
Maharashtra Government : कर्नाटकमधील अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याला महाराष्ट्र सरकारचा कायमच विरोध होता आणि यापुढेही राहील, असे गोदावरी आणि कृष्णा खोरे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. विधानपरिषदेचे आमदार अरूण लाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला विखे पाटील यांनी यास उत्तर दिले.
यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला स्थगिती दिली आहे. त्या प्रकरणात राज्य सरकारमार्फत हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. या धरणाची उंची वाढवण्यासाठी संबंधित लवादाने कर्नाटक सरकारला परवानगी दिलेली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाने लवादाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मात्र या प्रकरणात न्यायालयाने अंतिम निर्णय देताना महाराष्ट्र सरकारचे मत विचारात घ्यावे. यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे". असे विखे-पाटील यांनी सांगितले.
"अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूरला पावसाळ्यात पुराचा मोठा फटका बसतो. हे रोखण्याच्या दृष्टीने धरणाच्या पाणीपातळीचा अंदाज घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. त्याचवेळी कर्नाटक सरकारशी समन्वय साधण्याचा प्रयत्न असून, त्याला कर्नाटक सरकारने सहमती दर्शवली आहे" असे विखे-पाटील यांनी सांगितले.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची परवानगी नाही
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास कर्नाटक सरकारला परवानगी दिलेली नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय जल आयोग व पाणी लवादाने दिले. याबाबत येथील वकील अॅड. विश्राम कदम यांनी केंद्रीय जल आयोगाकडे प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर हे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. दरम्यान, आयोगाच्या या निर्णयामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत सातत्याने महापूर येत आहे. हा महापूर अलमट्टी धरणामुळे येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत अभ्यास करीत असलेल्या आयआयटी रूरकी समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्याचवेळी अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. कर्नाटक सरकारमधील अनेक नेते या धरणाची उंची वाढविण्याबाबत सातत्याने वक्तव्य करीत आहेत. धरणाची उंची वाढविण्यास कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमीवर सांगलीचे अॅड. विश्राम कदम यांनी पंतप्रधान कार्यालय, भारत सरकार यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.