
Silkworm Farming Tips: रेशीम अळीवर ग्रासेरी, फ्लॅचेरी, मस्कार्डीन आणि पेब्रिन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे रेशीम कोषाची दर्जा खालावतो. रेशीम कीटकांमध्ये मरतुक येते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान संभवते. त्यासाठी रेशीम कीटकांवर येणाऱ्या फ्लॅचेरी, पेब्रिन रोगांच्या प्रादुर्भावाची लक्षणे जाणून वेळीच उपाय करणे आवश्यक आहे.
फ्लॅचेरी
प्रादुर्भाव वर्षभर आढळतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात रोगाची तीव्रता जास्त प्रमाणात दिसून येते.
प्रादुर्भावाची कारणे
खराब तुतीची पानांचे सेवन.
निरोगी अळ्या मृत किंवा रोगग्रस्त रेशीम अळ्यांच्या संपर्कात आल्याने
रोगग्रस्त रेशीम अळ्यांच्या विष्ठा, रस, शरीरातून स्रवणाऱ्या दूषित द्रवाच्या संपर्कात आल्याने या रोगाचा संसर्ग होऊ शकतो.
रेशीम अळीला जखम, इजा झालेली असेल तरीही या रोगाचा संसर्ग होऊ शकतो.
पोषक घटक
उच्च तापमान, कमी आर्द्रता किंवा तापमानातील चढ-उतार, खराब दर्जाची तुतीची पानांचे सेवन.
लक्षणे
रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यावर रोगाची लक्षणे स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे रोगाची ओळख पटविणे कठीण जाते.
रोगग्रस्त अळ्या मऊ आणि लवचिक बनतात.
रोगग्रस्त अळ्यांची वाढ मंदावते, अळ्या निष्क्रिय होतात.
रोगग्रस्त अळ्यांची विष्ठा मऊ होते, त्यात आर्द्रता अधिक असते. काहीवेळा साखळी सारखी विष्ठा दिसून येते. अनेकदा गुदाशय बाहेर पडलेले दिसते.
व्यवस्थापन
संगोपन उपकरणे, रेशीम कीटक संगोपनगृह आणि सभोवतालच्या परिसराचे दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे.
मागील बॅचवेळी फ्लॅचेरी रोगाचा प्रादुर्भाव अधिक असेल, तर ०.३ टक्के विरवलेल्या चुन्याच्या द्रावणाने अतिरिक्त निर्जंतुकीकरण करण्याची देखील शिफारस केली जाते.
रोगग्रस्त अळ्या शक्य तितक्या लवकर गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावून नष्ट कराव्यात.
प्रमाणित केलेल्या शिफारशीनुसार अंकुश किंवा विजेता पावडरची धुरळणी करावी.
रेशीम अळ्यांना पुरेशा प्रमाणात चांगल्या प्रतीची तुती पाने खाद्य म्हणून द्यावीत. जास्त परिपक्व किंवा साठवलेली किंवा मातीने भरलेली पाने खायला देऊ नये.
रेशीम अळ्यांना योग्य वातावरण व अंतर देणे गरजेचे आहे.
पेब्रिन
प्रादुर्भावाची कारणे
खराब तुतीची पाने रेशीम कीटकांना खायला देणे.
संक्रमित मातेच्या पतंगापासून ते गर्भापर्यंत.
अंडी उबवण्याच्या वेळी दूषित पृष्ठभागापासून.
रोगट अळ्या, त्यांची विष्ठा, उलट्या, दूषित पेपर, दूषित ट्रे, दूषित अंड्याचा पृष्ठभाग आदी संसर्गाचे मुख्य स्रोत आहेत.
लक्षणे
रोगग्रस्त अळ्यांची वाढ खुंटते.
मोल्टिंगला विलंब होतो आणि कालावधी वाढतो.
संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अळ्या सामान्य दिसतात. परंतु नंतर त्यांची भूक कमी होऊन त्या निष्क्रिय होतात.
रेशीम अळ्यांचा रंग तपकिरी होतो.
संगोपन बेडमधील अळ्यांचा आकार मोठ्या प्रमाणात बदलतो.
संसर्ग वाढल्यास अळ्या उलट्या करतात. गुदद्वाराद्वारे स्राव बाहेर पडतो.
मृत्यूनंतर बॅक्टेरियाचे आक्रमणामुळे रेशीम अळ्या काळ्या होतात. त्यांची सूक्ष्मदर्शकाद्वारे तपासणी केल्यास अळ्यांमध्ये चमकदार अंडाकृती बीजाणू दिसून येतात.
रोग व्यवस्थापन
संगोपनगृह, उपकरणे व संगोपनगृहाचा सभोवतालचा परिसराचे निर्जंतुकीकरण द्रावणाने दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे.
नोंदणीकृत चॉकी सेंटरमधून चॉकी खरेदी करावी.
तुती बागेचे नियमित निरिक्षण करावे. बागेत किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच वेळीच व्यवस्थापन करावे.
रेशीम अळ्यांचे संगोपन करताना तसेच चॉकी सेंटरमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे.
शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार आणि प्रमाणानुसार अंकुश किंवा विजेता यांचा वापर करावा.
अमृत पावडरचा वापर
फ्लचेरी आणि ग्रासेरी रोगाच्या नियंत्रणासाठी अमृत पावडरयुक्त द्रावणाची पानांवर फवारणी करून अशी पाने रेशीम कीटकांना खायला दिली जातात. त्यासाठी प्रति लिटर पाण्यात २० ग्रॅम अमृत पावडर मिसळून द्रावण तयार करावे. साधारणपणे एक किलो तुती पानांसाठी ७० मिलि अमृत द्रावण या प्रमाणे तुती पानांवर फवारणी करावी. फवारणीनंतर ५ मिनिटांनी रेशीम अळ्यांना ही तुती पाने खायला द्यावीत.
वेळापत्रक अमृत पावडरचे प्रमाण (ग्रॅम) पाण्याचे प्रमाण (मिलि) तुतीच्या पानांचे किंवा फांद्यांचे प्रमाण (किलो)
दुसऱ्या मोल्टनंतर दुसऱ्यांदा खायला देताना ७ ३५० ५
तिसऱ्या मोल्टनंतर दुसऱ्यांदा खायला देताना ५३ २६५० ३८
चौथ्या मोल्टनंतर दुसऱ्यांदा खायला देताना ९० ४५०० ६७
एकूण १५० ७५०० ११०
- अशोक जाधव, ९०७५०८८७५५
(शास्त्रज्ञ-क, संशोधन विस्तार केंद्र, केंद्रीय रेशम बोर्ड, वस्त्र मंत्रालय,भारत सरकार, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.