Aquatic Ecosystem : पाणथळ परिसंस्था जपण्याची गरज

Wetland Ecosystem : या लेखमालिकेमध्ये आपण नदी, समुद्र, कांदळवन किंवा खाड्यातील जलीय परिसंस्थांची माहिती घेतली. या लेखामध्ये स्थिर आणि उथळ पाण्याच्या जागा असलेल्या पाणथळ जागांतील जलीय परिसंस्थेविषयी माहिती घेऊ.
Aquatic Ecosystem
Aquatic EcosystemAgrowon

सतीश खाडे

Water Ecosystem : ज्या ठिकाणी उथळ असे पाणी अल्पकाळ किंवा दीर्घकाळ टिकून राहते अशा जागांना पाणथळ जागा (वेटलॅंड) असे म्हणतात. यातील उथळ व स्थिर हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत.

तलाव किंवा धरणात असलेला पाणीसाठा हा खोलपर्यंत असतो, त्यामुळे त्यांना पाणथळ जागा म्हणत नाहीत. पाणथळ क्षेत्रामध्ये पाणी उथळ असून, सूर्यप्रकाश पाण्याच्या तळापर्यंत पोहोचतो. त्यात पाणवनस्पतीची वाढ सुलभतेने होते. म्हणूनच या परिसंस्थेची प्राथमिक उत्पादकता पृथ्वीवरच्या सर्व परिसंस्थांमध्ये सर्वाधिक आहे.

एखाद्या परिसंस्थेची प्राथमिक उत्पादकता म्हणजे काय? तर त्या परिसंस्थेत उपलब्ध होणारा सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड हे घटक वापरून प्रकाश संश्‍लेषण क्रियेद्वारे वनस्पती तयार करत असलेल्या ‘ग्लुकोज’ चे प्रमाण होय. ग्लुकोज म्हणजेच तिथे सेंद्रिय पदार्थ निर्मिती होते.

या व्याख्येप्रमाणे पाणथळ परिसंस्थेची सरासरी वार्षिक ‘प्राथमिक उत्पादकता’ २५०० ग्रॅम कॅलरी प्रति वर्गमीटर असते. तुलनेसाठी पानगळ जंगलाची उत्पादकता १००० ते २००० इतकी असते, तर वाळवंटाची उत्पादकता फक्त तीन ते सहा इतकी नीचांकी असते.

पाणथळ जागांचे स्वांप, खारफुटी आणि मार्श असे साधारण तीन प्रकार असतात. पाणथळ जागांच्या प्रकाराप्रमाणे तेथील झाडोऱ्याचा प्रकार बदलतो आणि त्याप्रमाणे उत्पादकताही बदलते.

स्वांप म्हणजे वृक्ष झुडपे असलेली पाणथळ जागा. भारतात गोड्या पाण्याचे स्वांप केरळात सर्वाधिक आहेत. महाराष्ट्रात स्वांप केवळ एकच असून, सिंधुदुर्ग येथे दोडामार्गच्याजवळ ‘हिवाळे’ गावात हा अधिवास आहे. इथल्या वनस्पतींनी पाण्यात जगण्यासाठी इंग्रजी ‘यू’ आकाराची विशिष्ट मुळे तयार केली असतात.

साधारणतः आपण उकिडवे बसल्यानंतर पायाची जी स्थिती होते, त्याप्रमाणे ही मुळे दिसत असल्याने त्यांना ‘नी रूट्स’ म्हणतात. इथले वृक्ष, पक्षी, प्राणी सगळेच अत्यंत दुर्मीळ आहेत. असे स्वांप बऱ्याचदा गावाचा पाण्याचा स्रोत असतात. त्यात बारमाही वाहणारा झरा असतो. यावर चक्क उन्हाळी पिकेदेखील घेतली जातात.

Aquatic Ecosystem
Aquatic Ecosystem : कांदळवने : एक महत्त्वाची जलीय परिसंस्था

खारफुटी जंगल हा स्वांपचाच एक प्रकार असला तरी त्यात खारे पाणी असते. फक्त तो खाऱ्या पाण्याचा अधिवास ठरतो. खारफुटीबाबत या आधीच्या एका लेखामध्ये माहिती घेतली आहे.

मार्श या प्रकारात मात्र केवळ गवते किंवा झुडपे (Shrubs) उगवताना दिसतात. लडाखसारख्या अति उंचावरील प्रदेशात अशा पाणथळ जागा दिसतात. आपल्याकडे हिवाळ्यात येणाऱ्या अनेक पाणथळ स्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांची ती मूळ वसतिस्थाने आहेत. कोकणात व विदर्भात काही अशी तळी आढळतात. पण त्यातील बहुतांश व्यक्तिगत मालकीची असून, त्यात मुख्यतः कमळ, शिंगाडा यांची शेती होते.

पाणथळ ही शास्त्रीय भाषेत ‘डायनॅमिक इकोसिस्टिम’ आहे. वनस्पती प्रवर्गातील प्लवके (एक पेशीय जीव), प्राणी प्रवर्गातील प्लवके, शेवाळे, बुरशी, जलचर, कीटक, मासे, शंख, शिंपले, झुडपे, गवते, पान वनस्पती आणि या साऱ्यांवर अवलंबून असलेले खूप पक्षी अशी समृद्ध अन्नसाखळी व जैवविविधता इथे नांदते. हे पक्षी पिके, फळबागा यातील विविध किडींचाही फडशा पाडत असतात. त्यामुळे पिकांचे किडींपासून रक्षण होते.

पाणथळ जागांचे महत्त्व

पाणथळ जागांच्या आजूबाजूच्या परिसरात भूजलात वाढ होते. हे भूजल दीर्घकाळ टिकतेही. त्यामुळे आसपासच्या विहिरी व बोअरवेलला पाणी वाढते. उन्हाळ्यापर्यंत हे पाणी टिकत असल्यामुळे शेती उत्पादनातही भर पडते.

पाणथळ जागा जमिनीवरून वाहणारे पाणी साठवतात. पुराच्या पाण्याच्या आवेगाला आवर घालत असल्यामुळे पूर नियंत्रणास मदत होते.

पाणथळ जागेतून जमिनीत पाणी गाळून जात असल्याने भूजलाची गुणवत्ता वाढते.

पाणथळ जागा जागतिक स्थानिक जलचक्रात महत्त्वाची भूमिका बजावतात.

हवामान बदलाच्या संकटातही पाणथळ जागा चांगली सकारात्मक भूमिका बजावू शकतात.

Aquatic Ecosystem
Sea Ecosystem : कांदळवनांचे निसर्गाला होणारे फायदे

उपजीविका, शाश्‍वत विकास या सर्व बाबतीत ही पाणथळ जागा मोठा वाटा निभावू शकतात.

पाण्यातील माती, प्रदूषित घटक, बायोमास या सगळ्यांना पाणथळ जागेत अटकाव बसतो. पुढे वाहणारे पाणी व जमिनीत मुरणारे पाणी यामुळे शुद्ध स्वरूपात जाते. पाणथळातील सूक्ष्मजीव या बायोमासचे विघटन करतात. त्यातून त्यांची संख्या वाढत जाते.

किनाऱ्यांचे लाटांपासून व वादळापासून संरक्षण करतात.

सर्व पाणथळ स्थळे हवेतील कार्बन स्थिरीकरणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

पाण्यात वाढणारी कमळ, शिंगाडा अशी काही पिके घेऊन उपजीविकेचे साधनही उपलब्ध होऊ शकते.

थोडक्यात, पर्यावरणीय दृष्टीने पाणथळ जागांचे महत्त्व खूप आहेच, पण सामाजिक व आर्थिक विकासातही त्यांचे मोलाचे योगदान असते. ते दिवसेंदिवस अधिक वाढत आहे.

सिंधुदुर्गमधील पाणथळ जागांचे दस्तऐवजीकरण

कोकणात भरपूर डोंगरदऱ्या व भरपूर पडणारा पाऊस यामुळे पाणथळ जागा भरपूर आहेत. कोकणातील पाच जिल्हे मिळून खूप महत्त्वाच्या ४८० पाणथळ जागा शासकीय नकाशावर नोंदवल्या गेल्या आहेत. मात्र आकाराने लहान व नकाशावर नसलेली हजारो पाणथळ स्थळे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याने पुढाकार घेऊन २०१७ ते २०२० पर्यंत ६७ पाणथळ जागा व त्यांच्या जैवविविधतेचे तपशिलांसह दस्तऐवजीकरण पूर्ण केले आहे.

हे सर्व काम लोकसहभागातून मुख्यतः महाविद्यालयीन युवक- युवतींनी पूर्ण केले आहे. म्हणजेच शिक्षण क्षेत्र, प्रशासन व सामान्य माणूस एकत्र आला तर एखादे विधायक काम किती व्यापकतेने, गुणवत्तापूर्वक करणे शक्य आहे, याचे हे आदर्श उदाहरण ठरते. हे काम बहुतेक कोकणातीलच नव्हे, तर भारतातील सर्वप्रथम जिल्हा ठरला आहे. त्याचा कित्ता गिरवत महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातही काम सुरू झाले आहे.

पाणथळ जागांचा ऱ्हास

निरोगी पाणथळ जागा कार्बन आणि पाणी दोन्ही साठवतात. कार्बन स्थिरीकरणात त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय ४० टक्के जैवविविधतेला पण आधार देतात. परंतु १९०० ते २००० या शतकादरम्यान जलनिचरा, शेती परिवर्तन, शहरे आणि बंदरे यासारख्या पायाभूत सुविधा उभारताना जगाने जवळजवळ ६६ टक्के वेटलँड गमावले आहेत, संपवले आहेत. १९७६ ते २००० या २४ वर्षांत जगातील खारफुटीची जंगले ५२४५ वर्ग किमीने कमी झाले आहेत, असेही एक अहवाल सांगतो.

पाणथळ जागांना अतिक्रमणाचा मोठा धोका आहे. अनेक ठिकाणी पाणथळ जागावर भर घालून शेती व घर बांधणीसाठी त्या जागेचा वापर सुरू आहे. काही उथळ तळ्यांच्या काठी मंदिरे बांधली आहेत. मंदिरातील वर्दळ, उत्सव, यात्रा यामुळे माणसांचा होणारा गोंगाट व वाढणारे प्रदूषण यांनी पाणथळ जागा व जैवविविधता नष्ट होत जाते. या पाण्यामध्ये सांडपाणी सोडणे, शेतातील निचरा होऊन खते व कीटकनाशक मिश्रित पाणी मिसळले जाणे यांचे भयानक परिणाम या परिसंस्थेवर होत आहे.

अनेक गावे व शहरात दलदलीच्या जागांचे रूपांतर कचराकुंडीमध्ये झाल्याचे दिसते. अनेक ठिकाणी खाणकाम हे पाणथळ स्थळांच्या मुळावर आले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पाणथळ जागांचे संरक्षण पर्यावरण जैवविविधता आणि उपजीविका यासाठी महत्त्वाचे असल्याची बाब संबंधित लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न पर्यावरण अभ्यासक करत आहेत. पाणथळ स्थळांचे संरक्षणच नव्हे, तर त्यांचे संवर्धन होण्यासाठी जन चळवळ आवश्यक आहे.

सतीश खाडे, ९८२३०३०२१८,

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या अभिनव जलनायक या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com