
Vegetable Farming : जपान, कोरिया या देशांमध्ये जमिनीतून भाजीपाला रोपांच्या मुळावर येणारे बुरशीजन्य रोग जसे की फ्युजॅरिअम, पिथीअम तसेच निमॅटोड (सूत्रकृमी) यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी भाजीपाला कलम तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
या तंत्रज्ञानामध्ये गावठी किवा जंगली रोप (रूटस्टॉक) याची निवड योग्य पद्धतीने करणे गरजेचे असते. संकरित वाणाची (सायन) निवड देखील महत्त्वाची बाब आहे. व्यापारी तत्त्वावर क्लेफ्ट कलम, टॉप इन्सर्शन कलम, भेट कलम आणि पाचर कलम या पद्धतींचा वापर केला जातो.
कृषी विज्ञान केंद्रातील भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये गेल्या सहा वर्षांपासून टोमॅटो, वांगी, कलिंगड, खरबूज, वेलवर्गीय भाजीपाला आणि ढोबळी मिरची या पिकांच्या रोपनिर्मितीसाठी कलम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
मागील वर्षापासून ब्रीमॅटोची कलमी रोपांची (एकाच रोपावर वांगी आणि टोमॅटो उत्पादन) निर्मिती करण्यात येत आहे. याचबरोबरीने पोमॅटो (बटाटा आणि टोमॅटोचे एकाच झाडावर उत्पादन) रोपनिर्मिती केली जाते. याला द्विपीक पद्धती म्हणतात. कलमी रोपे तयार करताना नेदरलँडमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.
भाजीपाला कलम तंत्रज्ञानाचे फायदे
ही रोपे मातीतून प्रादुर्भाव करणाऱ्या रोगांना प्रतिकारक्षम.
कलम केलेले रोप मातीतून येणाऱ्या सूत्रकृमींना बळी पडत नाही.
रोपांमध्ये जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता अधिक.
रोपांमध्ये पांढऱ्या मुळांची भरपूर वाढ. मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा अधिक.
भाजीपाला पिकासाठी खत, पाणी कमी लागते.
फळांचा आकार, उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ, गुणवत्ता सुधारते.
उत्पादन कालावधी कमीत कमी ३५ दिवस आणि जास्तीत जास्त ६० दिवसांपर्यंत वाढतो.
शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रात्यक्षिके
रोपे पूर्ण लागवडीनंतर केवळ एक टक्का रोपांची मर.
पांढऱ्या मुळांची वाढ जास्त झाल्यामुळे रोपे लवकर वाढीस लागतात, उत्पादन लवकर सुरू होते.
भाजीपाला पिकावर बुरशीजन्य रोगांचा केवळ ०.५- १ टक्का प्रादुर्भाव.
भाजीपाला पिकांच्या उत्पादनात (वांगी, ढोबळी मिरची, इतर भाजीपाला पिके) ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ.
पाण्याचा ताण असेल किंवा जास्त पाण्यामध्ये कलमी रोपांची चांगली वाढ.
वाढ जोमदार असल्यामुळे एकरी २० ते २५ टक्के रोपे कमी लागतात.
भाजीपाला पिकांसाठी कीटकनाशक, बुरशीनाशकावरील खर्चात ३० टक्के बचत.
- यशवंत जगदाळे, ९६२३३८४२८७, ०२११२-२५५५२७, (भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.