
Mumbai News: कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर विधास्न्सभेत गुरुवारी (ता.३) कडाडून टीका केली. शेतकऱ्यांच्या वेदना आणि त्यांच्या गंभीर समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा वडेट्टीवारांनी मांडला.
सभागृहात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करतो, घाम गाळतो, पिकं घेतो. पण नैसर्गिक संकटांमुळे त्याचं पीक वाया गेलं किंवा त्याला योग्य भाव मिळाला नाही, तर तो मृत्यूला कवटाळतो. शेती हेच त्याचं एकमेव उत्पन्नाचं साधन असतं. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी त्याचा अपमान करणाऱ्यांना पांडुरंग सद्बुद्धी देईल, अशी प्रार्थना आहे.”
त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा गंभीर मुद्दा उपस्थित करत सरकारच्या निष्क्रियतेवर बोट ठेवलं.वडेट्टीवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, “कृषिमंत्री हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतात, त्यांच्याकडून शेतकऱ्यांना आधार मिळायला हवा.
पण त्याऐवजी ते घृणास्पद वक्तव्य करतात. अशा मंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.” त्यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या बेताल वक्तव्यांवरही टीका केली आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या नेत्यांना धारेवर धरलं.वडेट्टीवार यांनी २०१७-१८ मध्ये ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक आकडा सभागृहात मांडला.
ते म्हणाले, “त्या वेळीच सरकारने शेतकऱ्यांना योग्य मदत आणि आधार दिला असता, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळावं लागलं नसतं.” त्यांनी खतांच्या वाढत्या किमतींचाही मुद्दा उपस्थित केला आणि शेतकऱ्यांवर होणारा आर्थिक ताण अधोरेखित केला.विशेष म्हणजे, एवढी महत्त्वाची चर्चा सभागृहात सुरू असताना एकही प्रमुख मंत्री उपस्थित नसल्याचा मुद्दा वडेट्टीवार यांनी आक्रमकपणे मांडला.
“शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात हजर असणं अत्यंत गरजेचं आहे. पण सरकारचं याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. हा शेतकऱ्यांचा अवमान आहे,” असं ते संतापाने म्हणाले.
शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.या चर्चेतून शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांवर प्रकाश पडला असून, सरकारने तात्काळ पावलं उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.