Flower Farming: बाजारपेठेनुसार झेंडू, गॅलार्डिया लागवड

Zendu, Gaillardia Cultivation: अकोला जिल्ह्यातील पातूर येथील अमोल फुलारी हे झेंडू, गॅलार्डिया आणि गुलाब यांसह विविध फुलांच्या लागवडीत यशस्वी आहेत. बाजारभाव आणि हंगामानुसार त्यांनी काटेकोर नियोजन करून सात एकरांत फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळवले आहे.
Flower Farming
Flower FarmingAgrowon
Published on
Updated on

Farming Tips:

शेतकरी नियोजन । फूलशेती

शेतकरी : अमोल रमेश फुलारी

गाव : पातूर, जि. अकोला

एकूण शेती : ७ एकर

फूलशेती क्षेत्र : चार एकर

अकोला जिल्ह्यात पातूर येथील फुलारी कुटुंब मागील अनेक वर्षांपासून फूलशेती करीत आहे. अमोल रमेश फुलारी हे विविध फुलांची दरवर्षी लागवड करतात. हंगामानुसार फुलांचे बाजारातील दर आणि आवक यांचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन केले जाते. सध्या त्यांच्याकडे चार एकरांत गिलार्डीया, झेंडू, गुलाब अशी वैविध्यपूर्ण फुलझाडांची लागवड आहे.

Flower Farming
Flower Farming : फ्लॉवरचे आंतरपीक ठरतेय फायद्याचे...

सध्या लग्नसराईमुळे बाजारात मागणी आणि दर चांगले असून प्रतिदिन बाजारात विक्रीसाठी फुले पाठविली जात आहेत. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक स्रोत भक्कम झाला आहे. येत्या पंधरवड्यात आणखी तीन एकरांत फूलशेती लागवडीचे त्यांचे नियोजन आहे. वर्षभर फूलशेतीतून खात्रीशीर उत्पन्न मिळविण्यासाठी काटेकोर व्यवस्थापनावर अधिक भर दिला जातो, असे अमोल फुलारी सांगतात.

रात्रीच्या वेळी सिंचन

मागील १५ दिवसांपासून उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. तापमान वाढल्याने फुलपिकांची पाण्याची गरजही वाढली. त्यात पिकांना सिंचन करण्यासाठी केवळ रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध होते. त्यामुळे दररोज रात्री तीन तास ठिबकद्वारे सिंचन केले जात आहे. शिवाय आठवड्यातून दोन वेळा विद्राव्य खतांच्या मात्रा ठिबकमधून देण्यात येत आहेत. रात्रीच्या वेळी सिंचन केल्यामुळे पिकास पुरेसे पाणी उपलब्ध होते. दिवसा उन्हामुळे पाण्याची वाफ होऊन ते पिकास उपलब्ध होण्यास मर्यादा येतात. त्यामुळे रात्रीच्या किमान तापमानात सिंचन केल्यास त्याचा झाडांना फायदा होतो, असे श्री. फुलारी सांगतात.

लग्नसराईमुळे अधिक मागणी

उत्पादित फुलांची विक्री अकोला येथील फूल मार्केटमध्ये केली जाते. दररोज सकाळी टवटवीत ताज्या फुलांचे तोडे करून बाजारात पाठवली जातात. सध्या झेंडू, गिलार्डीया आणि गुलाब फुलांचे दररोज तोडे होत आहेत. सध्या लग्नसराईमुळे फुलांना मागणी चांगली आहे. कडक उन्हाळा असल्याने फुलांची आवक कमी होत असल्याने दर समाधानकारक मिळत असल्याचे श्री. फुलारी सांगतात.

झेंडू लागवड

साधारपणपणे १० एप्रिलला झेंडू रोपांची एक एकरामध्ये पुनर्लागवड करण्यात आली. ही लागवड ४ बाय २ फूट अंतरावर बेडवर केली आहे.

लागवडीसाठी २५ दिवसांची एकरी सुमारे पाच हजार रोपे रोपवाटिकेतून आणली. एक रोप साधारणपणे साडेतीन रुपयांना खरेदी केले.

शेतामध्ये रोप स्थिरावण्यासाठी पुनर्लागवडीनंतर ३ दिवसांनी ह्युमिक ॲसिडची आळवणी करण्यात आली. त्यासोबत विद्राव्य खतांचा ५ ते ६ दिवस वापर करण्यात आला.

लागवडीनंतर १० ते २० दिवसांनी एकरी एक ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत देण्यात आले. तसेच १९:१९:१९ तसेच ० : ५२ : ३४ या खतांच्या मात्रा ड्रीपद्वारे देण्यात आल्या.

रोपांची वाढ झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात आलेल्या कळ्या त्वरित खुडून घेतल्या. त्यामुळे फुटवे जास्त प्रमाणात येण्यास मदत झाली. असे दोन वेळा आलेल्या कळ्या खुडण्यात आल्या.

लागवडीनंतर साधारण ६५ ते ७० दिवसांनी झाडांना आलेल्या कळ्यांची जोपासना करून त्यापासून फुलांचे उत्पादन घेण्यात आले.

Flower Farming
Flower Farming : आयुष्यात फुलला आनंदाचा बहर

मागील कामकाज

मागील काही दिवसांत तापमान चांगलेच वाढले होते. या काळात वाफसा जमिनीत स्थिती कायम राखण्यावर भर देण्यात आला. सिंचनासाठी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध होत असल्याने दररोज रात्री दोन ते अडीच तास ठिबक संच सुरू ठेवला जात होता.

आंतरमशागत करून घेण्यात आली.

रासायनिक खतांमध्ये १० : २६ : २६ तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा देण्यात आल्या. शिवाय गांडूळखताचा वापर केला आहे.

झेंडू लागवडीमध्ये नागअळी आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी दिसून येत होता. त्यासाठी निंबोळी अर्क आणि रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घेऊन नियंत्रण केले.

काढणी, उत्पादन

सध्या या लागवडीमधून फुलांचे उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली आहे. एक एकरांतील लागवडीमध्ये टप्प्याटप्प्याने तोडे घेण्यात येत आहेत. जेणेकरून दररोज एका प्लॉटमधील फुले तोडणीस येतील. असे एका प्लॉटमध्ये दर ४ दिवसांनी तोडे होतात. सध्या प्रतिदिन साधारण ८० ते १०० किलो झेंडू फुलांचे उत्पादन मिळते आहे. सध्या लग्नसराईमुळे बाजारात फुलांना चांगली मागणी असून दरही टिकून आहेत. या लागवडीतील उत्पादन साधारणपणे गणपतीपर्यंत मिळेल. आगामी काळात नव्याने आणखी एक एकरात झेंडू लागवडीचे नियोजन आहे.

गॅलार्डिया लागवड

एक एकरांत गिलार्डीया फुलांच्या लागवडीचे नियोजन होते. त्यानुसार पूर्वतयारी करून एकरी २ ट्रॉली याप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत शेतामध्ये पसरून घेतले.

त्यानंतर ३ बाय २ फूट अंतरावर रोपांची लागवड करण्यात आली आहे.

लागवडीसाठी एकरी सुमारे ४ हजार रोपे घरीच तयार करण्यात आली. त्यामुळे रोपवाटिकेतून रोप खरेदीवरील खर्चामध्ये बचत झाली आहे.

लागवडीसाठी साधारण दीड महिना पूर्ण झालेली रोपे निवडण्यात आली.

रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर ठिबकद्वारे सिंचन करण्यात आले.

पांढरी मुळीच्या वाढीसाठी ह्युमिक ॲसिड दर दोन ते तीन दिवसांनी ४ दिवसांच्या अंतराने देण्यात आले. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ उत्तम होण्यास मदत झाली.

लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी नियमितपणे १०:२६ :२६, १२:६१:० आणि १३:४०:१३ या खतांच्या मात्रा देण्यात आल्या.

गिलार्डीया पिकामध्ये मुख्यतः मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारण्या घेण्यात आल्या आहेत.

सध्या गिलार्डीया लागवडीमधून दररोज फुलांचे तोडे सुरू झाले आहेत. गिलार्डीया लागवडीच्या प्लॉटची विभागणी करून तोडे करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रतिदिन फुलांची तोडे घेणे शक्य होत आहे. साधारण १५० ते २०० किलो फुलांचे उत्पादन प्रति तोड्यास मिळते आहे, असे अमोल फुलारी यांनी सांगितले.

- अमोल फुलारी, ७०६६३९७२२७

(गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com