
Agriculture Success Story : चिपरी हे कोरडवाहू पट्ट्यातील गाव. या गावशिवारात भाऊसो पाटील यांची तीन एकर शेती वडिलोपार्जित आहे. सुरुवातीच्या काळात त्यांचे वडील ऊस आणि ज्वारी लागवड करत होते. भाऊसो यांनी २००० पासून शेती व्यवस्थापनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. बाजारपेठेच्या मागणीनुसार पीक लागवडीत बदल केला. एकाचवेळी तीन एकरांवर एकच पीक न घेता दीड एकराचे दोन भाग करून वर्षभर हंगामानुसार विविध पिकांच्या लागवडीस सुरुवात केली. दरमहा हाती पैसा येत राहिल या पद्धतीने भाजीपाला लागवडीचे नियोजन केले. विहीर असल्याने पिकाच्या गरजेनुसार ठिबक आणि पाटपाण्याचे नियोजन केले आहे.
उसामध्ये फ्लॉवरचे आंतरपीक
गेल्या पंचवीस वर्षांपासून पाटील लावण उसात फ्लॉवरचे आंतरपीक घेतात. यादृष्टीने त्यांनी ऊस लागवडीचे नियोजन केले आहे. दरवर्षी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन फ्लॉवरच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची निवड केली जाते. प्रत्येक वर्षी नवीन जात निवडली जाते. कृषी सेवा केंद्र, रोपवाटिका चालकांशी त्यांचा सातत्याने संपर्क असतो. खरिपातील भाजीपाला संपल्यानंतर शेत तयार करून नोव्हेंबरमध्ये चार फूट सरीत उसाची लावण केली जाते. त्यानंतर पंधरा दिवसांनी बोदावर फ्लॉवर रोपांची लागवड केली जाते.
उसाला दर १५ दिवसांनी पाटाने आणि फ्लॉवर रोपांना दर दोन ते तीन दिवसांनी ठिबकने पाणी दिले जाते. ऊस भरणीला येईपर्यंत फ्लॉवरची काढणी पूर्ण व्हावी या बेताने व्यवस्थापन केले जाते. उसाला भरणीपूर्वी माती परीक्षण अहवालानुसार डीएपी, १०ः२६ः२६, युरिया ही खत मात्रा दिली जाते. फ्लॉवर पिकाला ठिबकमधून विद्राव्य खते दिली जातात. फुलकळी येण्याच्या कालावधीत ०ः५२ः३४ हे खत दिले जाते. याशिवाय हवामानानुसार शिफारशीत रासायनिक आणि जैविक कीडनाशकांची फवारणी केली जाते.
नोव्हेंबरमध्ये लागवड केलेल्या फ्लॉवरचे उत्पादन लागवडीनंतर ६० दिवसांनी सुरू होते. पहिले काही दिवस एक दिवसाआड आणि उत्तरार्धात दररोज फ्लॉवरची काढणी होते. काही व्यापारी जागेवर येऊन गड्यांवर खरेदी करतात. एका पोत्यामध्ये १२ ते १३ गड्डे बसतात. दररोज ३० पोती फ्लॉवर बाजारपेठेत पाठवले जातात. पंधरा ते वीस दिवसांत संपूर्ण काढणी पूर्ण होते. जयसिंगपूर बाजारपेठेत सौद्याने फ्लॉवरची विक्री केली जाते. साधारणतः एकरी सहाशे पोती फ्लॉवरचे उत्पादन मिळते. सरासरी एका गड्ड्याला दहा ते १३ रुपये दर मिळतो. फ्लॉवर पिकातून सरासरी तीस ते पस्तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
फ्लॉवर पीक पूर्ण काढल्यानंतर उसाची मोठी भरणी केली जाते. ऊस भरणी करताना फ्लॉवरची पाने जमिनीत गाडली जातात. यामुळे हिरवळीचे खत म्हणून पानांचा उपयोग होतो. उसाची लागवड ते तोडणीपर्यंत तीन ते चार वेळा भांगलण केली जाते.
खरिपात भाजीपाला नियोजन
पावसाळा सुरू झाल्यानंतर दर आणि वातावरण पाहून भाजीपाला लागवडीचे नियोजन केले जाते. टोमॅटो, मिरची, बिन्स, काकडी, दुधी भोपळा, दोडका आदी भाजीपाला लागवड केली जाते. हा भाजीपाला पेठ वडगाव, कोल्हापूर, जयसिंगपूर आदि बाजारपेठेत विक्रीस जातो. आक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत भाजीपाला विक्री सुरू राहते. भाजीपाला काढणीनंतर पुन्हा ऊस लावण केली जाते. त्यामध्ये फ्लॉवरचे आंतरपीक घेतले जाते. मदतीला गरजेनुसार चार ते पाच मजूर घेतले जातात.
जमीन सुपीकतेला प्राधान्य
उसाची तोडणी झाल्यानंतर खोडवा ठेवला जातो. खोडव्यात चाऱ्यासाठी मका लागवड केली जाते. साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत खोडव्याची तोडणी होते. खोडवा तुटल्यानंतर शेत नांगरुन घेतले जाते. नांगरल्यानंतर पावसाळ्यापर्यंत शेताला पूर्ण विश्रांती दिली जाते. सुमारे दोन ते तीन महिन्यापर्यंत विश्रांती मिळाल्याने जमिनीचा कसदारपणा कायम रहात असल्याचा त्यांचा अनुभव आहे. जमिनीची सुपीकता कायम राहावी यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. जमिनीच्या विश्रांतीबरोबरच दोन ते तीन वर्षांतून एकदा माती परीक्षण केले जाते. यानुसार खताच्या व्यवस्थापनात बदल केला जातो.
भाजीपाला, पशुपालनातून आर्थिक नियोजन
तीन एकर शेतीचे कल्पकतेने दोन भाग करून पाटील यांनी वर्षभर ठराविक काळात भाजीपाला पिकातून मिळकत होत राहील असे नियोजन केले आहे. आई विमल आणि पत्नी स्मिता यांच्या साथीने त्यांनी शेतीचे व्यवस्थापन सांभाळले आहे. फ्लॉवर विक्रीतून तीन महिन्यांत तीस ते पस्तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. ही रक्कम ऊस पिकाच्या वर्षभर व्यवस्थापनासाठी उपयोगी पडते. लावण उसाचे एकरी ६० टन आणि खोडव्याचे ५० टन उत्पादन मिळते. याशिवाय खरीपात विविध भाजीपाल्याचे उत्पन्न मिळते. केवळ तीन एकर शेती असूनही पीक विविधता साधत त्यांनी शेती किफायतशीर केली केली.
पाटील यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. सध्या त्यांच्या गोठ्यात तीन गाई आणि एक म्हैस आहे. दररोज पंधरा लिटर दूध डेअरीला दिले जाते. पशुपालनाचे नियोजन पाटील यांच्या पत्नी स्मिता यांच्याकडे आहे. पशूपालनातूनही पाटील कुटुंबाला अर्थप्राप्ती होते. वेळ आणि जमीन वाया घालवायचा नाही या उद्देशाने पाटील कुटुंबीय वर्षभर विविध भाजीपाल्यांची लागवड करतात. यामुळे ऊस पिकातून वर्षाला येणाऱ्या रकमेऐवजी भाजीपाला विक्रीतून ठरावीक दिवसाला रक्कम हाती पडत गेल्याने किरकोळ खर्चासाठीची तरतूद शेतीतून झाली आहे.
संपर्क : भाऊसो पाटील, ७७०९६१०९७०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.