Jamun Orchard Management : दर्जेदार जांभूळ उत्पादनासाठी बागेचे व्यवस्थापन

Jamun Farming : योग्य व्यवस्थापनातून जांभळांची दर्जेदार फळे मिळवणे शक्य आहे. त्यासाठी ताण व्यवस्थापन, खते व पाणी व्यवस्थापन या सोबतच पीक संरक्षणावर भर देण्याची आवश्यकता आहे.
Jamun
Jamun Agrowon
Published on
Updated on

बाबासाहेब गायकवाड, ऋषिकेश आघाव

Orchard management for Jamun Production : एकेकाळी जांभळाकडे रानमेवा म्हणून पाहिले जाई. आजही जांभूळ म्हटले की गडद जांभळी- काळी रसाळ, काहीशी आंबट-गोड, काहीशी तुरट फळे डोळ्यासमोर येतात. जांभूळ हे अत्यंत बहुगुणी, परंतु दुर्लक्षित असे सदाहरित फळझाड आहे. अलीकडे वाढत्या मधुमेहाच्या समस्येवर उपाय म्हणून त्याला फार महत्त्व आलेले दिसते.

जांभूळ फळ हे मधुमेह नियंत्रण, पचन सुधारणा, किडनी स्टोन नियंत्रणासाठी गुणकारी आहे. लोह, कॅल्शिअम, प्रथिने, तंतुमय पदार्थ, कर्बोदके यांचा उत्तम स्रोत आहे. फळाप्रमाणेच जांभळाच्या झाडाची पाने, साल व बियासुद्धा आरोग्यास फायदेशीर आहेत. बियांमध्ये असलेले अल्कलाईड रक्तातील साखरेच्या नियंत्रणासह अनेक रोगांच्या उपचारात उपयोगी आहे. म्हणून जांभूळ बियांच्या भुकटीला मागणी वाढत आहे.

जांभूळ हे तसे नाशिवंत फळ असून, पिकल्यानंतर फार काळ टिकत नाही. आजही जांभूळ म्हटले की पालघर जिल्ह्यातील बहाडोली व ठाणे जिल्ह्यातील बदलापूर ही गावे आठवतात. तेथील जांभळांचा मोठा आकार व उत्तम चव ही त्यांची वैशिष्ट्ये. या परिसरातील आदिवासी बांधव वनातील जांभळे गोळा करून त्यांची शहरांमध्ये विक्री करत असत, उन्हाळ्यामध्ये शेतीमध्ये फारसे काम नसण्याच्या स्थितीमध्ये या पैशातून स्वतःच्या गरजा पूर्ण केल्या जातात.

जांभूळ या फळपिकाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम जर कुणी केले असेल तर ते कोकण कृषी विद्यापीठाने. तेथील शास्त्रज्ञांनी हंगाम, बहर, जांभळांचा आकार, रस, स्वाद यांचा सविस्तर अभ्यास करून ‘बहाडोली’ ही नवीन संकरित जात विकसित केली. तिला नाव दिले ‘कोकण बहाडोली’.

पूर्वी जांभळाची फळे ही हंगामातच (जून ते जुलै) चाखायला मिळायची. आता प्रक्रियेतून विविध पदार्थांची निर्मिती केली जाऊ लागली आहे. जांभळापासून रेसवेरा वाइन निर्मितीचे तंत्रज्ञानही विकसित झाले आहे. त्यातूनही जांभूळ उत्पादकांना निश्चितच फायदा मिळू शकेल.

Jamun
जांभूळ उंचावतेय आदिवासी शेतकऱ्यांचे अर्थकारण

ताण व्यवस्थापन

अलीकडे जांभूळ हे पीक व्यापारीदृष्ट्याही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. साधारणत: फेब्रुवारी अखेर ते एप्रिलच्या मध्यापर्यंत जांभूळ या फळपिकाला फुलोरा निघत असतो. फुलोरा हा प्रामुख्याने बारीक तिसऱ्या फांद्यावर (Tertiary branches) निघत असतो. पाच ते सहा वर्षे वयाच्या कलम झाडांना बहर निघायला सुरुवात होते. तर बियांपासून लागवड केलेल्या झाडांना साधारणपणे आठव्या-नवव्या वर्षी फळधारणा व्हायला सुरवात होते.

चांगला व कसदार बहर निघण्यासाठी पावसाळा संपल्यानंतर जानेवारी अखेर ते पंधरा (१५) फेब्रुवारीपर्यंत झाडांचे पाणी पूर्णतः तोडून ताण दिला असेल. साधारणतः ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाने ही तांबडी-पिवळी पडून गळून गेली म्हणजे झाडाला ताण बसला असे समजले जाते.

खत व्यवस्थापन

उत्तम व दर्जेदार फळांच्या उत्पादनासाठी ताण संपविण्याच्या वेळी खोडापासून २.५-३ फूट अंतरावर गोल वर्तुळाकार चर काढून घेऊन त्यात प्रति झाड १५-२० किलो चांगले कुजलेले शेणखत, २५० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद, २५० ग्रॅम पालाश यांचे मिश्रण द्यावे. चर बुजवून घ्यावा. जांभूळ पिकामध्ये फुलोरा हा फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत येत असतो.

जांभूळ हे पर-परागीभवन होणारे फळपीक असून, यात १५ ते ४० च्या घोसाने फळे (द्राक्ष पिकाप्रमाणे) लागतात. ताण सोडताना (पहिले पाणी दिल्यानंतर) नवीन पालवी व फुलोरा निघायला सुरुवात होते. पहिले पाणी हे एकदम हलके द्यावे (कमी प्रमाणात) द्यावे. हे पाणी सकाळी ९ पर्यंत किंवा रात्री ६ नंतर द्यावे.

Jamun
जांभळापासून स्क्वॅश,जॅम,जेली

दुपारी उन्हात झाडाचे तापमान वाढलेले असताना पाणी देऊ नये. अन्यथा, झाडांना वाफेच्या उष्णतेचा तडाखा (स्ट्रोक) बसून त्याचा फुलकळी निघणे व फळे सेटिंग होण्यात अडचणी येतात. दुसरे पाणी हे परत चार-पाच दिवसांनी द्यावे. पहिल्या पाण्यापेक्षा दुसऱ्या पाण्याचे प्रमाण वाढवावे. त्यानंतर नियमित पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जर बागेला ठिबक सिंचनाची सुविधा केलेली असेल तर पाण्याचा ताण देणे आणि नियंत्रित व मुबलक पाणी देऊन ताण तोडणे सोपे जाते.

जांभूळ हे पर-परागीभवन होणारे फळपीक आहे. परागीभवनासाठी बागेत मधमाशी पेट्या ठेवल्यास परागीभवनाचे प्रमाण वाढते. त्याचा फायदा फळधारणा वाढण्यात होतो. परागीभवन झाल्यानंतर आणि फळे सेटिंग व्हायला सुरवात झाल्यानंतर (साधारण एक महिन्याच्या अंतराने) पुन्हा २५० ग्रॅम नत्र प्रति झाड ही मात्रा द्यावी.

पीक संरक्षण

पाने व साल खाणारी अळी

जांभूळ पिकात या किडीचा प्रादुर्भाव विशेषत: सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि फेब्रुवारी ते मार्च अखेरपर्यंत अधिक दिसून येतो. सुरुवातीस अळी झाडावरील कोवळी पाने कुरतडून खाते. नंतर साल पोखरून खाते. त्यानंतर छिद्र पाडून फांद्या किंवा मुख्य खोडात शिरते.

त्यामुळे झाड कमकुवत होऊन झाडाचे उत्पादन घटते. या किडीच्या नियंत्रणासाठी फांद्या किंवा खोडातील छिद्रामध्ये इंजेक्शनच्या साह्याने स्पिनोसॅड* ०.५ मिलि प्रति लिटर या प्रमाणे सोडावे. त्यानंतर ते छिद्र ओल्या चिकट मातीने बुजवून टाकावे. (* केंद्रीय कोरडवाहू फळबाग संस्था, बिकानेर यांची शिफारस - महाराष्ट्रासाठीही लागू.)

फळमाशी

फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे फळे खाण्यास अयोग्य ठरतात. फळमाशीचा प्रादुर्भाव हा जून-जुलै महिन्यांत आढळतो. मात्र फळे लागण्यास सुरवात झाल्यापासून बागेमध्ये समान अंतरावर कामगंध सापळे (मिथिल युजेनॉल) प्रति हेक्टरी ४ ते ६ या प्रमाणात लावावेत. त्यामुळे या किडीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण समजण्यास मदत होते.

झाडाखालील आळ्यातील जमीन थोडी खणून मोकळी करावी. म्हणजे फळमाशीच्या कोषावस्थेत जाणाऱ्या अळ्या वर येऊन पक्ष्यांमार्फत खाल्ल्या जातील.

- बाबासाहेब गायकवाड, ८२७५३२४११३

- ऋषिकेश आघाव, ७३८७८७७३४६

(उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, वडगाव गुप्ता (विळद घाट), जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com