
अनिकेत कांबळे
Opportunities and Benefits of Agri Education: कृषी क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे. या विस्तारणाऱ्या क्षेत्रात कुशल आणि अभ्यासपूर्ण मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. दरवर्षी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी परिपूर्ण असा कृषी शिक्षणातील विविध स्तरांवर अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विशेषतः कृषी क्षेत्रास संलग्न फलोत्पादन, उद्यानविद्या, अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा विविध शाखांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
भारतातील सुमारे ७० टक्के ग्रामीण कुटुंबे ही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत. कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज ही आपल्या शेती क्षेत्रातून भागविली जाते. भारतातील वैविध्यपूर्ण हवामानामुळे विविध हंगामी पिकांसह फळपिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याशिवाय यावर आधारित अनेक कृषिपूरक व्यवसाय तयार झाले आहेत.
देशातील उत्पादित बहुतांश शेतीमालाची विविध देशांमध्ये निर्यात केली जाते. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या शेतीमालांचा समावेश होतो. जसे की फळे, भाजीपाला, धान्ये, तेलबिया, मसाले आणि इतर प्रक्रिया केलेली कृषी उत्पादनांचा समावेश होतो. त्यातून अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत मिळत आहे. म्हणजेच कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे क्षेत्र आहे.
कृषी क्षेत्राच्या वाढीमुळे औद्योगिक क्षेत्रदेखील विस्तारत आहे. या विस्तारणाऱ्या क्षेत्रात कुशल आणि अभ्यासपूर्ण मनुष्यबळाची गरज दिवसेंदिवस वाढते आहे. त्यातून दरवर्षी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी परिपूर्ण असा कृषी शिक्षणातील विविध स्तरांवर अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण घेतल्यानंतर व्यवसायासह नोकरीच्या विविध संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत आहेत.
प्रमाणपत्र अभ्यासक्रम
कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रम (Certificate in Agril.technology) :
हा अभ्यासक्रम आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे ज्ञान देतो.
पशुसंवर्धन प्रमाणपत्र (Certificate in Animal Husbandry) :
हा अभ्यासक्रम पशुपालन आणि व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो.
फलोत्पादन प्रमाणपत्र (Certificate in Horticulture) : हा अभ्यासक्रम फलोत्पादन आणि फळ प्रक्रिया यावर आधारित आहे.
पदविका अभ्यासक्रम
कृषी पदविका (Diploma in Agriculture)
हा पदविका अभ्यासक्रम मराठी माध्यमात २ वर्षे आणि इंग्रजी माध्यमाचा ३ वर्षे असा आहे. कृषी क्षेत्रातील मूलभूत ज्ञान आणि कौशल्ये संपादन करण्यासाठी या अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
उद्यानविद्या पदविका
(Diploma in Horticulture) :
(यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, अंतर्गत हा १ ते ३ वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या फलोत्पादनावर आधारित अभ्यासक्रमात भाजीपाला, फुलशेती, प्रक्रिया उद्योग आणि विपणन यावर लक्ष केंद्रित करण्यात येते.
पदवी अभ्यासक्रम
कृषी पदवी (बी.एस्सी. ॲग्रिकल्चर)
हा ४ वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये शेती, माती, पीक संरक्षण, कीटकनाशके, खते, कृषी अर्थशास्त्र, वनस्पतिशास्त्र, कृषिविद्या, उद्यानविद्या, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र, मृदाशास्त्र, कृषी विस्तार, माहिती आणि तंत्रज्ञान तसेच व्यवस्थापनासारख्या विषयांचे शिक्षण दिले जाते.
उद्यानविद्या पदवी (बी.एस्सी. हॉर्टिकल्चर)
हा ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. यामध्ये विशेषतः फळे, फुले, भाज्या आणि शोभिवंत तसेच औषधी वनस्पतींच्या लागवडीचे सखोल शिक्षण दिले जाते.
बी.टेक. कृषी (कृषी अभियांत्रिकी) :
या ४ वर्षांच्या अभ्यासक्रमात पूर्णतः कृषी अभियांत्रिकी, जल व्यवस्थापन आणि कृषी तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्यात येते.
कृषी व्यवसाय व्यवस्थापन (ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट)
हा ४ वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यात शेती उत्पादन प्रक्रिया, वितरण, विपणन, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि ग्रामीण विकास आदी विषयांविषयी सखोल मार्गदर्शन केले जाते.
पदव्युत्तर पदवी
एम.एस्सी. कृषी
४ वर्षांचा कृषी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कृषी अभ्यासक्रमामधील विविध शाखांतील त्या विषयाचे विशेषज्ञता असते. जसे की कृषिविद्या, वनस्पती रोगशास्त्र, वनस्पतिशास्त्र, कीटकशास्त्र, मृदाविज्ञान, उद्यानविद्या इत्यादी.
एम. टेक.
४ वर्षांचा कृषी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर यामध्ये प्रवेश घेता येतो. यामध्ये कृषी अभियांत्रिकी, जल व्यवस्थापन आणि कृषी तंत्रज्ञानासारख्या विषयांमध्ये विशेषज्ञता असते.
एम.एस्सी. कृषी व्यवसाय व्यवस्थापन
यामध्ये कृषी उत्पादने, प्रक्रिया आणि वितरण व्यवस्थापनाच्या शिक्षणाबरोबरच स्वयंरोजगार आदी विषयांमध्ये विशेषज्ञता प्राप्त होते.
आचार्य पदवी (पीएचडी)
पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर कृषी क्षेत्रात संशोधन करण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यात संशोधन कार्य, अभ्यासवर्ग आणि प्रबंध (Thesis) यांचा समावेश असतो. या अभ्यासक्रमात विशेषतः कृषी क्षेत्रातील संशोधनावर लक्षकेंद्रित केले जाते.
कृषी शिक्षणातील संधी
कृषी पदवीधारकांना कृषी विद्यापीठांतर्गत पदवी-पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये व्याख्याता म्हणून काम करता येते.
कृषी तंत्रनिकेतन, कृषी तंत्र विद्यालयामध्ये तसेच माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शेती विषयांत कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येतात. यामध्ये देखील नोकरीच्या संधी आहेत.
कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन केंद्रामध्ये शास्त्रज्ञ या पदावर तसेच कृषी विस्तार कार्य करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या विविध राष्ट्रीय संशोधन केंद्रावर शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याच्या संधी आहेत.
राज्य सरकारच्या कृषी विभागामध्ये कृषी सेवक, कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, कृषी आयुक्त या पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध सरकारी नोकरीच्या जागा भरल्या जातात. यामध्ये कृषी पदवीधारकांना प्राधान्य दिले जाते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विविध पदांवर कृषी अधिकारी, ग्रामसेवक आदी पदावर काम करण्याची संधी पदवीधारकांना उपलब्ध आहेत.
कृषी पदवीधरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याच्या संधी देखील उपलब्ध आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय बँका, आशियायी विकास बँक, आंतरराष्ट्रीय वित्त, कार्पोरेशन, बहुराष्ट्रीय कंपन्या व कृषी आयात-निर्यातीमध्ये विविध संधी आहेत.
याशिवाय कृषी पदवीधर कृषी क्षेत्रासोबत संलग्न असा स्वतःचा व्यवसाय, विविध उद्योग स्थापन करू शकतात. यामध्ये शेतकरी उत्पादन कंपन्या, सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन, पशुसंवर्धन, मत्स्यपालन, कृषी सेवा केंद्र. इत्यादींमध्ये विविध संधी आहेत.
विविध खासगी कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेक संधी दिवसेंदिवस तयार होत आहेत. त्यात बियाणे कंपनी, रासायनिक खते आणि कीटकनाशके कंपनी, कृषी उपकरणे आणि तंत्रज्ञान कंपनी, फलोत्पादन आणि फळ प्रक्रिया उद्योग व शेती-आधारित पर्यटन इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होतो.
- अनिकेत कांबळे ९७६६२८४५९०
(रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालय, बहिरेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.