Child development : ये हृदयीचे ते हृदयी घातले

Children Thoughts : मुलांच्या अंतस्थ शक्तीचा विकास करण्यासाठी केवळ बौद्धिक विकासाकडे लक्ष न देता हृदय आणि मनाचाही विचार करावा.
Children Education
Children EducationAgrowon
Published on
Updated on

शिवाजी काकडे

Thinking about the Hearts and Minds of Children : एक धनाढ्य व्यक्ती काही खरेदी करण्यासाठी बाजारात जातो. अत्यंत महागडी आणि मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी सजलेली होती. फिरता-फिरता त्याला एक दुकान दिसते. दुकानाचे नाव होते ‘आनंदाचे दुकान.’ हे दुकान म्हणजे कुण्या आनंदा नावाच्या व्यक्तीचे नव्हते, तर त्या ठिकाणी मनाचा खराखुरा आनंद मिळायचा. ती व्यक्ती दुकानात जाते. दुकानात गेल्यावर त्याला खूप प्रसन्न वाटते. दुकानात ठेवलेले आनंद, प्रेम, दया, विवेक पाहून ती व्यक्ती प्रफुल्लित होते.

आयुष्यात पहिल्यांदाच त्याला अशी वेगळी आनंददायी अनुभूती येत होती. या वस्तू कितीही महाग असल्या तर आपण विकत घेऊ असे तो ठरवतो. तो धनाढ्य व्यक्ती दुकानदाराला या वस्तू मला विकत घेता येईल का, याची विचारणा करतो. दुकानदार म्हणतो, ‘‘या वस्तू मोफतही मिळतात, पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी विकत देऊ शकतो.’’ त्या धनाढ्य व्यक्तीच्या घरात एकूण नऊ माणसं होती.

प्रत्येकासाठी या वस्तू घ्याव्या असा विचार करून तो दुकानदाराला म्हणतो, ‘‘प्रत्येकी नऊ माणसांसाठी मला आनंद, प्रेम, दया, विवेक पार्सल करून द्या.’’ थोड्याच वेळात दुकानदार एक पार्सलचा छोटा डबा घेऊन येतो आणि त्या धनाढ्य माणसाच्या हातात ठेवतो.

तो छोटा डबा पाहून तो आश्‍चर्यचकित होऊन म्हणतो, ‘‘या ठिकाणी आनंद, दया, प्रेम, विवेक तर खूप मोठमोठे दिसत आहे. आणि तुम्ही मला या सगळ्या वस्तू एवढ्या छोट्या डब्यात कशा दिल्या?’’ दुकानदार म्हणतो, ‘‘या सर्व गोष्टींचे मी तुम्हाला बी दिले. या बीजाचे रोपण तुमच्या हृदयात करा ते आपोआप मोठे होतील.’’

Children Education
Children Education : मुलांना समजून घेताना...

स्व-जागृती

शिक्षण म्हणजे व्यक्तींमधील उत्तम अंतस्थ शक्तीचे प्रकटन करणे होय. शिक्षण म्हणजे मुलांमध्ये जन्मजात, सुप्त गुणांना जागृत करून त्यांचा आविष्कार करणे होय. ज्या प्रमाणे दुधात तूप असतेच फक्त गरज असते ती योग्य प्रक्रिया करून ते बाहेर काढण्याची. मुलांमध्ये शिकण्याची नैसर्गिक, उपजत क्षमता असतेच गरज असते फक्त त्या अंतस्थ शक्तीला योग्यप्रकारे प्रकट करण्याची.

मुलांच्या या अंतस्थ शक्तीला प्रकट करण्याचा मार्ग त्यांच्या हृदयातून जातो. आजची सारी शिक्षणव्यवस्था मुलांच्या बुद्धीचा विकास करण्याच्या मागे लागली आहे. घर, शाळा आणि व्यवस्थेने हृदयाला वनवासी बनवले आहे. मुलांच्या हृदयात प्रवेश करायचा असेल तर शिकवणाऱ्याला सहानुभूतिपूर्वक आणि प्रेमाने मुलांच्या हृदयापर्यंत जावे लागेल तरच मुलांच्या अंतस्थ शक्तीचा विकास होईल. आजच्या शिक्षणप्रक्रियेत हे घडते का यावर चिंतन करणे गरजेचे आहे.

ओझे दप्तराचे अन् अपेक्षांचे

मुलांचे बालपण फुलले की तारुण्यही फुलते आणि आयुष्यही. तीन-चार वर्षे वय हे खेळण्या-बागडण्याचे वय. याच वयात मुलांच्या पाठीवर भलेमोठे दप्तर येत आहे. प्रमाणापेक्षा अधिक ओझे मुलांच्या दप्तरामध्ये दिसून येते. यामुळे मुलांमध्ये पाठदुखीचा त्रास, सांधे आखडणे, मणक्याची झीज होणे, थकवा येणे, डोकेदुखी, मानसिक ताण यांसारखे गंभीर आजार वाढताना दिसत आहेत. बालवयात विद्यार्थ्यांच्या शरीरावर होणाऱ्या अनिष्ट परिणामामुळे भविष्यातही त्यांना अनेक शारीरिक व मानसिक व्याधी जडू शकतात.

पालक, शिक्षक आणि समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलं दबत आहेत. दिवसेंदिवस शाळकरी मुलांचे बिघडत जाणारे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य आणि त्यातून वाढत जाणाऱ्या आत्महत्या हे सर्व चिंताजनक आहे.

Children Education
Children Education : मुलांना समजून घेताना...

सर्जनशील मनासाठी

शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यात जे आहे ते बाहेर काढणे असते. मात्र आपली शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या मस्तकात जे सुप्त दडलेले आहे ते बाहेर काढण्याऐवजी बाहेर जे आहे ते डोक्यात भरवण्याचे काम करत आहे. यामुळे मुलांसाठी शिकण्याची प्रक्रिया अवघड, कष्टप्रद आणि दुःखदायक होते. शिक्षण घेण्याचा हेतू ज्ञानार्थी बनण्याऐवजी केवळ परीक्षार्थी होऊन नोकरी मिळवणे एवढाच झाला आहे. आजची सारी शिक्षणव्यवस्था महत्त्वाकांक्षा आणि प्रतिस्पर्धा यावर उभी आहे. इच्छा असणे गैर नाही.

माणसाचे आयुष्यच इच्छेवर उभे राहते. पण विशिष्ट गोष्टच मिळावी ही अतिमहत्त्वाकांक्षी वृत्ती जीवनात असमाधान आणि अशांती निर्माण करते. पालकांचा, शिक्षणव्यवस्थेचा मुलांवर विशिष्ट परीक्षाच पास व्हावा यासाठी दबाव असतो. सर्व मुलांनी समान वेगाने, समान प्रकारे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद द्यावा अशी शाळा अपेक्षा करते. पण वास्तव वेगळे असते. प्रत्येक मूल वेगळं असतं. विशिष्ट परीक्षांचा अट्टहास आणि महत्त्वाकांक्षेमुळे मुलांच्या मनामध्ये चिंता, भयाची निर्मिती होते. भीतीतून सर्जनशील मनाची निर्मिती होत नाही. यशस्वी होण्याच्या अट्टहासामुळे साध्या, सरळ, निर्मल आणि प्रज्ञावान मनाची निर्मिती होत नाही. मुलांचे मन ताजेतवाने, निष्पाप आणि आनंदी असेल तर मुलांमध्ये सर्जनशक्ती निर्माण होते.

ये हृदयीचे ते हृदयी घातले

प्रचंड स्पर्धा आणि त्या स्पर्धेला समोरे जाण्यासाठी आजकाल खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या भयंकर चुकीच्या शिकवणी अस्तित्वात आल्या. अभ्यासाचे विषय आणि आशय मुलांच्या अंतस्थ शक्तीला फुलवणारे नाही. त्यातही परत अनोळखी असलेल्या इंग्रजी भाषेमुळे शिकण्याची प्रक्रिया आणखी किचकट होत आहे. मुलांच्या अंतस्थ शक्तीचा विकास करण्यासाठी केवळ बौद्धिक विकासाकडे लक्ष न देता हृदय आणि मनाचाही विचार करावा. पालक आणि शिक्षकांनी प्रेमपूर्वक मुलांच्या हृदयात डोकावयला हवे.

मुलांना आपल्या हृदयाचे प्रेम अर्पण केल्याशिवाय मुलांचे हृदय जिंकता येणार नाही. गौतम बुद्ध आणि अंगुलीमाल यांची कथा सर्वश्रुत आहे. गौतम बुद्धांच्या ‘जोडता येत नसेल तर तोडण्याचा आपल्याला अधिकार नाही’ या एका वाक्याने अंगुलीमालचे जीवन बदलले. कारण फक्त गौतम बुद्धांच्या हृदयात असलेले प्रेम आणि करुणेच्या भावाने अंगुलीमालच्या अंतस्थ हृदयात प्रेम आणि करुणेचा अंकुर उगवला. प्रसिद्ध शास्त्रज्ञ रघूनाथ माशेलकर मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. त्यांच्या भावे सरांनी बहिर्गोल भिंगाचा प्रयोग करून सूर्यकिरण एकत्र करून कागद पेटवून दाखवला.

आणि म्हणाले, ‘‘रघुनाथ अशा प्रकारे तू तुझ्या सर्व शक्ती केंद्रित केल्या तर तू आयुष्यात काहीही करू शकतो.’’ इथेच रघुनाथ माशेलकरांची अंतस्थ चेतना जागृत होऊन एका महान शास्त्रज्ञाचा जन्म झाला. ज्ञानेश्‍वरांनी रेड्यामुखी वेद वदविले याचा अर्थ ज्ञानेश्‍वरांनी अवघड असलेले ज्ञान सोप्या भाषेत सांगितले. त्यांच्या हृदयात समाजाच्या प्रति असलेल्या प्रेमातून हे सर्व घडले आणि ते पुरुष असूनही जगासाठी माउली झाले. शिक्षण म्हणजे काय हे त्यांच्याच शब्दांत सांगावयाचे झाल्यास

हृदया हृदयी येक जाले।

ये हृदयीचे ते हृदयी घातले॥

मुलांच्या हृदयात आनंद, शांती, करुणा, प्रेम, विवेक याची बीजे पेरा त्यातूनच सहृदयी, सहानुभूतीशील, नीतिवान, तर्कशील, सर्जनशील, सुजाण, सुसंस्कृत नागरिक घडतील.

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com