New Year 2025 : नवे वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद

Positive Beginning : चला एक नवीन सुरुवात करूया, अतीतावर नको भविष्यावर बोलूया. जे विचार आपल्याला कमकुवत करू पाहतात त्यांना देऊ तिलांजली. माणूस म्हणून आपल्याला उत्तरोत्तर कसे विकसित होता येईल यासाठी कटिबद्ध राहूया.
New Year
New YearAgrowon
Published on
Updated on

New Year Planning :

नवे वर्ष, नवीन पहाट,

नवा सूर्य, नवे तेज, नवा दिवस,

नवी फुलं, नवी पाने,

नवी सळसळ हिरवीगार,

ह्या नव्या भवताला कवेत

घेऊन होवो जगणे बहारदार!

नवा तजेला घेऊन आलेला

तरतरीत नवीन दिवस.

नव्या दिवसात नव्या दमाचा

नवा श्वास, नवा विश्वास

सोबत वृद्धिंगत होवो

आतून आत्मविश्वास!

नवीन वर्षात नवीन संकल्प,

नवीन सकारात्मकता,

नवीन ध्येय, नवा ध्यास, नवा हव्यास,

आयुष्याचे नवीन पर्व अन्

नवे नवे हवे सर्व!

चांगुलपणाची नवीन दृष्टी,

द्वेष असूयेला देऊन सुट्टी

आयुष्याचा राजरस्ता समाधानाने चालू

अन् आपल्याच जगण्याला

आपण जरा माणुसकीचे कुंपण घालू!

New Year
New Year 2025 : नवे वर्ष, नव्या आशा-आकांक्षा

एक एक वर्ष सरू लागतं तेव्हा, नवं काही घडू लागतं तेव्हा, हे अन् असं बरं आणिक तेवढंच खरं आपल्या लक्षात येत जातं. नीरव शांततेत, आतला आणि बाहेरचा कोलाहल स्तब्ध होतो तेव्हा कैक घटना-प्रसंगांचे तुकडे चलचित्राप्रमाणे मनमेंदूत तरळत जातात आणि आपसूक एक रंगीतसंगीत आठवांचा, भल्याबुऱ्या अनुभूतीचा आगळावेगळा कोलाज विणला जातो. तो चित्तारला जातो कधी कागदावर दृश्य तर कधी मनःपटलावर अदृश्य!

काय काय आठवत जातं ना! वर्षभरात किती हात हातून निसटले, किती नाती दुखावली? किती नवीन माणसे जोडली आणि किती कौशल्ये त्यांच्याकडून आत्मसात केली? झालेले नफे-तोटे, भेटलेले लोक खरे आणि खोटे! काढलेल्या सहली आणि आजारपणंदेखील. अनपेक्षित काही सुखद घडले तेव्हा मनाचं झालेलं फुलपाखरू अन् जखम काळजाची असो वा शरीराची तिच्या वेणा साहताना झालेली तगमग तरी मना कशी विसरू? कठीण प्रसंगी कोसळताना आधाराला धावून आलेले नवीन हात आणि खांदे आठवून सुखाच्या हिंदोळ्यावर झुलताना भविष्याकडे पाहताना किती आश्‍वस्त वाटते नाही?

‘जे दिले जाते तेच आपल्याकडे परत येते,’ हा तर निसर्गाचा नियम, त्यामुळेच थोडा बदल आपल्या आत करू... या येणाऱ्या वर्षात. होय, मानवी आयुष्यात निरपेक्षतेचे मोल आभाळाएवढे, आणि अपेक्षेतून जन्मा आलेले दुःख तर त्याहूनही मोठे केवढे! इतरांच्या वागण्याने आपल्या दिवसाला गालबोट लागते तेव्हा आपण हिरमुसतो वा पापण्यादेखील होतात ओल्या नकळत पण आपल्यामुळे कुणाचा दिवस, दिवसाचे काही क्षण बेरंग होत नाहीत नं? हेही बघू या नवीन वर्षात! सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवली, की आत्मकेंद्रित दृष्टिकोन, स्वार्थी बाणा गळून पडतो.

New Year
Agricultural Development : सामूहिक शेतीचे बळ, भिडीकरांना देई फळ !

दडपून दाबून ठेवलेल्या ओठांवर मौनाचे कुलूप लावून ठेवले तर शब्दांचा जीव कोंडला जाणारच न? अन् अंतरीच्या भावना, भावनांची आंदोलने, आंदोलनाचा वेग, वेगाची गणितं, त्या गणितांची उत्तरं मिळतील जेव्हा शब्दांच्या पालख्या उतरतील भोवतालाशी झालेल्या नितळ संवादातून! संवादाने मनावरचे मणामणाचे ओझे हलके होते म्हणूनच ‘या हृदयीचे ते हृदयी’ होणे असते गरजेचे. वजा-उणेचे गणित कशाला? गणित हवे बेरजेचे! त्यामुळेच संवादाने हलका करत जाऊ भार मनावरचा अन् पुढ्यात आलेल्या चेहऱ्यावरही हास्य फुलवत जाऊ...

कालच्या दिवसाची छाया आजवर नसावी अन् येणाऱ्या क्षणात नव ऊर्जेची नवी आशा दिसावी. भूतकाळाच्या पायावर वर्तमान उभे असले, तरी गतकाळातील घटितांना किती कवटाळून बसावे? त्याच गर्तेत किती गिरक्या घ्याव्यात याचेही भान सुटायला नको. गतकाळातील करड्या-काळ्या सावल्या आजची निरभ्रता तर झाकोळून टाकत नाही ना? हा विचार जन्मा आला पाहिजे म्हणजे त्याच्या पाठी नवीन तजेला ल्यालेला नवीन स्वप्नांच्या पूर्तीचा, उत्साही खिलाडूवृत्तीने पाठलाग करायला लावणारा उमेदीचा दिवस आकारतो. जणू काही...

नवीन वर्ष, नवीन हर्ष,

नवा संकल्पाची नवी चाहूल,

नवा उत्साह, नवी उमेद,

नव्या आकांक्षेचे नवे पाऊल

चला एक नवीन सुरुवात करूया, अतीतावर नको भविष्यावर बोलूया. जे विचार आपल्याला कमकुवत करू पाहतात त्यांना देऊ तिलांजली. माणूस म्हणून आपल्याला उत्तरोत्तर कसे विकसित होता येईल यासाठी कटिबद्ध राहूया. श्‍वास-उच्छ्वास सुरू आहे, हृदयाचे ठोके सातत्याने धडधडताहेत यासाठी नियतीचे आभार मानू. सुखदुःखाच्या पाठशिवणीचा खेळ तर सुरूच राहणार त्याशिवाय जगण्यात कसली आलीय मजा? कारण आयुष्यात आव्हाने आहेत म्हणून तर जगण्यात गंमत आहे आणि ही गंमत हयातभर आपल्याला लाभो यासाठी मन-मेंदू-मनगट सक्षम करू या येणाऱ्या वर्षात! नववर्षाभिनंदन!!

(लेखिका साहित्यिक, वक्ता, एकपात्री कलाकार आहेत.)

९६५७१३१७१९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com