Child Development: फुलत फुलत फुलवावीत मुले

Child Creativity: शिक्षण म्हणजे स्वतःला व जगाला जाणणे होय आणि ही प्रक्रिया स्व-अनुभवातून घडत जाणे अपेक्षित आहे. मात्र पालकचं मुलांना धावण्याच्या स्पर्धेत जुंपत आहेत. यातून मुलांचं व्यक्तिमत्त्व फुलण्याऐवजी कोमेजून जात आहे.
Child Development
Child DevelopmentAgrowon
Published on
Updated on

शिवाजी काकडे

Parenting Tips : शिक्षणतज्ज्ञ शोभा भागवत यांनी पालकत्वाच्या संदर्भात एक गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट अशी... एक जगप्रसिद्ध चित्रकार होता. त्याच्या चित्रांची ख्याती संपूर्ण जगभर पसरली होती. या प्रसिद्ध चित्रकाराची टीव्हीवर मुलाखत घेण्यात आली. मुलाखत घेणाऱ्‍याने चित्रकाराला प्रश्‍न विचारला, ‘‘तुम्ही तुमच्या यशाचे श्रेय कुणाला द्याल?’’ चित्रकाराने उत्तर दिले, ‘‘माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय मी माझ्या आईला देतो.’’ मुलाखत घेणाऱ्याने अंदाज बांधून पुढे सुरुवात केली. ‘‘तुमच्या आईने तुम्हाला लहानपणी खूप कागद, पेन्सिल आणि रंग दिले असतील आणि चित्रकलेचे मार्गदर्शनही केले असेल.

त्यामुळे आपण एक महान चित्रकार होऊ शकला असणार.’’ त्यावर त्या महान चित्रकाराने दिलेलं उत्तर असं होत. ‘‘मी फार लहान असताना माझे वडील गेले. आई मजुरी करायची. ती आणि मी झोपडीत राहत होतो. ती रोज सकाळी झोपडी सारवून जायची. आई कामावर गेल्यावर मी कोळशाचा तुकडा घेऊन दिवसभर घरभर चित्रं काढून ठेवायचे. संध्याकाळी आई चित्र पाहायची आणि हसून म्हणायची, ‘‘काढली का चित्र?’’

आई माझ्यावर कधीही रागावली नाही की चिडचिडही करायची नाही. परत दुसऱ्या दिवशीही आई घर सारवून जायची. परत मी तेच उद्योग करायचो. आईने कधीही माझ्या चित्राची चिकित्सा केली नाही. काढली का चित्र म्हणताना तिच्या डोळ्यात जे प्रेम, कौतुक, असायचे तीच माझ्यासाठी स्फूर्ती असायची. आईने मला फुलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं, त्यामुळे मी एक महान चित्रकार होऊ शकलो.

Child Development
Child development : ये हृदयीचे ते हृदयी घातले

फुलण्याचे स्वातंत्र्य

शिक्षण हे साधनांवर आणि वस्तूंवर अवलंबून नसतं. प्रचंड सोईसुविधा असूनही शहरांतील सगळीच मुले शिकतात असे मुळीच नाही. कधी कधी तर रेडिमेड साधनांमुळे मुलांच्या शिकण्यात तोचतोपणा येतो आणि मुले शिकत नाहीत. मुलांना कमीत कमी, साधी पण अत्यावश्यक साधनं असली तर शिक्षण घडण्याची जास्त शक्यता असते. याचा अर्थ साधने तोकडी असावी असा मुळीच नाही. केवळ साधने उपलब्ध करून दिली म्हणजे मुले शिकतातच असे नाही. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘मुलांकडे कल्पनाशक्ती, विचार, कृती आणि निर्मिति क्षमता असते.

तिला योग्य प्रकारे स्वातंत्र्य दिल्यास मुलांचं व्यक्तिमत्त्व फुलतं. मुलांची स्वतःची वाढण्याची क्षमता असते यावर पालक, शिक्षक यांनी विश्‍वास ठेवून मुलांना शिकण्याचे स्वातंत्र्य, प्रोत्साहन आणि जबाबदारी दिल्यास मुले अधिक चांगल्या प्रकारे शिकतात. शिक्षणातील प्रचंड स्पर्धा आणि परीक्षाकेंद्री शिक्षण यातून मुलं आणि पालक यांच्या नात्यातही झपाट्याने बदल होत आहे. मात्र हा बदल चिंता आणि चिंतनही करावा असा आहे.

परीक्षेतील गुणांच्या मागे धावताना मुलांचे मूलपण आणि फुलण्याचे स्वातंत्र्य यांचा संकोच केला जात आहे. मध्यमवर्गीय मुलांच्या बाबतीत तर अत्यंत गंभीर निरीक्षण समोर येते. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचा तर जन्मच जणू अभ्यासाचे ओझे वाहण्यासाठीचं झालाय की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे. प्रत्येक मूल शिकू शकतं यावर ना पालक विश्‍वास ठेवतात ना शिक्षक. त्यामुळे मुलांना शिक्षणाच्या आयत्या गोळ्या खाऊ घातल्या जात आहेत. यामुळे मुलांमध्ये वेगवेगळ्या वर्तन समस्या झपाट्याने वाढीस लागत आहेत. मुलांमध्ये आक्रस्ताळेपणा, चिडचिड, बेशिस्त, बेजबाबदार वर्तन वाढीस लागत आहे.

Child Development
Child Development : मुलांचे मूलपण जपा

स्वयंशिस्त व स्वावलंबन

मुलं जन्माला येताना स्वतंत्र अस्तित्व घेऊन जन्माला येते. पालक होणे म्हणजे मुलांचे मालक होणे नव्हे. मुलांचे स्वतंत्र अस्तित्व पालकांनी मान्य करायला हवे. मुलांचा जन्म केवळ पालकांच्या अपेक्षा किंवा अभ्यासाचे ओझे वाहण्यासाठी झालेला नाही. आई-वडील मुलांवर खूप प्रेम करतात. यापूर्वी तर आई-वडील मुलांची कधी एवढी काळजी पण करत नव्हते. या प्रेमापोटी पालकच मुलांचे मूलपण विसरून त्याला स्पर्धेतील घोडा बनवतात. मुलांची आवड, क्षमता, स्व - अभिव्यक्ती, खेळ, क्रीडा, कल्पकता, निर्मितिक्षमता या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अभ्यासाचा धोशा मुलांच्या मागे लावला जातो. सतत उपदेश केल्यामुळे मुलांमध्ये शिस्त निर्माण होत नाही.

प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिग्मंड फ्रॉइड त्याची पत्नी आणि मुलासोबत संध्याकाळच्या वेळी एका उद्यानात फिरायला जातात. बराच वेळ ते तिथे गप्पा मारत बसतात. घरी निघताना त्यांच्या लक्षात येते, की आपला मुलगा आपल्या सोबत नाही. फ्रॉइडची पत्नी घाबरून शोधाशोध करते, पण मुलगा सापडत नाही. फ्रॉइड शांतपणे आपल्या पत्नीला विचारतो, ‘‘तू मुलाला एखाद्या ठिकाणी जाऊ नकोस म्हणून सांगितले होते का?’’ फ्रॉइडची पत्नी म्हणते, ‘‘हो तिकडे एका ठिकाणी पाण्यात जाऊ नकोस म्हणून मी सांगितले होते.

आपला मुलगा तिथेच आहे असे म्हणून सिग्मंड फ्रॉइड पत्नीसह तिथे पोहोचतो. खरोखर तो मुलगा तिथेच खेळत असतो. फ्रॉइडच्या पत्नीला आश्‍चर्य वाटते. ती आपल्या पतीला विचारते तुम्हाला कसे कळले, की आपला मुलगा तिथे आहे. सिग्मंड फ्रॉइड सांगतो लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकात अहंभाव असतो. त्याचा योग्य सन्मान झाला नाही तर तो आपण सांगू त्याच्या विरुद्ध वागतो. लहान मुलांच्या बाबतीत तर ज्या वाटेवर मुलांना जाण्याची बंदी घातली जाते त्या वाटेने मुले अधिक जाण्याचा प्रयत्न करतात.

पालकांनी मुलांना अभ्यासाचा सतत उपदेश करू नये. मुलांचा आदर, सन्मान करावा. मुलांसोबत संवाद साधून त्यांचेही विचार ऐकून घ्यावेत. मुलांचा आत्मसन्मान राखून त्यांना योग्य दिशेने जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. मुलांकडून शिकताना काही चुका झाल्या तर मुलांना चुकण्याचंही स्वातंत्र्य द्यावं. मुलांचं स्वातंत्र्य स्वैराचारात रूपांतरित होऊ नये. हे समजणे हीच पालकत्वातील कला आणि कसोटी आहे. मुलांना शिकण्यासाठी स्वातंत्र्य देऊन मुलांमध्ये स्वावलंबन आणि स्वयंशिस्त निर्माण करता येते.

चुकण्याचे स्वातंत्र्य

मुलं अत्यंत शोधक वृत्तीचेअसतात. मुलांच्या अंगी असलेला सर्जनशीलतेतून ते नवनवे प्रयोग करतात. या प्रयोगशीलतेला पालक, शाळा आणि समाजाने संधी द्यावी. प्रयोग करताना मुलांच्या हातून काही चुका झाल्या तरी त्यांचं प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. प्रयोगशील वृत्तीला चालना देणाऱ्या समाजाला नवी पालवी फुटते. मुलांना फुलण्याची संधी मिळाल्यास त्यांची प्रतिभा कुंठित होत नाही.

पहिल्याच प्रयत्नात यश आणि शंभर टक्के गुण या अट्टहासापोटी अनेक कळ्या उमलण्यापूर्वीच खुडल्या जात आहेत. काढलंस का चित्र? या आईप्रमाणे पाठीवर कौतुकाची थाप आणि मुलांना अभ्यासाबरोबर खेळ, कला, कौशल्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देऊन मुलांना फुलण्याची आणि फुलविण्याची संधी देण्यासाठी सुजाण पालकत्वाची खऱ्या अर्थाने गरज आहे.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)
७८८७५४५५५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com