
Mumbai News: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत विरोधकांनी आणलेल्या २९३ अन्वये प्रस्तावरील चर्चेदरम्यान अनावश्यक शेरेबाजी केल्याचा मुद्दा उपस्थित करत तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांच्याबाबत विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत कारवाईची मागणी केली.
आसनावर बसल्यानंतर अध्यक्षांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून काम करणे अपेक्षित असताना राजकीय टीकाटिप्पणी करणे सभागृहाचे अवमूल्यन करण्यासारखे असल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. तर अध्यक्षांच्या आसनावर सभागृहात चर्चा होऊ नये. माझ्या दालनात यावर योग्य निर्णय घेऊन कारवाई करेन, असे आश्वासन दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.
२९३ च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी विरोधी पक्षांनी दिलेल्या नावांपैकी काही सदस्य अनुपस्थित असल्याचे सांगत तालिका अध्यक्ष चेतन तुपे यांनी गुरुवारी टिप्पणी केली होती. दरम्यान गुरुवारी झालेल्या कामकाजात तुपे यांनी म्हटले, की ‘‘विरोधकांनी तीन दिवस गोंधळ घातला आणि हा प्रस्ताव आणला. आजही लक्षवेधी सूचना न होऊ देता हा प्रस्ताव चर्चेला घ्या, असा आग्रह धरला. सरकार पक्षाचे मंत्री आणि सर्वजण या चर्चेसाठी उपस्थित आहेत.
पण स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायला मात्र विरोधक तयार नव्हते. भूक लागल्यावर जो तो निघून गेले. त्यामुळे राजकारणी किती नाटकी आहेत, हे या सर्व प्रकरणातून दिसते,’’ अशी टिप्पणी केली. शिवाय शेतकऱ्यांच्या विषयावर चांगल्या सूचना कोणत्या येत आहेत आणि शेतकरी हिताचे उद्या आपल्याला काय बोलायचे आहे, हे का ऐकू शकत नाहीत, हा प्रश्न अध्यक्ष म्हणून मलाही पडलेला आहे.
त्यामुळे हे मगरीचे नक्राश्रू सुरू आहेत की काय असे वाटू लागले आहे,’ असे विधानही त्यांनी अध्यक्षांच्या आसनावरून केल्याचे विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर सांगितले. तुपे यांच्या या विधानावर भास्कर जाधव, नाना पटोले यांनीही जोरदार आक्षेप घेतला.
तालिका सभाध्यक्ष चेतन तुपे यांनी अध्यक्षांच्या स्थानावर बसून सरकारची भूमिका मांडली, असा त्यांना अधिकार आहे का? अध्यक्ष पदाची एक गरिमा आहे. असे असताना तिथून राजकीय भाषण होणे योग्य नाही, याआधी असे कधीही घडले नाही. त्यामुळे योग्य ती कारवाई करावी,’’ अशी मागणी केली.
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली. संविधानाने दिलेल्या आदेशाने जे नियम आहेत त्या चौकटीत राहून पीठासीन अधिकाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. सभागृहात अध्यक्षांच्या आसनाचा वापर राजकीय हेतूने होणार नाही. तालिका अध्यक्षांबाबत या वर्तनाबाबत सभागृहात चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या दालनात चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल,’’ असे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.