
Water Conservation Program : एखादी समस्या सोडवली असे वाटत असताना त्यातून पुढील अनेक अडचणींना, समस्यांना जन्म झालेला असतो. हा कोणत्याही समाजाचा किंवा देशाचा प्रश्न नाही, तर सार्वत्रिक आहे. या अडचणी केवळ सामाजिक, तांत्रिक किंवा व्यवस्थापनाच्या असतात असे नाही, तर नैसर्गिक हवामान बदलासारख्याही असतात. त्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उत्तरांचा शोध घेण्यामध्ये वॉटर संस्थेचे योगदान मोठे आहे.
वॉटर संस्थेने अनेक गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामातून भूजल वाढवले. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता झाल्याने शेती समृद्धही झाली. याचे यश साजरे करत असतानाच २००५-०६ च्या दरम्यान यशस्वी म्हणवल्या जाणाऱ्या गावांमध्येही पाणी पुरत नसल्याचे दिसू लागले. हिवाळा संपत नाही तोच पाणी संपत असल्याचे दिसून आले. मग वॉटरने या गावांमध्ये पाण्याच्या नियोजनावर काम करण्याचा निश्चय केला.
मात्र काही काळातच हे पाणी पुरवून वापरण्याचे, नियोजनाचे काम मूळ पाणलोटाच्या कामापेक्षाही अवघड असल्याचे स्पष्ट होऊ लागले. पाणी उपलब्ध झाल्यावर या गावांमध्ये नगदी पिके घेण्याचे प्रमाण वाढले होते. यात सर्वच सामील, मग कोण कोणाला आवर घालणार? जमीन माझी, मग त्याखालील पाणीही माझेच, हा सर्वसाधारण समज.
आपल्याला हक्क वापरण्याचे काही शिकवावे लागत नाही. वॉटरच्या कार्यकर्त्यांनी उपाय शोधण्याचा संकल्प केला. या गावात पुन्हा नव्याने समित्यांची स्थापना झाली. गावातल्या पाण्याचा ताळेबंद नुसताच मांडून उपयोग नाही, तर त्यावर योग्य त्या उपाययोजना आखणे व त्यांची सामुदायिक जबाबदारीने अंमलबजावणी करण्याच्या कामांचे काही टप्पे निश्चित केले. पहिला व महत्त्वाचा टप्पा भूजल व्यवस्थापनाचा. त्यासाठी गावातील सर्व विहिरी, कूपनलिकांची नोंदणी केली गेली. लोकांनाच वेळोवेळी पाणीपातळी मोजण्याची सवय लावली.
मग सर्वांना खाली जाणारी पाणीपातळी आणि त्यानुसार काही निर्णय घेण्याची निकड जाणून लागली. तीच बाब भूपृष्ठावरील जलस्रोतांबाबत. बंधारे, तलाव अशा जलसाठ्याजवळचे जमीनमालक हे पाणी त्यांच्यासाठीच आहे, अशी सोईस्कर समजूत करून घेत.
जास्तीत जास्त पाणी स्वतः वापरत आणि दूरच्या लोकांना वंचित राहावे लागे. मग सर्वांनाच विश्वासात घेत पाण्यावरील सामुदायिक मालकीचे तत्त्व रुजविण्याचे काम सुरू केले. यात सर्वांची समजूत पटून, मनाची तयारी होण्यासाठी आणि पुढील उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे वळविण्यात चार-पाच वर्षांचा काळ गेला. अनेक गावात हे उपलब्ध पाणी वापरासाठीची नवीन नियमावली तयार झाली. तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर समिती तयार झाली. यातूनच पुढे आला ‘वॉटर’चा ‘पाणी कारभारी प्रकल्प’.
हवामान बदल अनुकूलन अप्रोच
कोणत्याही सामाजिक कामांमध्ये केवळ लोकांना व त्यांच्या व्यवस्थापनालाच दोष देऊन चालत नाही. कारण दरम्यानच्या काळात हवामानातील विविध घटकांतील अनियमितता व बदलांमुळेही पाणी व्यवस्थापनामध्ये अनेक अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले. पाणलोटाच्या संदर्भात पावसाची अनियमितता खूप जाणवू लागली होती. (उदा. उशिरा येणारा पहिला पाऊस, दोन पावसांतील अंतर, पावसाची बदललेली कमी अधिक तीव्रता इ.)
त्यामुळे दुबार पेरणी, पिके वाळणे, किंवा अतिवृष्टीने खराब होणे, अति आर्द्रतेने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढणे या सारख्या परिणामांचा फटका शेतकऱ्यांना बसतो. या विषयावरही काम करण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाल्यानेच नाबार्ड ने दिलेल्या हाकेला ‘वॉटर’ संस्थेने प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी नवनवीन तंत्र विकसित करण्याचे पुढील ध्येय डोळ्यासमोर ठेवत ‘क्लायमेट चेंज ॲडाॅप्टेशन - CCA) हा कार्यक्रम सुरू केला.
जन, जल, जंगल, जमीन या सर्वांची लवचिकता वाढवणे, हा उद्देश ठेवण्यात आला. सतत बदलत चाललेल्या हवामान परिस्थितीनुसार स्वतः व आपल्या शेती आणि पद्धतीमध्ये योग्य ते बदल करणे व त्यातून टिकाव धरणे व प्रगती करणे हा त्या उपक्रमाचा मूळ गाभा होता. सर्व प्रकारच्या अनपेक्षित हवामानातही पिके टिकवणे, उत्पादन मिळवणे, सुरक्षित अन्न आणि पिण्याचे शुद्ध पाणी याची खात्री देणे, जमीन व पाणी व्यवस्थापना बरोबरच जैवविविधतेचे संगोपन, हरित ऊर्जा निर्मिती यावर भर देण्यात आला. एकात्मिक पीक व्यवस्थापन, शेती अवजारांचा पुरवठा आणि त्यांचा वापर, उपजीविकांची अन्य साधने उदा. दुग्ध व्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन इ. या प्रयोग सुरू झाले. या कामातून आर्थिक उत्पन्नाची जोड मिळण्यासोबत स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध होतो.
हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही दत्तक गावात हवामान केंद्रे बसवण्यात आली. त्याद्वारे शेतकऱ्यांना तीन दिवस आधीच हवामानाचा अंदाज व त्यावर आधारित कृषी विद्यापीठ, केव्हीके यांचे पीक सल्ले उपलब्ध करण्यात आले. यातून महाराष्ट्रातील दहा, मध्य प्रदेशामधील आठ आणि तेलंगणातील सहा गावातील हजारो शेतकऱ्यांना फायदा मिळू लागला. त्यांनी पीक पद्धती, पाणी व्यवस्थापनामध्ये गरजेनुसार आवश्यक ते बदल करू लागले.
त्यातून संभाव्य नुकसान टाळून अधिक उत्पादन मिळवण्यात अनेकांना यश आले. या प्रायोगिक प्रकल्पातून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी वॉटर ने विविध कार्यशाळा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा याद्वारे मुक्तहस्ते वाटली. त्यामुळे वाॅटरचा हा उपक्रमाचा केंद्र सरकारने अन्य राज्यातही विस्तार करण्याचा निर्णय घेतला. २०१५ च्या अर्थसंकल्पात हवामान बदलासाठी राष्ट्रीय अनुकूलन निधीची स्थापना केली. त्याचे व्यवस्थापन नाबार्डकडे सोपवले.
परिसंस्था-आधारित अनुकूलन अप्रोच
वॉटरचा पाणलोट विकासाचा सर्वसमावेशक दृष्टिकोनामध्ये परिसंस्था आधारित अनुकूलन (Ecosystem based Adaptation- EbA) हा पाया आहे. यामध्ये हवामान - अनुकूल आणि परिसंस्था आधारित उपाय एकत्रितपणे केले जातात. या उपायांमध्ये माती आणि जलसंधारण तंत्र, शाश्वत शेती, स्थानिक - विशिष्ट पीक आणि हवामान सल्ला, पाणी-वापर व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन यांचा समावेश आहे. यावर अधिक व्यापकपणे कार्य केल्यास, केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील अर्ध - शुष्क कोरडवाहू प्रदेशातील शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) गाठता येतील. हवामान बदलासंदर्भातील पॅरिस करार आणि जमीन ऱ्हास तटस्थता (LDN) या दिशेने प्रगती होऊ शकेल, असा विश्वास वाटतो.
संशोधनासाठी स्वतंत्र विभाग
‘वॉटर’ने कालानुरूप सामाजिक-आर्थिक परिस्थितीचे आणि हवामान बदलाचे अवलोकन करत नेहमीच चालू उपक्रमांचे व संस्थेच्या कार्यपद्धतीचे परीक्षण गंभीरपणे केले आहे. त्यावर संस्थेच्या पुढील प्रवासाचे नियोजन केले आहे. याची सुरुवात २००७ मध्ये झाली असली, तरी पुढे २०१६ मध्ये W-CReS (WOTR Centre for Resilience Studies) या नावाने संस्थेत एक स्वतंत्र संशोधन विभाग तयार केला गेला. त्यात भूविज्ञान, जलविज्ञान, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, हवामान व पर्यावरण शास्त्र, जैवविविधता, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, पोषण, अर्थशास्त्र, रिमोट सेन्सिंग, इ. विषयातील सुमारे ३० तज्ज्ञ काम करत आहेत.
राष्ट्रीय धोरण ठरविण्यात सहभाग
प्रगत देशातील विद्यापीठामध्ये लोकांचे, समाजातील विविध घटकांच्या विविध प्रश्न जाणून घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी संशोधन करत असतात. समस्यांच्या मुळाशी जात त्यावर उत्तरे शोधण्याचे काम केले जाते. अशा छोट्या मोठ्या अभ्यासातूनच विद्यार्थी शिकत जातात. अशा प्रकल्प अनुभवातून शिकण्या - शिकवण्याची रचना बसवलेली असते.
त्यामुळे एका बाजूला समाजाचे प्रश्न, समस्या सुटण्यास मदत होते,तर दुसऱ्या बाजूला तरुण संशोधकांना अभ्यास, संशोधन चिकाटीने करण्याचा अनुभव मिळतो. या समस्या धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचल्या जातात. त्यातून त्या प्रदेशासाठीची धोरणे आखण्याचे काम होते. यामध्ये आवश्यक तिथे सल्ला देण्यासाठी विद्यापीठ कार्यरत असते.
याचा विचार केला तर वॉटर संस्था यापेक्षा वेगळे काय काम करते? म्हणूनच मला स्वतःला ते पाणी विषयातील विद्यापीठच वाटते. इथे कार्यरत संशोधक व संशोधन विषयांची यादी पाहिल्यावर त्याचे प्रत्यंतर येते. त्यांनी सामान्यांच्या दारिद्र्य निर्मूलनातील मूलभूत समस्या समजावून घेऊन पाण्यावर काम सुरू केले आणि पुढच्या तीस वर्षात समोर आलेल्या अनेक अडचणी, समस्यांवर संशोधनाने समाधानकारक उत्तरे शोधली.
त्यांनी लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवला. ही या समस्यांबाबतची शाश्वत उत्तरे असल्याची खात्री पटल्यानेच राज्य आणि केंद्र सरकारची खात्री पटल्यानेच निती आयोग गेल्या तेवीस वर्षापासून नियमितपणे वाॅटरचा सल्ला घेत आहे. त्यावर आधारित धोरणे ठरवली जात आहेत. आपल्या देशातच नव्हे, तर अन्य काही देशामध्येही वॉटर सल्लामसलतीसाठी विश्वासार्ह संस्था मानली जाते. खरेतर अशा संस्थेला खरोखरच विद्यापीठ दर्जा मिळाला पाहिजे असे मला वाटते.
पाणी कारभारी प्रकल्प
गावातील पाणी व्यवस्थापनाची व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने पाणी कारभारी प्रकल्प (Water Stewardship Initiative- WSI) राबविण्यात आला. गावकऱ्यांना केवळ पाणी वापरकर्ते न ठेवता त्यांना जल व्यवस्थापक म्हणजेच ‘जल कारभारी’ बनवण्याचा हा उपक्रम आहे. त्यासाठी स्थानिक लोकांमधूनच प्रशिक्षित जलसेवक/ जलसेविका, ग्राम जल व्यवस्थापन समिती उभी करण्यात आली.
त्यांनी पाणी आरोग्य तक्ता, पाण्याचा ताळेबंद बनवणे, जलसंधारण आणि जलबचतीचे नियोजन, शेतीचे व सुयोग्य पीक पद्धतीचे नियोजन, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी वापराचे सामाजिक नियम व बंधने ठरवणे, भूजल साक्षरता व त्याचे व्यवस्थापन आणि या सर्वांचे समायोजन या बाबींचे व्यवस्थापन पाहायचे असते. २०१५ मध्ये सुरू झालेला हा उपक्रम महाराष्ट्रातील १०० गावांमध्ये यशस्वीपणे सुरू आहे. त्याचे यश लक्षात घेता अन्य राज्यातही हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
- सतीश खाडे ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.