Sapota Processing : चिकूपासून स्क्वॅश,जॅम,बर्फी

Food Processing : पिकलेल्या चिकू फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात. चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, जेली, स्क्वॅश, स्लाईस, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात.
Sapota
SapotaAgrowon
Published on
Updated on

Sapota Processing Products : चिकू फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत असल्याने त्यांच्यामध्ये जैवरासायनिक क्रिया अतिशय जलद घडून येतात. फळ लगेच पक्व होऊन अल्पायुषी बनते. पिकलेले फळ गोड आणि चवदार असते.  चिकू गोड, थंड भरपूर औषधी गुणांनी भरलेले चविष्ट फळ आहे.

चिकू खाल्ल्याने शरीरात विशेष प्रकारचा उत्साह, चैतन्य निर्माण होते. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. चिकूचा रस रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण करतो. चिकूची साल तापनाशक आहे. चिकूच्या सालीमध्ये टॅनिन असते.

  • चिकूमध्ये अधिक मात्रेत प्रतिऑॅक्सिडीकारके असून त्यात क जीवनसत्त्व आणि पोटॅशियम भरपूर असते. आतड्यांसाठी चिकूचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरते.

  • पिष्टमय पदार्थ तसेच पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त असलेल्या तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असते.

  • हे फळ खाण्यास पौष्टिक व उत्साहवर्धक असून साखरेचे प्रमाण १२ ते १४ टक्के असते. यामध्ये प्रामुख्याने ग्लुकोज व फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते. सुक्रोजचे प्रमाण फक्त दोन टक्के असते.

  • चिकूमध्ये ''सॅपोनिज'' हे अल्कलॉइड असते. चिकूमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, ५.२ ते ७.५ मिलिग्रॅम तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्त्व क असते.

  • पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात. चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, जेली, स्क्वॅश, स्लाईस, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. अपरिपक्व फळ व सालीपासून जो दुधाळ चीक निघतो. त्याच्यापासून च्युइंगम तयार करतात. 

Sapota
Jaggery Food Processing : फ्रूटपल्प, चॉकलेटरूपी नावीन्यपूर्ण गूळ

रस

  • रस तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. साल काढावी. बिया काढून टाकाव्यात. फोडी कराव्यात. चिकूच्या फोडींचा ज्यूसरमध्ये लगदा करून, ०.२ टक्के पेक्टीनेज एन्झाइम टाकून २ तास ठेवून लगदा मलमलच्या कापडातून गाळून तयार झालेला रस बाटलीमध्ये पॅक करावे. या रसाचा वापर चिकूची विविध पेये बनवण्यासाठी करतात.

  • चिकूच्या रसात साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून सरबत तयार करता येते. १५ मिनिटे गरम करून, रसाच्या शिफारशीत प्रमाणात सोडियम बेन्झोएट मिसळून, निर्जंतूक केलेल्या बाटलीत भरून, हवाबंद करून साठवता येतो.

स्क्वॅश

  • पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. स्टेनलेस स्टीलच्या चाकूच्या साह्याने चिकूची साल काढून घ्यावी. चिकूचे दोन भाग करून त्यातील मधला पांढरा भाग व बिया काढून घ्याव्यात. चाकूच्या साह्याने चिकूच्या फोडी कराव्या. चिकूच्या फोडी मिक्‍सरमध्ये टाकून चांगला लगदा तयार करावा. हा लगदा जाडसर कापडात बांधून घेऊन त्यातला रस काढून घ्यावा.

  • १ किलो चिकू लगदा, १ किलो साखर, १ लिटर पाणी व ३५ ग्रॅम सायट्रिक आम्ल हे सर्व घटक एकत्र करून त्यांचे चांगले घोटून मिश्रण तयार करावे.

  • हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. तयार झालेल्या मिश्रणात पोटॅशियम मेटाबायसल्फेट ६०० मिलिग्रॅम प्रति किलो किंवा सोडियम बेंझोएट ७१० मिलिग्रॅम प्रति किलो प्रमाणात मिसळावे किंवा तयार स्क्वॅश ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत २० ते २५ मिनिटे गरम करून साठवावा. तयार स्क्वॅश भरलेल्या बाटल्या साध्या पाण्याखाली धरून थंड कराव्यात. बाटल्यांमध्ये साठविलेला स्क्वॅश थंड कोरड्या जागेत ठेवावा. स्क्वॅश ६ महिन्यांहून अधिक काळ टिकतो.

Sapota
Guava Processing : पेरू पासून कोणते पदार्थ तयार होतात?

कॅण्डी

  • कॅण्डी बनविण्यासाठी फोडी साखरेच्या पाकात काही दिवस ठेवाव्यात. मग बाहेर काढून वाळवल्यास कॅण्डी तयार होते. ड्रायफ्रूट म्हणून चिकू कॅन्डीचा वापर करता येतो. प्रथम चिकू कॅण्डी बनविण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवून त्याची साल काढावी. नंतर बिया काढून टाकून त्याच्या फोडी कराव्यात. फोडीचे ३ ते ४ सेंटीमीटर लांबीचे तुकडे पाडावेत. तुकडे ५० टक्के साखरेच्या पाकात टाकावेत. तसेच त्यामध्ये ४ टक्के सायट्रिक आम्ल मिसळावे. हे मिश्रण १२ ते १४ तास मुरवण्यासाठी ठेवावे.

  • दुसऱ्या दिवशी चिकू फोडी ६० टक्के साखरेच्या पाकात मिसळून परत १६ तास ठेवाव्यात. अशाच प्रकारे शेवटी ७० टक्के साखरेच्या पाकात चिकू फोडी मिसळून त्या २ ते ३ दिवस तसेच ठेवाव्यात. ३ दिवसांनंतर चिकू फोडी साखरेच्या पाकातून काढून चांगले निथळून घ्याव्यात. सावलीत पंख्याखाली २५ ते ३० तास सुकवाव्यात. नंतर सुकलेल्या कॅण्डीवर बारीक केलेली साखर टाकावी. स्वच्छ काचेच्या बरणीत कॅण्डी भरून सिलबंद करावी.

चिप्स

  • पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. स्टेनलेस स्टीलच्या चाकूच्या साह्याने चिकूची साल काढून घ्यावी. चिकूचे दोन भाग करून त्यातील मधला पांढरा भाग व बिया काढून घ्याव्यात. त्यानंतर चिकूचे २ ते ४ सेंमी पातळ काप करावेत.

  • हे काप सोलर ड्रायर (वाळवणी यंत्रामध्ये) ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानास ८ ते १२ तास वाळवावे. कडकडीत वाळवलेले चिकू चिप्स हवाबंद डब्यात भरून ठेवावे.

लाडू

  • पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. स्टेनलेस स्टीलच्या चाकूच्या साह्याने चिकूची साल काढून घ्यावी. चिकूचे दोन भाग करून त्यातील मधला पांढरा भाग व बिया काढून घ्याव्यात. चिकूच्या फोडी करून वाळवून घ्यावेत. त्यानंतर ग्राइंडरच्या साह्याने वाळलेल्या फोडींची चिकू पावडर करावी. चिकू लाडू तयार करण्यासाठी प्रथम २५० ग्रॅम रवा हा ३०० ग्रॅम तुपात भाजून घ्यावा.

  • २०० ग्रॅम सुके खोबरे किसून, भाजून व वाटून घ्यावे. नंतर एका भांड्यात भाजलेला रवा, भाजलेला खोबरे कीस, ४५० ग्रॅम चिकू पावडर, ९०० ग्रॅम साखर, १५ ग्रॅम वेलदोडा पावडर, १५ ग्रॅम चारोळी, ३५ ग्रॅम बेदाणे इतर सर्व साहित्य एकत्र करावे. उरलेले तूप तापवून त्यात मिसळावे. आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे लाडू बनवून घ्यावेत. हे लाडू पौष्टिक असतात.

Sapota
Agriculture Processing : केळी चिप्स, हळद पावडरीचा ‘जटाशंकर’ ब्रॅण्ड

चटणी

  • पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. स्टेनलेस स्टीलच्या चाकूच्या साह्याने चिकूची साल काढून घ्यावी. चिकूचे दोन भाग करून त्यातील मधला पांढरा भाग व बिया काढून घ्याव्यात. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करावेत.

  • ३५० ग्रॅम चिकूचे बारीक तुकडे करून त्यामध्ये १० ग्रॅम मीठ, १० ग्रॅम जिरेपूड , ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ७ ते ८ लसूण पाकळ्या, २५ ग्रॅम कोथिंबीर व ३५ ग्रॅम चिंच हे सर्व साहित्य एकत्र मिसळून मिक्‍सरमध्ये चटणी वाटून घ्यावी. त्यानंतर तयार झालेल्या चटणीचा आस्वाद घ्यावा.

खोबरा बर्फी

  • चिकूपासून रस काढून झाल्यानंतर राहिलेल्या लगद्यापासून चिकू बर्फी हा पदार्थ तयार करता येतो. एक भांड्यात १०० ग्रॅम तूप घेऊन त्यात नारळ ३५० ग्रॅम चांगला भाजून घ्यावा. नंतर त्यात १ किलो साखर, ७० मिलि साईचे दूध आणि ६५० ग्रॅम चिकूचा लगदा मिसळून ते मिश्रण चांगले मिसळून शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ७० अंश आल्यावर त्यामध्ये ३ ग्रॅम मीठ आणि ४ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे. मिश्रणाचा ब्रिक्स ८२ ते अंश येईपर्यंत मिश्रण शेगडीवरती गरम करावे.

जॅम

  • पिकलेल्या चिकूच्या गरापासून चांगल्या प्रतीचा जॅम तयार करता येतो. याकरिता पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवून त्याची साल काढावी. नंतर बिया काढून फोडी कराव्यात. फोडी मिक्‍सरमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा. प्रथम चिकूचा गर १ किलो, साखर १ किलो व सायट्रिक आम्ल २ ग्रॅम हे घटक पदार्थ वापरावेत. सर्व घटक पदार्थ एकत्र मिसळून मिश्रण ठराविक घट्टपणा (६८.५ डिग्री ब्रिक्‍स) येईपर्यंत मिश्रण शिजवावे.

  • शिजवताना मिश्रण पळीने सारखे ढवळत राहावे. शिजलेले मिश्रण (जॅम) गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत भरावे.त्यानंतर पॅरिफिन वॅक्सने सील करावे. बाटल्या थंड व कोरड्या वातावरणात साठवाव्यात. चांगली पक्व फळे घेऊनही जॅम घट्ट झाला नाही तर त्यात थोडी पेक्‍टिनची पावडर टाकावी.

पावडर

  • चिकू पावडरीपासून मिल्कशेक, आइस्क्रीम तयार करतात. कडकडीत वाळवलेले चिकूच्या फोडी घ्यावेत. त्यानंतर ग्राइंडरच्या साह्याने वाळलेल्या फोडींची भुकटी करावी. ही भुकटी १ मिमी छिद्राच्या स्टीलच्या चाळणीतून चाळून २५० गेजच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सीलबंद करून साठवून ठेवावी.

  • पावडरीपासून पेय तयार करता येते. त्यासाठी चिकूची भुकटी दुधामध्ये मिसळून ढवळावी. त्यानंतर त्यामध्ये साखर मिसळून चिकू मिल्कशेक तयार करावा.

  • मिश्रण घट्ट झाल्यावर तूप लावलेल्या ट्रेमध्ये तो लगदा एक सेंमी थर येईपर्यंत पसरावा. चांगले थापून थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर सुरीने योग्य आकारमानाचे त्याच्या वड्या पाडाव्यात. त्यानंतर तयार झालेली चिकू खोबरा बर्फी पंख्याच्या वाऱ्याखाली सुकवून प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून पिशवीत पॅक करून साठवावी. चिकू खोबरा बर्फी चिकूच्या नैसर्गिक रंगामुळे चांगली दिसते,चविष्ट लागते.

- कृष्णा काळे, ८८०५९६८५३६ (अन्नप्रक्रिया तज्ञ आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com