Maharudra Mangnale: व्यापारात रस नाही, त्यासाठी वेळ नाही आणि गरजही नाही!

Farming Lifestyle: महारुद्र मंगनाळे हे शेती, निसर्ग, वाचन, लेखन यांच्याशी जोडलेलं जग आनंदाने जगत आहेत. पैशाच्या मागे न लागता, स्वतःच्या अटींवर आणि निसर्गाशी सूर जुळवून जगण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय प्रेरणादायी आहे.
Farm Pond
Farm PondAgrowon
Published on
Updated on

Nature Farming: मी पहाटे उठतो. शेततळ्यावर, माळावर फिरतो. काळा चहा पिऊन व्यायाम करतो. सुर्योदय बघतो, त्याला निरोपही देतो. सायकल खेळतो. बागेतील कामं करतो. वृक्षसंवर्धन हे माझं महत्त्वाचं काम आहे. याशिवाय झाडावर चढतो, फांदीवर लटकतो. मांजर,कुत्र्यांसोबत खेळतो. राजवीर, अन्वी या लेकरांसोबत रमतो. पक्ष्यांचं संगीत ऐकतो. विहिरीवर झऱ्याचं संगीत ऐकतो. बंधाऱ्यांवरील झाडांना भेटतो.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शेतीत कष्ट करतो. म्हणजे शेतकरी आहे. शेतकऱ्याकडं कधीच वेळ नसतो. तो कायम शेतीत अडकलेला असतो. मी आनंददायी शेती करतो. याचा अर्थ आनंद मिळवणे हा शेती करण्यामागचा हेतू आहे. रुद्रा हट आणि लगतची छोटी फळझाडांची बाग हेच माझं छोटसं जग आहे. त्यापलीकडच्या जगात मला फारसा रस नाही.

Farm Pond
Maharudra Mangnale: पाखरांनी आंबे खाल्ले तर बिघडलं काय?

चालणं, वाचन आणि लेखन या तीन बाबी मला प्रिय आहेत. मी कितीही वेळ चालू शकतो, वाचू शकतो आणि लेखनही करू शकतो. वेळात वेळ काढून मी पर्यटन करतो. जिवलग मित्रांना भेटतो. फोनवर बोलतो. एका दैनिकात पाक्षिक सदर लिहितो. मुक्तरंग प्रकाशनाचं, पुस्तक प्रकाशन आणि वितरणाचं काम पाहातो. दरवर्षी माझी पुस्तकं प्रकाशित करतो. कधीतरी वेळ काढून एखादा इंग्रजी सिनेमा बघतो. ही यादी बरीच मोठी आहे. दररोजचा माझा दिवस कधी संपतो, हेच मला कळत नाही.

मला नेहमी वाटतं, दिवस आणखी मोठा असायला हवा. रिकामपण, आळस, कंटाळा या शब्दांना माझ्याकडं थारा नाही. मी निसर्गासोबत सुर जुळवून मस्त जगतोय. मला व्यक्तिशः इथं जगायला फारच थोडे पैसे लागतात. शेतीतील तोटा मी मुक्तरंग प्रकाशनाच्या कामातून भरून काढतो. त्यासाठीही मी धावपळ करीत नाही. माझ्या अटी, शर्तीनेच तिथंही काम करतो. पैसा कमावणं ही माझ्या जगण्याची गरज राहिलेली नाही. ती कधीही नव्हती. माझ्या जगण्यात पैशाला नेहमीच दुय्यम स्थान राहिलयं. मी ठरवून, विचारपूर्वक प्रवाहातून बाहेर आलोय. मागे वळण्याचा प्रश्नच नाही.

Farm Pond
Maharudra Mangnale: मित्रा, वेळ कुठे विकत मिळतो का?

पिवळी ज्वारी हे आरोग्यदायी अन्न आहे. ती बहुतांश शहरी लोकांना माहित नाही. यावर्षी बऱ्याच वर्षांनी मी रब्बीला पेरली. योगायोगाने तिचं उत्पादन चांगलं झालं. ही ज्वारीची चव शहरी मित्रांना कळावी म्हणून एक फेसबुक पोष्ट केली. त्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय. ही ज्वारी विकत घेणारे बहुतांश लोक मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ओळखणारे आहेत. माणसांना बोलणं हे माझ्यासाठी कंटाळवाणं आहे. तरीही एक प्रयोग म्हणून हे केलं. लोकांनी आंबे, सीताफळांची चौकशी सुरू केलीय. आणखी काय काय मी देऊ शकतो, याचीही विचारणा केली. पहिल्यांदाच मी संयमाने सगळ्यांना उत्तरं दिली.

मी पिकवलेली गुणवत्तापूर्ण पिवळी ज्वारी रास्त दराने मित्रांपर्यंत पोचवली. यानिमित्ताने अनेक जुन्या मित्र-मैत्रिणींची इथं भेट झाली. ज्यांनी ज्वारी घेतली, त्या सर्वांनी ज्वारीचं तोंड भरून कौतूक केलं. हा अनुभव माझ्यासाठी आनंददायी राहिला. व्यापार ही एक वेगळी गोष्ट आहे. तो करणं वाईट आहे असं मी मानत नाही. पण ती माझी गरजच नाही. आणि वेळ तर अजिबात नाही. मी नेहमी म्हणतो, शेतीच्या लफड्यात अडकलेला माणूस दुसरं कोणतंच लफडं करू शकत नाही. मी यात पूर्णपणे अडकलोय. माझ्या आवडीच्या जगण्यात व्यापाराला अजिबात जागा नाही!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com