Soil Health: जमीन सुपीकतेसाठी शाश्‍वत प्रयत्नांची गरज

Soil Conservation: दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार हा ‘मातृदिन’ म्हणून साजरा केला जातो. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेत पिकांना आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांच्या वापराबाबत शिफारशी असतात. अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करणे आवश्‍यक आहे.
Soil
SoilAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture: वर्षानुवर्षे आपण शेत जमिनीमधून पीक उत्पादन घेत आहोत. शेती शाश्‍वत व दीर्घकालीन फायदेशीर करण्यासाठी उत्पादनाच्या किमान एक तृतीयांश भाग इतके सेंद्रिय पदार्थ जमिनीस द्यावेत. मातीतील सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वामुळे मातीला जिवंतपणा येतो. सेंद्रिय पदार्थांचे योग्य प्रमाण मातीच्या आरोग्याचे सूचक आहे. मातीच्या २० सेंमीपर्यंतच्या वरच्या थरात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अंदाजे २.५ ते ३.० टक्के इतके असते. निरोगी मातीतील सजीवांचे वजन हेक्टरी ५ टन असते. मातीतील सूक्ष्मजीवांचे प्रमाण, जैवरासायनिक अभिक्रिया, जीवनक्रम आणि प्रजाती विविधता हे घटक असंख्य आवश्यक पर्यावरणीय क्रियाकलपांसाठी जबाबदार आहेत.

सध्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्क्यांपेक्षा कमी आढळून येते. यामुळे पीक उत्पादन कमी व स्थिर झालेले दिसून येत आहे. सेंद्रिय पदार्थ मातीमध्ये आवश्यक पोषक तत्त्वे जसे की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशिअम यांचा पुरवठा करतात, त्यामुळे वनस्पतींची वाढ चांगली होते. सेंद्रिय पदार्थ मातीच्या कणांच्या रचना सुधारतात, त्यामुळे मातीमध्ये पाणी आणि हवा यांचे संतुलन राखले जाते. सेंद्रिय पदार्थांमुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. सेंद्रिय पदार्थ मातीतील सूक्ष्मजीवांसाठी अन्न आहे. ज्यामुळे सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढते.

अयोग्य व्यवस्थापन पद्धतीमुळे मातीचे आरोग्य आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. शेतातील पीक अवशेष जाळणे, अन्नद्रव्यांची व सेंद्रिय पदार्थांची भरपाई न करता बहुपीक पद्धतीचा अवलंब करणे, अनियंत्रित सिंचन आणि रासायनिक निविष्ठांचा बेसुमार आणि अतिरेकी वापर या सारख्या शेती पद्धतींमुळे मातीचे आरोग्य बिघडत आहे. मातीचे आरोग्य म्हणजे मातीची उत्पादन क्षमता. ती परिसंस्थेचे कार्य सुरळीत पार पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. मातीची सुपीकता प्रभावित झाल्यामुळे कृषी उत्पादन स्थिर किंवा घटते आहे. लागवडीचे क्षेत्र वाढविणे कठीण आहे. मात्र सध्या लागवडीखाली क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यावर लक्षकेंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी जमिनीचे आरोग्य टिकवून संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.

Soil
Soil Fertility: जमिनीची सुपीकता हाच शेतीचा पाया

जमिनीचे आरोग्य हे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर अवलंबून असते. सतत एकाच जमिनीमध्ये पीक उत्पादन घेतल्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये कमी होतात. जमिनीला विश्रांती मिळत नाही. आवश्यक सेंद्रिय आणि अजैविक घटकांचा पुरेसा पुरवठा होत नाही. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. तसेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे सुपीकतेमध्ये घसरण होते.

याचा एकूण परिणाम म्हणून पीक उत्पादन स्थिर होते किंवा उत्पादनात घट येते. पाऊस, वारा आणि इतर नैसर्गिक कारणांमुळे मातीची धूप होते. त्यामुळे मातीमधून पोषक घटक वाहून जातात. जास्त खोलवर मशागतीची कामे, अयोग्य व्यवस्थापन पद्धती यामुळे मातीची झीज होऊन सुपीकता कमी होते. रासायनिक खतांचा अतिवापर केल्यास मातीचे आम्लीकरण होते, तसेच पोषक तत्त्वांचे संतुलन बिघडते. शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि बांधकामांमुळे सुपीक जमिनीखालील क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे शेतीयोग्य जमिनीची उपलब्धता कमी होत आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था, बंगलोर यांनी २०१६ मध्ये ‘देशातील जमिनीचा ऱ्हास’ संदर्भात राष्ट्रीय माहिती संकलित केली. त्यामध्ये देशातील एकूण कृषी व गैर-कृषी क्षेत्राच्या ३७.६ टक्के जमिनीचा ऱ्हास झाल्याचे दिसून आले. जमिनीची धूप झाल्यामुळे सेंद्रिय कर्ब व उपलब्ध अन्नद्रव्ये वाहून जाणे, पोषण द्रव्यांचे असंतुलन, मातीचा खालचा थर वर येणे, माती घट्ट होणे, माती जैवविविधतेत घट होणे आणि जड धातू व कीटकनाशकांमुळे मातीचे प्रदूषण होणे आदी कारणांमुळे जमिनीचा ऱ्हास होत आहे.

Soil
Soil Nutrient: जमिनीतील अन्नद्रव्यांचे उपलब्धीकरण

नवी दिल्ली येथील नॅशनल ॲकॅडमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेसच्या (एनएएएस) मते, देशात प्रति हेक्टरी प्रति वार्षिक १५.५ टन माती वाहून जात आहे. या भौतिक ऱ्हासामुळे ५.३७ ते ८.४ दशलक्ष टन अन्नद्रव्ये वाहून जात आहेत. मातीचा वरचा सुपीक थर वाहून गेल्यास पीक उत्पादकतेवर त्वरित विपरीत परिणाम होतो. वाहून गेलेल्या मातीमुळे जलाशयांमध्ये गाळ साचून पाणी साठवण क्षमता कमी होते आहे. देशातील सुपीक मातीचा भूभाग मोठ्या प्रमाणात बिगर शेती उद्देशासाठी वापरात येत असल्यामुळे देखील प्रभावित होतो आहे.

फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाच्या सन २०१७ च्या अहवालानुसार आदर्श एन-पी-के उपयोग प्रमाण ४:२:१ आहे, परंतु १९९० मधील उपयोग प्रमाण ६:२.४:१ वरून २०१६ मध्ये ६.७:२.७:१ इतके झाले आहे. प्रमुख अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी रासायनिक खतांचा दीर्घकालीन असंतुलित वापर केल्यामुळे मातीच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे. जास्त प्रमाणात युरियाचा वापरामुळे माती आणखी खराब होत आहे.

संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्त्वाचे...

शाश्‍वत शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर नियमित आणि कमी करणे यासाठी राष्ट्रीय अभियान अंतर्गत २०१५ पासून जमीन आरोग्य पत्रिका (एसएचसी) वाटप योजना राबविली जात आहे. शेतजमिनीच्या आरोग्य पत्रिकेत पिकांना आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या अन्नद्रव्यांच्या वापराबाबत शिफारशी आहेत. मातीतील अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार सेंद्रिय व रासायनिक खत वापरण्यास मार्गदर्शन करण्यात येते.

कृषी उत्पादकतेवर संशोधन करणारी शासकीय संस्था राष्ट्रीय उत्पादकता परिषद यांच्या फेब्रुवारी २०१६ मधील मूल्यांकनानुसार जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसार खतांच्या वापरामुळे देशात रासायनिक खते वापरात ८ ते १० टक्क्यांनी घट झाली असून उत्पादनात ५ ते ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. माती परीक्षणावर आधारित खतमात्रा वापरण्यामुळे हा सकारात्मक बदल दिसून आला आहे. शहरीकरण आणि इतर बिगर शेती वापरापासून मुख्य शेती जमीन जमिनीचे सुपोषण आणि संवर्धन आवश्यक आहे. जमिनीची सुपीकता आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. शाश्‍वत शेतीसाठी राष्ट्रीय माती संरक्षण धोरण तयार करणे आवश्यक आहे.

जमीन आरोग्य सुधारण्यासाठी उपाय

मृदा संवर्धनासाठी पिकांचे अवशेष जमिनीत गाडणे, किमान मशागत, आच्छादन किंवा चारा पिकांची लागवड, कंपोस्ट आणि जैविक खतांचा वापर, ठिबक सिंचनाचा वापर, वनीकरण, एकात्मिक पीक व्यवस्थापन, बहुविध पीक पद्धती, बांधबंदिस्ती आणि जैविक बांध तयार करावेत किंवा बांधावर झाडांची लागवड आदी उपाय करावेत.

रासायनिक निविष्ठांचा जास्त किंवा असंतुलित वापर करू नये. संतुलित आणि शिफारशीत मात्रेमध्ये वापर करावा.

शेतातील पीक अवशेष जाळू नयेत.

वीट तयार करण्यासाठी शेती योग्य सुपीक माती वापरू नये.

सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. पाटपाणी पद्धतीचा अवलंब टाळावा.

- डॉ. हरिहर कौसडीकर, ७५८८०८२०४९

(उपसंचालक (संशोधन), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com