
New Year Fresh Start : आजची नवीन वर्षाची पहाट नव्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने पोटात घेऊन उगवली आहे. शेतकऱ्यांना सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागल्याने सरलेले वर्ष तसे खडतरच गेले. हवामानातील टोकाचे बदल आणि प्रमुख शेतीमालाच्या पडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली. परंतु शेतकरी हा जगातील एकमेव व्यावसायिक असावा की जो सगळ्या वाताहतीनंतरही पुन्हा नव्या जोमाने नवा डाव मांडतो.
सरलेल्या वर्षात अनेक सकारात्मक गोष्टीही घडल्या; ज्यामुळे शेतकऱ्यांना आगामी काळात जटिल आव्हानांना भिडण्यासाठी नवी उमेद मिळावी. वातावरणातील बदल (क्लायमेट चेंज), कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स) आणि शेतीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा हे मुद्दे शेती धोरणाच्या केंद्रस्थानी आले, ही यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. यासंदर्भात केंद्र सरकारने अनेक योजना जाहीर केल्या.
देशात ‘डिजिटल अॅग्रिकल्चर मिशन’ सुरू करण्यात आले. शेतकऱ्यांची आणि शेतजमिनीची डिजिटल नोंदणी, पिकांच्या उत्पादनाचे अंदाज, पीकविमा, हवामान अंदाज, भूजल व्यवस्थापन, दुष्काळ, पूरनियंत्रण आदी बाबींमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरेल.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार प्रमाणे ‘युनिक फार्मर आयडी’ मिळणार आहे. पीक आरोग्य, कीड व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. पीएम-किसान योजनेसाठी ‘किसान ई-मित्र’ हे चॅटबॉट सुरू करण्यात आले. वातावरणातील बदलाच्या समस्येला तोंड देण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सरकारची कामगिरी पुरेशी समाधानकारक नसली, तरी त्या दिशेने काही पावले निश्चितच उचलली गेली आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते ६५ पिकांचे १०९ वाण प्रसारित करण्यात आले. हे वाण वातावरण स्नेही, कीड प्रतिकारक आणि जास्त उत्पादनक्षम आहेत. वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर अचूक हवामान अंदाजाची गरज खूपच वाढली आहे. भारतीय हवामान विभागाला (आयएमडी) नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली.
हे औचित्य साधून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगचा वापर करून अचूक हवामान अंदाज वर्तवण्याची प्रणाली विकसित करण्यासाठी मिशन मौसम सुरू करण्यात आले. तसेच प्रत्येक गावात प्रादेशिक भाषेत हवामानाचा अंदाज पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘पंचायत मौसम सेवा’ पोर्टल सुरू करण्यात आले. याशिवाय काही संस्थांचीही कामगिरी उल्लेखनीय राहिली.
राज्यात बारामती येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड यांच्या मदतीने ‘फार्म ऑफ द फ्यूचर’ हा भविष्यवेधी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस शेतीचा प्रकल्प आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातली शेती क्षेत्राची दिशा बदलण्याची क्षमता या संकल्पनेत आहे.
त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी पुढाकार घेतला. फळपिकांमध्ये मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी धडपडणाऱ्या सह्याद्री या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये युरोप आणि अमेरिकेतील कंपन्यांनी ३९० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
ही सगळी सुचिन्हे आहेत; पण एवढेच पुरेसे नाही. शेती हा दहा तोंडाचा राक्षस असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व स्तरांवर आणखी जोमाने काम करावे लागेल. सरकारने शेतकरीविरोधी मानसिकतेचा त्याग करून शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी धोरणात्मक तटबंदी मजबूत करणे ही त्यासाठीची पूर्वअट आहे. तसेच शेती क्षेत्रामध्ये खासगी आणि सरकारी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढविण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही आघाड्यांवर नवीन वर्षात भक्कम प्रयत्न व्हावेत, या अपेक्षेसह ‘ॲग्रोवन’ परिवारातर्फे सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.