जांभूळ उंचावतेय आदिवासी शेतकऱ्यांचे अर्थकारण

जंगलात मिळणारे वनउपज हे आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असते. जांभूळ हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. गडचिरोली भागात जांभळाची बने असून, नागपूर ही या जांभळांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. आदिवासी शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्यात या जांभळाचा वाटा महत्त्वाचा राहिलेला आहे.
Juicy, quality jamun from Gadchiroli area
Juicy, quality jamun from Gadchiroli area
Published on
Updated on

जंगलात मिळणारे वनउपज हे आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असते. जांभूळ हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. गडचिरोली भागात जांभळाची बने असून, नागपूर ही या जांभळांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. आदिवासी शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावण्यात या जांभळाचा वाटा महत्त्वाचा राहिलेला आहे. राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात आहे. या भागात वास्तव्य असलेल्या बहुतांश आदिवासी कुटुंबीयांकडे जेमतेम जमीनधारणा आहे. त्यात खरिपात एकदाच भात घेण्यावर भर राहतो. त्यामुळे वर्षभराचे आर्थिक चक्र फिरवण्यासाठी वनउपज आणि त्याच्या विक्रीतून मिळणारा पैसा हाच त्यांच्यासाठी मुख्य स्रोत ठरतो. हंगाम नसलेल्या काळात रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे लागते. सध्याच्या काळात मोहफुले तसेच जांभूळ हे वनउपजाचे मुख्य घटक आहेत. मार्च महिन्यात मोहफुलांचा हंगाम राहतो. पहाटेच फुले उपलब्ध होत असल्याने त्या वेळी उठून जंगलात जावे लागते. परिणामी, बहुतांश गावांत पहाटेची लगबग दिसून येते. फुलांची विक्री सरासरी ४० रुपये प्रति किलो प्रमाणे होते. जांभूळ- महत्त्वाचे वनउपज जांभळाचा विचार केल्यास गेल्या काही वर्षांत पाऊसमान कमी झाल्याने उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. तरीसुद्धा सरासरी एक कुटुंब ९० ते १०० क्रेटपर्यंत जांभूळ संकलित करते. शेतकऱ्यांनी आता बांधावरही त्याच्या लागवडीवर भर दिला आहे. तसा मे- जून हा जांभळाचा हंगाम राहतो. विळा बांधलेल्या बांबूच्या साह्याने जांभळाची तोडणी होते. जमिनीवर पडून ती खराब होऊ नयेत यासाठी त्रिपालमध्ये (साड्यांचा वापर करून तयार केलेली जाळी) संकलित केली जातात. त्याच ठिकाणी प्रतवारी करण्यावर भर राहतो. कुटुंबातील सर्व सदस्य हे काम करीत असल्याने हे काम लवकर व सोपे होते. विशेष म्हणजे झाडे जंगलात असल्याने त्यावरील व्यवस्थापनावर कोणत्याही प्रकारचा खर्च आदिवासी शेतकऱ्यांना करावा लागत नाही. गडचिरोली भागातील जांभळाला राजाश्रय मिळावा यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर (गडचिरोली) यांच्या वतीने जांभूळ महोत्सवाचे आयोजन गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. एका आयोजनात जांभळाची स्थानिक स्तरावर ५०० रुपये प्रति किलो दराप्रमाणे खरेदी करणार असल्याची घोषणा तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल काळे यांनी केली होती. मात्र त्यांच्या बदलीनंतर अद्याप पुढे काही प्रगती घडलेली नाही. नागपूर बाजारपेठेचा आधार स्थानिक स्तरावर विक्री व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना नागपूर येथील महात्मा फुले भाजी बाजारात जांभळाची विक्री करावी लागते. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात जांभळाचे मोठे बन आहे. येथून एका दिवशी २५ पेक्षा अधिक गाड्या बाजारपेठेत दाखल होतात. याच भागातून सर्वाधिक जांभूळ बाजारपेठेत दाखल होते. जांभळे सामूहिकरीत्या वाहनातून पाठविली जात असल्याने आदिवासी शेतकऱ्यांचा वाहतुकीवरील खर्च विभागला जातो. प्रति वाहनात सरासरी १५० ते २०० क्रेटस असतात. क्रेटवर संबंधित कुटुंबाच्या नावाची पट्टी लावलेली असते. वाहनासोबत गावातील एक ते दोन व्यक्ती असतात. अर्थकारण विक्रीनंतर पट्टीवरील नोंदीनुसार संबंधितांना रक्कम दिली जाते. क्रेटनुसार वाहतुकीचा खर्च वसूल केला जातो. आदिवासी एकत्रपणे शेतात राबतात. त्यामुळे दर कमी मिळाल्यास रकमेची विभागणी होऊन प्रत्येकाच्या हाती कमी पैसे मिळतात. त्यामुळे जास्त दराने जांभूळ विकला जावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. आवक अधिक झाल्यास साहजिकच दर कोसळतात. आवकेनुसार प्रति क्रेट २०० रुपयांपासून ते १२००, १५०० रुपयांपर्यंत दर पोहोचल्याचे अनुभव असल्याचे साले क्रमांक १ (ता. कोरची, जि. गडचिरोली) येथील झाडूराम इलामे यांनी सांगितले. त्यांची पाच एकर शेती आहे. त्यातील तीन एकरांवर धान (भात), तर उर्वरित क्षेत्र पडीक आहे. काही क्षेत्रावर भाजीपाला गरजेपुरता घेतला जातो. त्यांच्यासाठी जांभूळ हे पीक अर्थकारण वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने जांभळाला मागणी अधिक राहते. हंगामाच्या सुरुवातीला दर तेजीत राहतात. १५ ते २० दिवसांच्या कालावधीत एक भूमिहीन कुटुंब २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवते. झाडूराम यांच्या सोबतच या भागातील रामदास इंद्रू कुमरे, शंकर सुप्रेल गोट्टा, चमरु दिनकू होडी, इंजमसा सन्नू काटेंगे हे आदिवासी शेतकरीही हंगामात जांभळाचे संकलन करतात. किराणा व अन्य साहित्याची सोय या जांभूळ विक्रीतून होते. नागपूर बाजारातील चित्र नागपूर येथील महात्मा फुले मार्केटमधील व्यापारी मोहम्मद गौस यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपुरात हातठेल्यावर फिरून जांभळाची किरकोळ विक्री करणाऱ्यांची संख्या जवळपास दोन हजारांवर आहे. किरकोळ विक्रीचा दर प्रति किलो ६० रुपयांपर्यंत राहतो. बाजारात हंगामात दररोज सरासरी २५ हजार ते ३० हजार क्रेट्‍सची आवक होते. त्यामध्ये गडचिरोलीसह छत्तीसगड, आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या मालाचा देखील समावेश राहतो. छत्तीसगड येथील जांभळाचा आकार तुलनेने अधिक राहतो. त्यामुळे त्यास अधिक मागणी राहते. प्रति २० किलोच्या क्रेटची खरेदी सरासरी ५०० ते ८०० रुपयांना होते. केव्हीकेने दिले प्रक्रिया उद्योगाचे बळ कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), सोनापूर यांच्याकडून जांभळाच्या मूल्यवर्धनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्या माध्यमातून या भागातील आदिवासींना दोन पैसे अधिक मिळतील अशी अपेक्षा आहे. जांभळापासून ज्यूस व पल्प तयार केला जातो. त्याच्या विपणनासाठी (मार्केटिंग) जांभूळ महोत्सवाचे आयोजन होते. या माध्यमातून जांभळाचे औषधी महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. जांभळाच्या मूल्यवर्धित उत्पादनासाठी केव्हीकेच्या वतीने तीन पेटंट्स दाखल करण्यात आले आहेत. तत्कालीन गृहविज्ञान शाखा तज्ञ योगिता सानप यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. रानभाज्यांचा प्रसार केव्हीकेचे समन्वयक संदीप कराळे म्हणतात की केवळ जांभूळच नव्हे, तर पौष्टिक, सेंद्रिय स्वरूपातील रानभाज्यांचा प्रसारही २०१३ पासून केला जात आहे. त्यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते. शहरी ग्राहकांमध्ये आता त्यांचे महत्त्व वाढल्याने गडचिरोलीतील इंदिरा चौकात वर्षभरात हंगामनिहाय मिळणाऱ्या रानभाज्यांची उपलब्धता आदिवासी करतात. त्यास ग्राहकांची चांगली मागणी राहते. यात करटुले, तरोटा, दिंडा, कुडा, आंबुशी, पाथरी, शेवगा, अळू, पानाचा ओवा, कपाळफोडी, बांबू, खारफुटी, कुरडू, आघाडा, काठेमाठ, घोळ, अंबाडी, मटारू, भुईआवळा, सुरण, कवठ, उंबर आदींचा समावेश आहे. संपर्क : झाडूराम हलामी, ९४०४९१९७५१ संदीप कराळे, ९४०४२७००५४ (कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, सोनापूर, गडचिरोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com