
Pune News: फ्रान्समधील पॅरिसजवळील रुंजीस आंतरराष्ट्रीय बाजाराच्या धर्तीवर महामुंबई आंतराष्ट्रीय बाजार साकारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यात दोन हजार एकर जागेची चाचपणी करण्यात येत आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर ग्लोबल टेंडर काढण्यात येणार आहे. या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय बाजार उभारण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांसह फ्रान्सचा दौरा केला होता. या वेळी त्यांनी रुंजीस आंतरराष्ट्रीय बाजाराला भेट देऊन बाजाराचे संचलन कसे होते याची माहिती घेतली होती. रुंजीस बाजार पॅरिस शहराच्या जवळ आहे. पूर्वी पॅरिस शहरामध्ये २५ एकरांवर मध्यवर्ती बाजार होता. जागी कमी पडू लागल्याने १९६९ मध्ये तो रुंजीस येथे येथे स्थलांतरित करण्यात आला.
तिथे सुमारे ५७० एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय बाजार विकसित करण्यात आला. रुंजीस पेक्षाही मोठा बाजार मुंबईत साकारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. रुंजीस बाजार हा राष्ट्रीय महामार्ग, विमानतळ, बंदरे, रेल्वेमार्ग यांच्या लगत आहे. याच धर्तीवर वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्गालगत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार वसविण्याचे प्रस्तावित आहे.
महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजाराबाबतचे सादरीकरण सोमवारी (ता.१४) मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उच्चाधिकार समितीसमोर करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे,
कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, ‘पदुम’चे सचिव डॉ. रामास्वामी एन, पणनचे सहसचिव विजय लहाने, पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, पणन संचालक विकास रसाळ आदी अधिकारी उपस्थित होते. महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ प्रकल्पात विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभागाची तयारी दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रस्तावित महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार
बी टू बी बाजार.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीनुसार बाजारात फळे, भाजीपाला, मांस, मासे यांची आवक.
मार्केट इंटेलिजन्सचा वापर होणार.
हंगामनिहाय शेतकऱ्यांना पीकपद्धतीचा सल्ला.
थेट शेतावरून कंटनेर पॅक होऊन बाजारात येणार. त्यामुळे काढणीपश्चात नुकसान ३० टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत येणे शक्य.
आंतरराष्ट्रीय कंपनी बाजार संचलन करणार.
कंपनी लॉजिस्टिक आणि शीतसाखळी सेवा देणार.
शेतकऱ्यांच्या बाजारात येण्याची गरज भासणार नाही.
थेट बांधावरच खरेदी-विक्री होणार.
बाजारपेठेच्या गरजेनुसार करार शेतीसाठी शेतकऱ्यांना कंपनी देणार भागभांडवल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.