
Mumbai News: शेतकऱ्यासारखा मोठा संशोधक दुसरा कोणी नाही. त्याला त्याच्या शेतीची संपूर्ण माहिती असते त्यामुळेच विविध प्रयोगांमधून कापसाची उत्पादकता वाढविण्यावर त्याचा भर असतो आणि अलीकडच्या काळामध्ये ते दिसूनही आले आहे. आगामी काळात कापसाची उत्पादकता वाढविणे आणि त्याचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांनी केले.
कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारमधील उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. या वेळी देशभरातून आलेल्या दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.
या वेळी रूप राशी म्हणाल्या, ‘‘भारत जगाला पंचवीस टक्के कापूस देतो. पुढील काळात उत्पादकता वाढविण्याबरोबरच मूल्यसाखळी बळकट करण्याची गरज आहे. कोणत्याही क्षेत्रात गुणवत्ता वाढली तर त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणीही वाढते. लोक स्वतःहून आपल्याकडे येत असतात. या कार्यशाळेच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीवर चर्चा होईल. केंद्र सरकारचे कापसावर सर्वांत जास्त लक्ष आहे. कारण कापसासारखे टिकाऊ फायबर अन्य दुसरे कोणतेही नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या वेळी अडचणी निर्माण झाल्या, त्या वेळी आर्थिक संस्थांबरोबर चर्चा करून आम्ही त्यातून तोडगा काढला. मूल्य साखळीमध्ये कापसाच्या उत्पादनापासून ते अंतिम उत्पादनापर्यंत केंद्र सरकार शेतकऱ्यांसमवेत असेल. उत्पादकता आणि त्याचे या दोन विषयांवर केंद्र सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांनी कापसाची शेती सोडू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. अशा कार्यशाळांच्या माध्यमातून प्रबोधन झाल्यास शेतकऱ्यांना कापूस शेती अधिक फायदेशीरपणे करता येईल.’’
सीसीआयचे कार्यकारी संचालक ललितकुमार म्हणाले, ‘‘कापसाची अर्थव्यवस्था मजबूत आणि लवचिक बनवण्यासाठी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि सरकारने एकत्र काम करण्याची गरज आहे. सीसीआयचा सर्व कारभार पेपरलेस करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत. सध्या बियाण्यांसंदर्भातला कारभार पेपरलेस आहे. यापुढील काळामध्ये कापूस खरेदी विक्रीचा व्यवहारही पेपरलेस करण्यात येईल. कापूस पिकासाठी योग्य बियाणे नवनवे प्रयोग आणि माती परीक्षण गरजेचे आहे.’’
कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी म्हणाले, ‘‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने योग्य वेळी या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. सध्या खरीप तोंडावर असून भारतात, किंबहुना महाराष्ट्रात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भारतापाठोपाठ चीनचा दुसरा नंबर लागत असला तरीही उत्पादकता आणि उत्पन्नात मात्र चीन पहिल्या क्रमांकावर आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे बियाण्यांची विविधता आहे. त्यामुळे कापसाच्या धाग्यामध्येही विविधता निर्माण होते आणि परिणामी बाजारामध्ये दरात ही तफावत होते. पुढील काळामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून काम केल्यास कापूस खरेदी विक्री सोबतच खते, बी बियाणे आणि कीटकनाशकांमध्येही फायदा होऊ शकतो.’’
केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सहसचिव पद्मिनी सिंगल म्हणाल्या, ‘‘कापूस हे पीक नाही तर ते सोने आहे. देशविदेशातील कपड्यांची गरज भारत पूर्ण करतो मात्र आपल्याकडे बियाणांची गुणवत्ता आणि मुले साखळीमध्ये काही कमतरता आहेत त्या दूर करण्याची गरज आहे.’’ या वेळी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी स्वागत आणि प्रस्ताविक केले. सीएआयच्या कामाची माहिती संचालक पंकज निपाणी यांनी दिली या वेळी मनीष दादा शरद सराफ, आयसीआरएचे माजी संचालक वाय जी प्रसाद आदींची भाषणे झाली. संचालक विनय कोटक यांनी आभार मानले.
कापूस सोने आहे तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा?
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान विविध व्यक्तींनी कापूस हे पांढरे सोने आहे, अशा आशयाची विधाने केली. हाच धागा पकडत कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक ज्ञानेश्वर भामरे यांनी, जर कापूस सोने असेल तर सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘आमच्या शेतकऱ्यांना माती परीक्षण माहीतच नाही, तसेच पंचवीस वर्षांपूर्वी ज्या शेतकऱ्याकडे २५ एकर शेती होती ती आता दोन एकरांवर आहे. मात्र त्याच कापसावर व्यापार करणाऱ्यांच्या जिनिंग मिल व्यावसायिकांच्या जिनिंग मात्र वाढल्या आहेत. या तफावतीकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.