
डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील
पाणलोटच काय पण गावातील कोणतेही काम किंवा कार्यक्रम हा जेव्हा लोकांना आपला, स्वतःचा वाटतो, त्या वेळी त्या कामांसाठी लोकांचा स्वयंस्फूर्त सहभागही मिळतो. प्रकल्प कार्यान्वयन करणाऱ्या संस्थेने केवळ तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून काम करणे अपेक्षित असते. या यंत्रणांनी स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे असते. स्थानिक लोकांना भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी काही उपक्रम राबवावे लागते. त्याला प्रवेश प्रेरक उपक्रम म्हणतात.
प्रवेशप्रेरक उपक्रमामध्ये कोणती कामे किंवा उपक्रम राबवावेत, यासाठी विषयाचे काही बंधन नाही. मात्र काही प्रवेशप्रेरक उपक्रम सुचवलेले आहेत. ते राबविल्यास सामाजिक अभिसरण होण्यासाठी व लोकांशी जवळीक निर्माण करण्यासाठी फायदा होत असल्याचे आजवरच्या अनुभवामधून दिसून आले आहे. या उपक्रमांमध्ये सर्वसाधारण सार्वजनिक तलावातील गाळ काढणे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण, शाळा इमारत बांधणे इ. उपक्रम हाती घेता येतात.
पाणलोट क्षेत्र विकासकामांमध्ये प्रवेश प्रेरक कामांना अनन्यसाधारण महत्त्व असते. १९९५ -९६ मध्ये सुरू झालेला अवर्षण प्रवण क्षेत्र कार्यक्रम या कार्यक्रमात खऱ्या अर्थाने प्रवेश प्रेरक कामांमुळे लोकसहभाग वाढत गेला. पाणलोट विकासाच्या माध्यमातून राळेगणसिद्धीचा शाश्वत विकास करणाऱ्या चळवळीचे प्रवर्तक अण्णा हजारे यांचेच उदाहरण घेऊ.
त्यांनी प्रथम गावातील यादव बाबा मंदिराची डागडुजी व उभारणीचे प्रेरक काम केले. एक सैनिक माणूस गावातील मंदिराच्या उभारणीसाठी प्रयत्न करतो, यातून प्रेरक शक्ती तयार झाली. त्यातून पुढील सर्व कामांमध्ये लोकसहभाग वाढत गेला. ते गाव आदर्श झाले. पुढील आदर्श गाव योजनेसाठी हे संपूर्ण गाव प्रेरक ठरले. ही सकारात्मक वृत्तीही संसर्गजन्य असते. एकापासून दुसऱ्याला व सर्वापर्यंत पोचते.
अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रमांचे केंद्र शासनाच्या वतीने अंतरिम मूल्यमापन करताना मी स्वतः धुळे, नंदुरबार आणि सातारा या जिल्ह्यांतील प्रवेशप्रेरक व इतर पाणलोट विकासकामांची प्रत्यक्ष माहिती घेतली होती. धुळे जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावांमध्ये प्रवेश प्रेरक काम म्हणून गावच्या वेशीजवळ जनावरांना पिण्यायोग्य पाण्याचे हौद बांधले होते. त्याचा फायदा गावातील सर्व चराऊ जनावरांना होत असे.
या छोट्या कृतीतून राखोळी किंवा शेतकऱ्यांना घरी पोहोचल्या पोहोचल्या जनावरांना पाणी पाजण्याचा ताणच कमी होऊन गेला. शिवाय ही कृती कायमस्वरूपी उपयोगी असून, तिचे व्यवस्थापन आजही ग्रामपंचायतीद्वारे केले जाते. प्रकल्पाच्या कामांच्या गडबडीमध्ये अशा प्रेरक कामांकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचा विपरीत परिणाम लोकसहभागावर होतो.
ग्रामस्थांना, लाभार्थींना प्रशिक्षण
पाणलोट विकास प्रकल्प पूर्ण क्षमतेने राबविण्यासाठी प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा आणि स्थानिक समुदायाकडे असलेली कौशल्ये व ज्ञान यांची माहिती असावी लागते. सद्यःस्थितीतील नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्यासाठी तिचा वापर करताना काही पद्धती बदलाव्या लागतात.
उदा. पीक पद्धती, शेती पद्धती, जनावरे चारण्याच्या पद्धतीमध्ये योग्य ते बदल सुचवावे व राबवावे लागतात. असे नवे व पर्यावरणपूरक बदलांकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी काही उपक्रम राबवता येते.
उदा. शेतकरी दिन, भूमी दिन, यशस्वी प्रकल्पांना सहली इ. लघुउद्योजकता विकासासाठी अळिंबी उत्पादन, मधमाशीपालन, रेशीम उद्योग, पशुपालन, नर्सरी यांसारख्या तुलनेने कमी खर्चिक व सोप्या, पण आर्थिक उत्पन्न सुरू करणाऱ्या बाबींवर भर देता येतो. त्यातून रोजगार निर्माण झाल्यामुळे भूमिहीन, मजूर वर्गालाही आपोआपच एक आर्थिक प्रोत्साहन मिळते.
स्थानिक समुदायातील लोकांमध्ये नेतृत्वाचे गुण व कौशल्य वृद्धी वाढावेत, यासाठी कार्यान्वयन संस्थेने प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांसह विविध घटकांचे स्वयंसेवी गट, संघ तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे. त्यातून एकमेकांसोबत आलेल्या समस्यांवर मार्ग काढण्याची व एकत्र काम करण्याची वृत्ती वाढते. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. लवचिक धोरण आणि मोकळेपणाने निर्णय यातून समुदायाचा विश्वास वाढतो.
अशा समूहांना पाणलोटाची आखणी, ओळख आणि वैशिष्ट्ये, नियोजन इ. बाबींचे प्रशिक्षणही सोपे जाते. त्यात आधुनिक साधनांचा वापर उदा. सुदूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली इ. तंत्रे शिकवता येतात. अशी प्रशिक्षणे व क्षमता बांधणी हा पाणलोट विकास कार्यक्रमांच्या यशाचा गाभा असतो.
स्त्री पुरुष व वर्ग समानता ः
प्रकल्प सुरळीतपणे चालू राहण्यासाठी लोकांचा उस्फूर्त सहभाग महत्त्वाचा ठरतो. प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान स्त्रिया आणि मागासलेल्या घटकांनाही समतेच्या पातळीवर समाविष्ट करण्यावर भर दिला जातो. अगदी पाणलोटाची निवड करतानाही गरीब, महिला आणि समाजातील दुर्बल घटकांच्या विकासाचा उद्देश ठेवला जातो. त्यामुळे सर्व उपक्रमामध्ये महिला, समाजातील दुर्बल घटकांचा जास्तीत जास्त समावेश केला जातो. प्रकल्पांच्या लाभार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश कशा प्रकारे करता येईल, यावर भर दिला जातो. त्यामुळे महिला व दुर्बलांचे गट महत्त्वाचे ठरतात.
आर्थिक व सामाजिक विकास
पाणलोट व्यवस्थापनामध्ये गरिबी कमी करण्यासाठी रोजगार निर्मिती आणि आर्थिक फायदा पोहोचविणाऱ्या उपक्रमांना महत्त्व दिले आहे. त्यासाठी दीर्घकालीन नियोजन करून शाश्वत विकास साधता आला पाहिजे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये गरिबी निर्मूलन हे महत्त्वाचे उद्दिष्ट्य होते. पाणलोट विकास कार्यक्रमांमध्ये सामाजिक विकास अशी वेगळी तरतूद नसली तरी बऱ्याच उपक्रमांचे उद्दिष्ट तेच दिसते.
ग्रामीण सहभागी मूल्यावलोकन ः
ग्रामीण विकासासाठी कार्यरत बिगर शासकीय संस्था व अन्य यंत्रणा सहभागी ग्रामीण मूल्यावलोकनाच्या तंत्राचा वापर करतात. या तंत्रामध्ये स्थानिक लोकांच्या ज्ञानांचा, त्यांचा मतांचा विचार प्रकल्पाच्या नियोजन आणि अंमलबजावणीदरम्यान गरजेनुसार केला जातो. पाणलोट हा भौतिक वैशिष्ट्यांनी दर्शविला जातो. उदा. नालाक्षेत्रांची संख्या, पाण्याचे साठे, जमिनीचे विविध प्रकार, वृक्ष लागवड आणि बागा, विहिरी, कूपनलिका, रस्ते, धार्मिक स्थळे, वसतिस्थाने इ. आधारे स्थळदर्शक नकाशा तयार करता येतो.
यशदातर्फे प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रम ः
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीमध्ये पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) या संस्थेने बहुमोल योगदान दिले.
त्यांनी दोन दिवसाचे परिचय प्रशिक्षण कार्यक्रम विशेषतः ग्रामपंचायत सरपंच, शासकीय व बिगर शासकीय प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण संस्था, स्वयंसेवी संस्था, राज्य संसाधन संस्था, जिल्हा संसाधन संस्था यांच्यासाठी आयोजित केले होते.
पाच दिवसांच्या ग्रामीण सहभागी मूल्यावलोकन या प्रशिक्षणात पाणलोट विकास प्रकल्पातील लोकसहभागाची तंत्रे शिकविण्यात आली होती.
निवडलेल्या गावांच्या सविस्तर प्रकल्प अहवाल निर्मितीसाठी पाच दिवसाचे प्रशिक्षण यशदा स्तरावर दिले गेले.
गरिबीचे निर्मूलन करणे व गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुमारे १९ टक्के निधी राखीव ठेवला जातो. या उपजीविका सक्षमीकरणावर आधारित अनेक कार्यक्रम यशदातर्फे राज्यभर घेतले गेले एकूणच या गोष्टीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
पाणलोट व्यवस्थापनामध्ये प्रथमदर्शनी सर्वेक्षण
पाणलोट व्यवस्थापन हे पाणलोटातील संसाधनांचा शाश्वत विकास, त्या माध्यमातून उत्पादनपद्धती आणि निर्माण केलेल्या साधन संपत्तीची देखभाल व दुरुस्ती या घटकांशी निगडित आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या सुरुवातीलाच सर्वेक्षणातून पाणलोटातील सामाजिक, आर्थिक आणि नैसर्गिक संसाधनांच्या शास्त्रीय आणि व्यवस्थित पद्धतीने विकासासाठी सर्व बाबींची यादी मिळवावी लागते. सर्वेक्षणासाठी प्राथमिक आणि दुय्यम माहिती स्रोतांचा उपयोग करता येतो. अशा प्रकल्पाच्या सुरुवातीला केलेल्या माहिती संकलनाला प्रथमदर्शनी सर्व्हेक्षण म्हणतात.
- डॉ. चंद्रशेखर पवार ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे)
- डॉ. सतीश पाटील ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.