढील वयाच्या झाडांना एकरी १० ते १५ टनांच्या आसपास उत्पादन मिळते. जागेवर किलोला २५, ३० ते ४५, ५० रुपयांपर्यंत दर मिळतो. आमचा दुष्काळी भाग असून येथील संत्रा फळांनी देशभर ओळख निर्माण केली आहे. अनेक शेतकरी या पिकातून आर्थिक सक्षम झाले आहेत.
बंडू पाठक ९०६०६८९९९९
डाळिंब, संत्र्यातून प्रगती
करंजी गावापासून सुमारे दोन किलोमीटरवर भोसे गावात डॉ. शशिकांत शिंदे हे अभ्यासू, प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी राहतात. ते सांगतात, की आमच्या गावात प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान एक एकक डाळिंब आहे. सहा वर्षे वयाच्या बागेत एकरी सहा टनांच्या आसपास तर त्यापुढील बागांमध्ये एकरी १० ते १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. मागील दोन वर्षांपासून आमच्या भगवा डाळिंबांना किलोला १५० ते २०० रुपयांच्या पुढेच दर मिळतो आहे. आम्ही नाशिकला माल पाठवतो. जागेवरही सौदे होतात. आमच्या भागात संत्राही चांगल्या प्रकारे बहरला आहे. आमची पाच एकर संत्राबाग असून पंधरा वर्षे वयाची झाडे प्रति झाड १५० किलोपर्यंत उत्पादन देतात. मागील दोन वर्षे किलोला ३० ते३५ रुपयांपुढे दर नव्हते. मात्र यंदा दर त्यापुढे मिळत आहेत. यंदा चारशे झाडांमधून सुमारे तीनहजार ते साडेतीनहजार क्रेटपर्यंत माल मिळाला. फळबागांमुळे आमच्या भागातील शेतकऱ्यांनी चांगली आर्थिक प्रगती केली आहे. सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांकडे चारचाकी वाहने आहेत. अनेक जणांनी चांगली घरे बांधली आहेत.
शशिकांत शिंदे ९८३४९३६९५४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.