Ornamental Plant Farming : फुलांचे गुच्छ सजवणारी 'मधुकामिनी' शेतीचा यशस्वी प्रयोग

Filler Plant For Floral Decoration : फुलांचे गुच्छ व सजावटीमध्ये उपयोगात येणाऱ्या मधुकामिनी या अन्य ठिकाणी फारशा न दिसणाऱ्या फिलर वनस्पतीची शेती त्यांनी यशस्वी केली आहे. वर्षातून तीन वेळा छाटणी करून व उत्पादन घेऊन मुंबई येथे बाजारपेठ तयार केली आहे.
Filler Plant Farming
Ornamental Plant Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील सोरतापवाडी हे गाव फुलशेती व त्यांच्या नर्सरींसाठी प्रसिद्ध आहे. याच गावात नंदकुमार चौधरी यांचे कुटुंब राहते. या गावापासून सुमारे सहा किलोमीटरवरील तरडे येथे त्यांची सात एकर वडिलोपार्जित शेती आहे. वडील खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार आपले मोठे बंधू बंडू यांच्यासह पूर्णवेळ शेती करतात. डोंगरालगत असलेला हा शेतजमिनीचा परिसर संपूर्णपणे खडकाळ आहे.

अशा क्षेत्रात या कुटुंबाने पारंपरिक पिकांपेक्षा वेगळ्या पिकांचा व त्यातही फुलपिकांचा पर्याय सुमारे वीस वर्षांपूर्वी शोधला. त्या वेळी लिली या फुलाची सुमारे पाच एकरांवर लागवड होती. पुणे- गुलटेकडी मार्केटला त्याची विक्री व्हायची. पुढे मिळणारे अत्यंत कमी दर व खर्च यांचे गणित परवडेनासे झाले. मग या पिकाची शेती थांबवावी लागली.

त्यानंतर फुलशेतीतील संबंधित विविध पिकांचा शोध घेताना तो मधुकामिनी या फिलर वनस्पतीपर्यंत येऊन थांबला. या फिलरला फुलांच्या गुच्छामध्ये (बुके) तसेच विविध सण-समारंभामध्ये सजावटीसाठी मागणी चांगली आहे. मात्र त्याची बाजारपेठेत आवक अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले. मग अधिक अभ्यासांती या पिकाची निवड केली. आता गेली अनेक वर्षे या पिकात सातत्य ठेवले असून, त्यातून शेतीचे अर्थकारण उंचावत ठेवले आहे.

Filler Plant Farming
Floriculture Technology : पावसाच्या प्रदेशात यशस्वी पॉलिहाउसमधील जरबेरा

पीक व्यवस्थापनातील काही मुद्दे

पुणे- मांजरी येथील खासगी नर्सरीतून प्रति रोप नऊ रुपयाला खरेदी करून वीस गुंठे क्षेत्रावर पाच बाय चार फूट अंतरावर लागवड केली. त्यामुळे रोपाची वाढ जोमदार होण्यास मदत झाली. व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केल्याने हे पीक चांगले उत्पादन देत गेले. बाजारपेठेचाही आवाका आला.

पुढे मग अनुभवातून टप्प्याटप्प्याने मधुकामिनीच्या क्षेत्रात वाढ करीत आजमितीला सुमारे पाच एकरांपर्यंत त्याचे क्षेत्र नेले आहे. पाण्यासाठी चार विहिरी आहेत. तसेच पाइपलाइनद्वारेही शेताच्या बांधापर्यंत पाणी आणले आहे.

ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यात येते. खडकाळ जमीन असल्याने जास्तीचा पाऊस झाला तरी पाणी शेतात वा मुळांजवळ साठून राहत नाही. पाण्याचा निचरा होतो. त्याचा पिकाला फायदा होतो. फुलांच्या गुणवत्तेसाठी अन्य खतांबरोबर कोंबडीखताचा प्रामुख्याने वापर होतो.

छाटणीचे तंत्र व उत्पादन

या पिकाच्या वर्षभरात एकूण तीन छाटण्या केल्या जातात. छाटणी केलेल्या सर्व काड्या एकत्र गोळा करून सावलीत ठेवल्या जातात. बारा काड्यांची गड्डी तयार करून दोरीच्या साह्याने बांधली जाते. प्रत्येक छाटणी टप्प्यात एकरी ३५ ते ३७ हजार गड्ड्यांचे उत्पादन होते. अशा रीतीने वर्षभरात किमान एक लाखापर्यंत गड्ड्यांचे उत्पन्न मिळते.

सुमारे दीडशे गड्ड्यांचा डाग तयार केला जातो. पोत्यांच्या गोण्यांमधून मुंबई येथील बाजारपेठेत रात्रीच्या वेळी हे डाग रवाना केले जातात. पुण्याच्या तुलनेत मुंबई मार्केट या फिलरसाठी चांगले आहे. सध्या प्रति गड्डी १५ रुपये दर मिळत आहे. काही वेळा तो २५ रुपये मिळतो.

तर ५ ते १० रुपयांपर्यंत देखील खाली घसरतो. वर्षभरात सुमारे सव्वा ते दीड लाख रुपयापर्यंत खर्च येतो. खर्च वजा जाता ४० ते ५० टक्क्यांपर्यंतचा नफा मिळतो. कुटुंबाने या फिलरची रोपेही तयार करण्यास सुरुवात केली असून, त्यापासून अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. मागील वर्षी एक लाख रोपांची विक्री झाली.

Filler Plant Farming
Floriculture : ग्लॅडिओलस लागवडीचे तंत्र

नोकरीपेक्षा शेती देतेय समाधान

नंदकुमार यांनी रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली आहे. त्यांनी सुरुवातीला नजीकच्या साखर कारखान्यात काही वर्षे नोकरी केली. परंतु तेथे मनासारखा पगार मिळत नव्हता. अखेर नोकरीचा राजीनामा देऊन ते बंधूंसोबत शेतीतच काम करू लागले. आज शेतीतच उत्पन्नाचे विविध स्रोत त्यांनी तयार केले आहेत.

नंदकुमार सांगतात, की शेतीतील बहुतांश कामे वडील आणि आम्ही दोघे बंधूच करतो. अगदी गरजेवेळीच मजुरांची मदत घेतली जाते. पॉलिहाउसमध्ये फुलशेती सुरू आहेच. शिवाय पंधरा हजार ब्रॉयलर पक्ष्यांची पोल्ट्री आहे. एका कंपनीसोबत करार शेती केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र पोल्ट्री संघाचे नंदकुमार उपाध्यक्ष देखील आहेत.

ते सांगतात की आमच्या सरतोपवाडीतही सर्व नर्सरीधारकांचा एकमेकांशी चांगला समन्वय आहे. आमच्या भागात कोणी ग्राहक आला व एखाद्याकडे मागणी केलेला घटक नसेल तर त्या ग्राहकाला आम्ही माघारी पाठवत नाही. दूरध्वनी करून संबंधित ग्राहकाला आमच्याच अन्य व्यावसायिक बंधूंकडे पाठवतो. त्यातूनच उद्योगाला चालना मिळते.

फिलरला असलेली मागणी

नंदकुमार सांगतात, की मधुकामिनी फिलरला फुलांच्या बुकेमध्ये तसेच लग्न समारंभ, वाढदिवस आदींमध्ये तसेच वाहनांच्या सजावटीसाठी मोठी मागणी असते. याची पाने मोठी, हिरवी गडद असून त्यांना चकाकी असते. त्यामुळे ‘ग्रीन पॅसेज’ म्हणून ती शोभेत चांगली भर घालतात.

बुके किंवा सजावटीवेळी पाण्याचा शिडकावा होत असल्याने या फिलरची पाने तीन-चार दिवस टवटवीत राहू शकतात. अलीकडे प्लॅस्टिकची फुले बाजारात आली असली, तरी मधुकामिनीच्या या फुलांनाच अधिक मागणी असल्याचे नंदकुमार सांगतात.

चांगल्या प्रकारे व्यवस्थापन ठेवल्यास हे झाड सुमारे १५ ते २० वर्षे चांगले उत्पादन देऊ शकते. या वनस्पतीला लहान, सुगंधित, पांढरी फुले येतात. ती मधमाश्यांना आकर्षित करतात. येत्या काळात मधपेट्या ठेवण्याचा विचार आहे.

नंदकुमार चौधरी ९६२३११५६७७, बंडू चौधरी ९०११२३९३११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com