Irrigation Project : जलसिंचनातील नऊ प्रकल्‍पांची रखडपट्टी

Irrigation Project Work Update : शेतीला मुबलक पाणी उपलब्‍ध करून देण्याचे आश्वासन इच्छुकांकडून दिले जात आहे. यातील काही प्रकल्‍प ४० वर्षांहून अधिक काळ रखडले आहेत.
Irrigation Project
Irrigation ProjectAgrowon

Alibaug News : निवडणुका आल्या की रोजगार, रस्‍ते, आरोग्‍याबरोबरच जलसिंचनाचा विषय विजय मिळविण्यासाठी उमेदवारांच्या चांगलाच उपयोगात येतो. आगामी निवडणुका लक्षात घेता, आताही जलसिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे, शेतीला मुबलक पाणी उपलब्‍ध करून देण्याचे आश्वासन इच्छुकांकडून दिले जात आहे. यातील काही प्रकल्‍प ४० वर्षांहून अधिक काळ रखडले आहेत.

शेतीला पाणी नसल्याने फक्त पावसाच्या पाण्यावर शेती करणे परवडत नसल्याने ३५ टक्के शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. त्यातच राजकीय अनास्थेमुळे रायगड जिल्ह्यातील जलसिंचनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाढते औद्योगिकरणाबरोबर लोकवस्तीला पाणी पुरवताना शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. अशीच स्थिती राहिल्यास जिल्ह्यात रब्बी हंगामातील शेतीचे क्षेत्र आणखीनच कमी होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.

रायगड जिल्ह्यात मोठा एक, मध्यम दोन तर लघु ५१ असे एकूण ५४ जलसिंचन प्रकल्प पूर्ण झाले आहेत, मात्र बांधकाम सुरू असलेले नऊ प्रकल्‍प अद्याप अपूर्ण आहेत. शिवाय जे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यातील पाणी कशा पद्धतीने वापरावे, याचे नियोजन नसल्याने काही गावांमध्ये मुबलक तर कालव्याच्या शेवटच्या टप्प्यांतील गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. त्‍यामुळे उन्हाळी भाजीपाला, कडधान्य यांसारखी पिके घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्याचबरोबर पाणीटंचाईमुळे महिलांनाही भर उन्हात वणवण भटकावे लागते.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून दरवर्षी सरासरी पाच कोटी रुपयांचा आराखडा तयार केला जातो. दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्चूनही पाणीटंचाई कमी झालेली नाही.

Irrigation Project
Irrigation Project : निधीअभावी रखडले दहा सिंचन प्रकल्पांचे काम

दहा वर्षांपासून रखडले बाळगंगा धरण

पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पाचे काम दहा वर्षे रखडले आहे. नवी मुंबईतील विविध भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून या धरणाची निर्मिती केली जात आहे. धरणाचे पाणी प्रामुख्याने नवी मुंबईतील औद्योगिक प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे. यासाठी पेण तालुक्यातील वरसई परिसरात सहा ग्रामपचांयतीमधील नऊ गावे १३ वाड्‌यांमध्ये एक हजार ४०० हेक्टर जागेत प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. प्रकल्पामुळे तीन हजार ४४३ कुटुंबे बाधित होणार असून आहेत. २००९ पासून प्रकल्पाचे काम बंद आहे.

निधीअभावी रखडला काळ-कुंभे प्रकल्प

कुंभे जल विद्युत प्रकल्पाला १५ ऑक्टोबर १९९८ मध्ये ९७ कोटींची मान्यता मिळाली व तेथे जाण्या-येण्याच्या रस्त्यासाठी, बोगद्यासाठी ११ एप्रिल २००२ मध्ये वनविभागाची मान्यता मिळाली. पुढे कार्यकारी अभियंता नि. रे. करीमुंगी व त्यांच्या सहकार्‌यांनी हा प्रकल्प फायदेशीर होण्यासाठी काळ आणि कुंभे एकत्र केले. त्यामुळे वीज निर्मितीबरोबर सिंचनासाठी व औद्योगिक वसाहतीला पाणी उपलब्ध होईल, असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तयार केला. १७ नोव्हेंबर २००६ पासून कुंभे धरणाच्या कामास सुरुवात झाली. बोगदा खणून प्रकल्पापर्यंत जाण्याचा रस्ता तयार करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत प्रकल्‍पाचे ७० टक्के काम झाले असून उर्वरित निधीअभावी रखडले आहे.

सांबरकुंड धरण कागदावरच

अलिबागमधील रामराज भागात ४० वर्षांपासून रखडलेला साबरकुंड मध्यम धरण प्रकल्प अद्याप कागदावरच राहिला आहे. खैरवाडी, जांभूळवाडी आणि महान परिसर धरणाखाली जाणार असल्‍याने बुडीत क्षेत्र म्हणून घोषित आहे. या गावांतील साडेतीनशे कुटुंब विस्थापित होत असून १२८ हेक्टर भातशेतीही धरणाखाली जात आहे. तिन्ही गावांतील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन रामराजमध्येच पुनर्वसन करावे आणि नियमानुसार २२ टक्के भूखंड शासनाने द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

Irrigation Project
Irrigation Project : विदर्भातील ६५ टक्के सिंचन प्रकल्प अपूर्ण

कोंढाणे धरण सिडकोला हस्तांतरित

नवी मुंबईपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणासाठी सिडको नव्याने अहवाल तयार करणार आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने अडगळीत टाकलेले हे धरण दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने सिडकोला हस्तांतरित केले आहे.

कोंढाणे धरणाची उंची आधी ३९ मीटर निश्‍चित केली होती. आता सिडकोकडे हस्तांतर झाल्‍यावर मातीचा बांध ३९ मीटरवरून ३२ मीटर वाढून ७१ मीटर होणार आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार, पाणीसाठा १०५ दशलक्ष घनमीटर होता, तो वाढून २७१ दशलक्ष घनमीटर इतका होणार आहे.

जिल्ह्यातील सिंचनाची स्थिती

मोठे प्रकल्प १

मध्यम प्रकल्प ४

लघु सिंचन प्रकल्प (राज्य) २८

लघु सिंचन प्रकल्प (स्थानिक) १६

पाझर तलाव ३६

कोल्हापूर बंधारा ६३

साठवण बंधारा ५९

सिंचन विहिरी ५,४२६

डिझेल पंप ३३२

विद्युत पंप १६,९६९

अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड धरणाचे काम वेगाने सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रकल्‍पबाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल. याकडे सातत्याने स्थानिक आमदार या नात्याने पाठपुरावा करीत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष घातले आहे.
आमदार महेंद्र दळवी, अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com